(431+432)/13: The Ideal Guru-Bhakti

 

॥ ॐ श्री सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥

 

 

जंव देह हे असेल । तंव वोळगी ऐसी कीजेल ।

मग देहांती नवल । बुध्दी आहे ॥४३१:१३॥

 

इये शरीरींची माती । मेळविन तिये क्षीती ।

जेथ श्रीचरण उभे ठाती । आराध्याचे ॥४३२:१३॥

 

 

तेराव्या अध्यायात अर्जुनाला प्रश्र्न पडला की जर ज्ञानी माणसं सर्वसामान्य लोकांसारखीच वागतात तर इतरांनी त्यांना ओळखायचे तरी कसे? यावर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला ज्ञानी माणसांची लक्षणे संगितली. त्यातील एक महत्वाचे लक्षण म्हणजे साधकाच्या मनांत बाणलेली आत्यंतिक गुरू-भक्ती. वरील दोन ओव्या ह्या गुरू-भक्तीचेच वर्णन करीत आहेत. आज आपण त्यांच्यावर विचार करुया.

 

 

ज्ञानी मनुष्य

 

 

ह्या ओव्यांवर विचार करण्याच्या आधी `ज्ञानी माणसांना त्यांच्या लक्षणांवरुन ओळखणं’ ह्या मुद्यावरच थोडं सांगावस वाटत ते असे. सर्वसाधारणपणे आपल्या मनांत देवाशी अतूट नाते जोडून असलेल्या ज्ञानी माणसांबद्दल फार पराकोटीच्या भावना असतात व प्रचंड अपेक्षा त्यांच्याकडून असतात. त्यामूळे ज्ञानी माणूस बघितल्याबरोबर तो ज्ञानी आहे हे आपल्याला कळावं अशी आपली अपेक्षा असते. उदाहरणार्थ, काही लोकांना त्यांच्या केवळ सहवासाने मानसिक शांतता हवी असते, काही जणांना ते एखाद्या मर्यादा-पुरुषोत्तम माणसाप्रमाणेच वागतील अशी खात्री असते तर काही जणांना त्यांनी कुठल्याही गोष्टीचा हव्यास धरणे पटत नसते. एकंदरीत आपण आपापल्या दृष्टीने त्यांच्यामध्ये पूर्णत्व पहायला जातो. (ही अपेक्षा आपण जगातील दुसऱ्या कुठल्याही प्रकारच्या माणसाकडुन ठेवत नाही. उदाहरणार्थ, सचिन तेंडुलकरला पूर्णत्वाने क्रिकेटचे ज्ञान आहे पण त्याची स्वतःच्या चार सुंदर गाड्या असाव्यात ही अपेक्षा किंवा स्वतःच्या नावाने हॉटेल चालवणं हे आपल्याला खटकत नाही.) ह्याचे कारण असे की ज्ञानी माणसाचे मन अत्यंत शुध्द असते अशा कल्पनेमुळे आपल्या शुध्दतेच्या व्याख्येप्रमाणे असलेले गुण ज्ञानी माणसाच्या वागण्यात आपण शोधायला लागतो. याशिवाय आपली अशी खात्री असते की एकदा मनुष्य ज्ञानी झाला की तो दिवसाचे २४ तास व वर्षातील ३६५ दिवस ज्ञानी म्हणूनच जगतो. ही दुसरी अपेक्षा सुध्दा आपण इतर जणांबाबत ठेवत नाही. पु. ल. देशपांडेंनी २४ तास विनोदच सांगावेत, किंवा जगातील सर्वात श्रीमंत माणसाने, बिल गेटस्‌ने, सर्वदा पैशाचाच विचार करावा असे आपल्याला अजिबात वाटत नाही. थोडक्यात सांगायचे म्हणजे `ज्ञानी मनुष्याच्या ज्ञानीपणाला’ आपण बाकी जगातील इतर कुठल्याही एका गोष्टीत अत्यंत प्रभुत्व असलेल्या माणसापेक्षा उच्च स्तरावर ठेवतो. म्हणुनच आपल्या अशा माणसांबद्दलच्या अपेक्षा प्रचंड असतात. ह्या आपल्या अपेक्षा कितपत रास्त आहेत? आयुष्यामध्ये अशा कल्पनांप्रमाणे वागणारा मनुष्य आपल्याला भेटू शकेल का? जर ह्या अपेक्षेप्रमाणे ज्ञानी वागले असते तर त्यांना ओळखणं अत्यंत सोपे होते. त्यांच्याकडे नुसते बघुनच आपण सांगु शकलो असतो की हे ज्ञानी आहेत. मग भगवान श्रीकृष्णांने ही लक्षणे कशाकरिता सांगितली? आणि ह्या लक्षणांवरूनच तू ज्ञानी ओळख असे का सांगितले? याचे उत्तर असे की, ज्याने स्वसंवेदनाने हे जाणलेलं असते की आपण व परमेश्वर यामध्ये काहीही अंतर नाही त्यालाच ज्ञानी म्हणतात. अशा माणसाला परमेश्वराची ओढ जगातील कुठल्याही गोष्टीबद्दलच्या ओढीपेक्षा जास्त वाटत असते व तो आपले आयुष्य ह्या ज्ञानाच्या सहाय्याने जगत असतो.

