सद्‌गुरुंचे कर्तृत्व : विचारांची प्रगल्भता

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

जी आपुलिया स्नेहाची वागेश्वरी । जरी मुकेयाते अंगिकारी ।

तो वाचस्पतीसीं करी । प्रबंधु होडा ॥ ज्ञा. ८ : १० ॥

नवव्या अध्यायाचा भावार्थ सहजतेने उकलून झाल्यावर माऊलींच्या मनात सद्‌गुरु निवृत्तीनाथांच्या कर्तृत्वाबद्दल उफाळून आलेले प्रेम दहाव्या अध्यायातील स्तवनरुपाने प्रगट झाले त्यावर आपला विचार चालू आहे. गेल्या दोन ओवींमध्ये आपण असे बघितले की कर्माची सुरुवात करतानाची भिती आणि ते करताना त्याच्या सुंदरतेत वाहून न जाण्याचा तटस्थपणा सद्‌गुरुच देतात. आता श्रीज्ञानेश्वर महाराज असे म्हणत आहेत की “जर एखादा मनुष्य मुका (आणि मूढ) असला तरी आपली कृपा झाल्यावर तो घडघडा इतके सखोल विचार सुस्पष्टपणे मांडेल की ब्रह्मदेवालाही त्याच्याशी वाद घालणे असंभव होईल”.

असे म्हणतात की मनुष्य बाकी जनावरांपेक्षा भिन्न आहे कारण त्याच्या मनात गोष्टींमागचा कार्यकारण भाव जाणून घ्यायची नैसर्गिक इच्छा असते. उदाहरणार्थ, इतर प्राणी कुणी काही खायला दिले तर तो पदार्थ खाण्यातच संतुष्ट असतात, परंतु मानवाच्या मनात त्याने का बरे मला हा पदार्थ दिला हे जाणून घ्यावेसे वाटते. किंवा आपण जिवंत आहोत यातच सुख न मानता आपल्या जिवंत असण्याचे काही ध्येय आहे का, मृत्यूनंतर काय होईल इत्यादी विचार सर्व मानवांच्या मनात कधीनाकधी येतातच. मानव आणि जनावर यामध्ये हा प्रमुख फरक आहे असे जर मानले तर असे मानायला हवे की जो मनुष्य अतिशय खोल विचार करु शकतो तोच जनावरांपासून अधिक उन्नत स्थितीत आहे आणि जो मानव नुसत्या शारीरीक भोगांमध्येच मग्न आहे, ज्याने कधीच सुंदर विचार केलेला नाही त्याच्यात आणि अन्य प्राण्यांत फार फरक नाही. या विचारसरणीमुळेच श्री आदीशंकराचार्यांनी असे म्हंटलेले आहे की मानवजन्म मिळून ज्याने कधी परम अर्थ शोधण्याचा प्रयत्‍न केला नाही त्याच्यात आणि एखाद्या जंगली जनावरांत काही फरक नाही.

अर्थात, इथे एका गोष्टीवर ध्यान देणे आवश्यक आहे. ती म्हणजे विचारांची सखोलता सर्वसाधारणपणे सापेक्ष असते. म्हणजे काय, तर “वासरांत लंगडी गाय शहाणी” या उक्तीनुसार सभोवतलच्या लोकांच्या शंकांचे शमन आपण करु शकलो की आपणांस विचारवंत मानले जाते. प्रत्येक घरात एखादातरी विचारवंत असतोच! म्हणूनच काहीतरी थातूरमाथूर परमार्थ सांगणारे “मंत्रतंत्र उपदेशिते । घरोघरी गुरु आहेत आईते” असे नाथमहाराजांनी आपल्या भागवताच्या एकादश स्कंधावरील टीकेत सांगितले आहे (भागवत, ४८१:२). त्यामुळे आपण सर्वांग सुंदर विचार करुन स्वतःच्या मानवजन्माचा खरा फायदा घेतला आहे की नाही हे बघण्यास आपल्यास सध्या किती लोक मानतात हे बघणे योग्य असेलच याची खात्री आपण देऊ शकत नाही. आपणांस जे मानतात त्यांची विचारपातळी काय आहे हे बघणेसुद्धा जरुरी आहे. म्हणूनच आत्तापर्यंत जे कुणी विचारवंत झालेले आहेत त्यांच्या तोडीस आपण कुठे उतरतो हे बघणे अत्यावश्यक आहे! आता लक्षात घ्या की ब्रह्मदेवाच्या सभेत निरंतर वेदांचे पठण आणि त्यावरील चिंतनचर्चा चालू असते. चर्चा करणारे जरी भिन्न असले तरी ते सर्व विवेचन ब्रह्मदेवासमोरच होत असल्याने तो एकच देव असा आहे की ज्याला आत्तापर्यंत झालेल्या सर्व चर्चा व त्यामधील विचार माहीती आहेत. अशा ब्रह्मदेवालाही दिग्मूढ करणारे विचार जो मांडू शकतो त्याची समजशक्ती तिन्ही लोकांत श्रेष्ठ आहे हे वेगळे सांगायची गरज आहे का?! अशा मानवाचे विचार निव्वळ आसपासच्या लोकांपेक्षा सखोल आहेत असे नसून सर्व विश्वात सर्वोत्तम आहेत आणि त्याने निश्चितच स्वतःच्या मनुष्यजन्माचा खरा फायदा घेतलेला आहे.