परंतु अशी परमेश्वराशी अद्वैत भेट त्याच्या आयुष्यात सतत घडणे शक्य नसते. तसे झाले असते तर निर्विकल्प समाधीचा आनंद स्वतः उपभोगीतच ज्ञानी माणसाने आपले जीवन व्यतीत केले असते व बाह्य जगाशी त्याचा संबंध संपूर्णपणे तुटला असता. पण हे खरे असेल तर ज्या माणसाचा परमेश्वराशी संपर्क तुटला आहे अशा माणसाला आपण ज्ञानी का म्हणावं? ज्ञानी माणसाच्या ज्ञान प्रगट होण्याबद्दल खालील उदाहरण चांगले आहे. एम. एफ़. हुसेन, किंवा पाब्लो पिकासो ह्यांना आपण श्रेष्ठ चित्रकार मानतो. पु. ल. देशपांडेंच्या लिखाणाबद्दलच ते जगप्रसिध्द होते. परंतु तुम्ही बघाल तर हुसेन कींवा पिकासोने जास्तीत जास्त २०० ते ३०० चित्रे काढली असतील. त्यापेक्षा कीतीतरी वेळा जास्त त्यांनी अंघोळ केली असणार, दांत स्वच्छ केले असतील पण त्यांना जगातील सर्वोत्कृष्ट अंघोळ करणारे किंवा दात घासणारे म्हणून ओळखत नाही!! पु.ल. देशपांडेंच्या बाबतीतही हाच प्रकार लागू होतो. आपण हुसेन, पिकासो यांना चित्रकार म्हणून व पु.लं.ना लेखक म्हणून ओळखतो याचे कारण ते त्या क्रिया सतत करत होते हे नसून, त्या क्रियेमध्ये त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांची स्वतःची छबी प्रगट होते हे आहे. किंबहुना जगातील सर्व माणसांमध्ये या क्रियेत प्राविण्य मिळवणाऱ्या फार थोड्या लोकांमध्ये त्यांची गणना आपण करतो व म्हणूनच आपण त्यांना ह्या विशेषणांनी ओळखतो. याशिवाय त्यांचे आयुष्य आपण बघितल्यास ह्या माणसांनी ह्या कला शिकण्याकरीताच आपलं आयुष्य वेचलं असंसुद्धा दिसून येते. म्हणूनच आपण त्यांच्या आयुष्यातील अशा एका पैलूमध्ये त्यांना पाहतो. अगदी ह्याचप्रमाणे ज्ञानी मनुष्याचा ज्ञानीपणा हा काही २४ तास, ३६५ दिवस प्रगट झाला नाही तरी त्याच्या ज्ञानीपणात न्यून येत नाही. ज्ञानी माणसाने ज्ञान प्राप्त करून घेतले होते व सर्व आयुष्य ते ज्ञान परत परत अनुभवायची इच्छा धरूनच तो जगत असतो. असा विचार करूनच आपण त्याला ज्ञानी म्हणले पाहिजे. ज्याप्रमाणे पु.लं.ना भाजी आणायला सर्वसामान्य माणसांप्रमाणेच घासाघीस करावी लागते त्याचप्रमाणे ज्ञानी माणसाचा परमेश्वराबरोबर असलेला अंतर्बाह्य संपर्क तुटल्यावर सर्वसामान्य माणसांप्रमाणेच जीवन जगायला लागते. परंतु पु. लं. च्या मनांत ज्याप्रमाणे पुढच्या लेखाबद्दल सतत विचार चालू असायचे त्याचप्रमाणे ज्ञानी मनुष्याच्या मनांतसुध्दा नेहमीचे जीवन जगताना परमेश्वराशी परत संबंध कसे जोडायचे याचाच विचार चालू असतो. तुम्ही कुठल्याही संताचे चरित्र बघितले तर हेच दिसून येईल.

त्यामुळे ही गोष्ट लक्षात आली पाहीजे की आयुष्यात आपण ज्ञानी माणसाला त्याचा परमेश्वराशी संपर्क तुटलेला असतो तेव्हाच पाहू शकतो व बोलू शकतो. त्यावेळी तो इतर लोकांसारखाच आपल्याला दिसू शकेल. ह्यामध्ये त्याच्या ज्ञानीपणाबद्दल आपण शंका घेणे रास्त नाही कारण त्याच्या मनातील अनुसंधानाबद्दल आपल्याला कळणे शक्य नसते. तेव्हा त्याच्या इतर लक्षणांकडे पाहणे ही एक जरुरीची गोष्ट आहे. ज्याप्रमाणे एखादी अत्यंत रोमांचकारी घटना आपल्या आयुष्यातून घडून, निघून गेल्यावरसुध्दा आपले ह्रुदय धडधडतच असते, हाता-पायाला सुटलेला कंप थोडा वेळ सुरूच असतो त्याचप्रमाणे ज्ञानी माणसाच्या आयुष्यातील परमेश्वराचा संपर्क तात्पुरता सुटला असला तरी काही लक्षणे त्याच्या वागण्यात राहतातच. त्या लक्षणांवरूनच आपण त्याची व भगवंताची असलेली आत्यंतिक जवळीक जाणायची असते. म्हणुन भगवान श्रीकृष्णांनी ज्ञानी माणसे ओळखायची लक्षणे सांगितली आहेत.

आणखी एक गोष्ट म्हणजे प्रत्येक माणसाच्या व्यक्तिमत्वाप्रमाणे ह्रुदय धडधडणे, हाता-पायाला कंप सुटणे, घाम येणे ह्या पैकी काहीकाहीच लक्षणे रोमांचकारी घटनेमुळॆ प्रदर्शित होतात त्याचप्रमाणे ज्ञानी माणसाची सर्व लक्षणे प्रत्येक ज्ञानीमाणसामध्ये दिसतीलच असे नाही. कोणी `अमानित्व’ दाखवेल तर कुणी `गुरूभक्ती’ दाखवेल तर आणखी कोणी सर्व गोष्टींमधला `निरीच्छ्पणा’ दाखवेल. उदाहरणार्थ जे. कृष्णमूर्तीनी कधीही `गुरूभक्ती’ हा गुण दाखवला नाही. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांचा `अमानित्व’, स्वतःकडे कमीपणा घेण्याचा स्वभाव जास्त जाणवतो.