असा विचार केला तर हे स्पष्ट होते की वरील ओवीतून ज्ञानेश्वर महाराज सद्‌गुरुंच्या कर्तृत्वाचा “आपल्या मानवीजन्माचे सार्थक करुन देणारे” हा पैलू मांडत आहेत. माऊलींची भाषा इतकी मृदू आणि मवाळ आहे की साधकाच्या वेदांताला अनभिज्ञ अशा पशूवत अवस्थेला त्यांनी मुका या नावाने संबोधिले आहे. बोलता येणे ही शक्ती आपल्याकडे आहे हे निव्वळ तोंडाने निरर्थक आवाज करण्याने नाही तर काहीतरी सखोल विचार बोलून सिद्ध होते हे लक्षात घेणे जरुरी आहे. नाहीतर आपल्या बोलण्यात आणि एखाद्या पशूच्या आवाज करण्यात काय फरक आहे? म्हणून इथे मुका या शब्दाचा “व्यावहारीक जीवनापलिकडे दुसरे काही न पाहणारा” असा व्यापक अर्थ घेतला तर चुकीचा ठरणार नाही. आपण सर्वजण सद्‌गुरुकृपेविना मुके आहोत असे इथे माऊली म्हणत आहे.

लक्षात घ्या की आपल्या मनात ग्रंथांच्या अभ्यासाने वा ते पाठ करण्याने सखोल विचार येत नाहीत तर गुरुकृपेने येतात. स्वप्रयत्‍नाने आपण जास्तीत जास्त बौद्धीक अर्थ जाणू शकू. परंतु बुद्धीने शब्दांचा अर्थ जाणून घेणे म्हणजे स्वतंत्र विचार करणे नव्हे. आपण स्वतः एखादा विचार केला तर आपोआपच तेव्हा त्याच्याशी सुसंगतपणे आपले जीवन जगण्याशिवाय दुसरा पर्याय आपल्यासमोर रहात नाही. स्वतःच्या मनात आलेला विचार आपला आहे की आत्तापर्यंत वाचलेल्या तत्वांचे मिश्रण करुन झालेली निर्मिती आहे हे जाणण्याचा हा एकमेव उपाय आहे. लक्षात घ्या की दुसऱ्याचे कितीही उच्च विचार आपण मानले तरी त्याने आपल्या मनातील इच्छांचा संपूर्ण विनाश होत नाही. त्याकरीता स्वतःचा विचारच (म्हणजे अपरोक्ष ज्ञान) जरुरी असते. म्हणूनच आपण बघतो की सर्वांनी ज्ञानेश्वरी वाचली तरी त्या वाचनाने जीवनात आमुलाग्र बदल झालेले भाग्यवंत (म्हणजे खरा विचार करणारे) तेच आहेत की ज्यांच्यावर गुरुकृपा झालेली आहे. एकदा ही कृपा झाली की आपले विचार प्रगल्भ होतात आणि त्यानुसार आपण स्वतःचे जीवन जगायला लागतो. त्यांच्या आधारावर इतरांना वादात जिंकायला जात नाही. खऱ्या गुरुकृपेचा हा एक मानदंडच आहे असे म्हंटले तर ते वावगे ठरणार नाही. इति.

॥ हरि ॐ ॥