ह्या कारणांमुळे आपल्याला सर्वसामान्य माणसांमधील ज्ञानी कोण हे ओळखणे हे कठीण होते. कारण जर ज्ञानी मनुष्य एकच लक्षण दाखवित असला तर आपलीसुध्दा ते लक्षण ओळखायची क्षमता हवी! आपल्याला फक्त गुरू-भक्ती ओळखता येत असेल व तो ते लक्षण दाखवित नसला तर आपला गोंधळ उडेल. अजून एक गोष्ट म्हणजे, ज्याप्रमाणे पु. लं. चे सर्वच लिखाण आपल्याला पसंत पडत नाही, किंवा हुसेन, पिकासो ह्यांची सगळीच चित्रे एकसारखी आवडत नाहीत त्याचप्रमाणे ज्ञानी माणसाचे अपरोक्ष ज्ञानदेखील आपल्यातील परमेश्वराच्या भावनेला जागृत करतीलच अशी खात्री नसते. परंतु ज्याप्रमाणॆ पिकासोने आपले `क्युबिझमचे’ प्रयोग लोकांच्या विरोधामुळे थांबविले नाहीत, त्याचप्रमाणे ज्ञानी मनुष्य आपले परमेश्वराचे ज्ञान लोकांना पटेल असे बनविण्याचे प्रयत्न करीत नाही कारण त्याची स्वतःच्या ज्ञानाबद्दल, त्याच्या अपरोक्षपणामुळे इतकी खात्री असते की सर्व जगाच्या मतांविरुध्द तो जायला तयार असतो. म्हणूनच घरातील सर्व आप्त मंडळी व आजूबाजूचे सर्वजण विरोधात असूनसुध्दा प्रल्हादाची भक्ती डळमळली नाही. जर आपल्या कल्पनेप्रमाणे त्यांचे ज्ञान नसेल तर अशा ज्ञानी माणसाला ओळखणे कठीण होते. प्रत्यक्ष श्रीराम ऋषींसमोर असतानासुध्दा फार कमी जणांना त्यांच्या भगवंतपणाची जाणीव झाली. ते त्याला म्हणाले, `आमची निर्गुण परमेश्वरावर श्रध्दा आहे, आम्ही तूला देव मानू शकत नाही’. यावर श्रीराम मंदस्मित करून त्यांच्या अढळ श्रध्देला मान देउन निघून गेले. अशा रीतीने ज्ञानी माणसांना जाणून घ्यायला त्यांच्या परमेश्वराबद्दलच्या मतांचासुध्दा उपयोग होईलच याची खात्री नसते! अशा सर्व कारणांमुळे ज्ञानी माणसांना ओळखायला त्यांची वागण्यातील लक्षणेच मदत करतात.

 

 

अद्वैत गुरु भक्ती

 

 

आता आपण ह्या दोन ओव्यांबद्दल विचार करूया. गुरू-भक्तीचा अत्यंत पराकोटीचा विचार ह्या दोन ओव्यांमधुन प्रगट झाला आहे. पहिल्या ओवीत ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या गुरू-भक्तीवरच्या आधीच्या ओव्यांबद्दल सांगताहेत. त्या जवळ-जवळ ७०एक अश्या ओव्यांमध्ये भक्त व गुरू ह्यात द्वैत ठेऊन भक्ती कशी करावी हे सांगितले आहे. आता ४३२व्या ओवीत अद्वैत भक्तीबद्दल सूचित केले आहे. आपणसुध्दा आधी द्वैत व नंतर अद्वैत भक्तीबद्दल विचार करुया.

या जगातील कुठलीही गोष्ट पूर्ण सात्विक, किंवा पूर्ण राजसीक किंवा पूर्ण तामसीक नसते. प्रत्येक गोष्टीमध्ये ह्या तीन्ही गुणांची भेसळ झालेली असते. जेव्हा आपण द्वैत रुपात म्हणजे गुरूला आपल्यापासून भिन्न मानून त्यांची भक्ती करतो तेव्हा आपण ह्या सृष्टीच्या नियमापासून भिन्न राहू शकत नाही. उदाहरणार्थ, आपल्या गुरूची अत्यंत भावपूर्ण भक्तीने पाद्यपूजा करणे ही गोष्ट जरी सात्विक असली तरी, एका वेळी एकच पाद्यपूजा करू शकतो. आपल्या करण्यामुळे त्याचवेळी पाद्यपूजा करायची इच्छा असणाऱ्यांना आपण दुःख देत असतो हे तामसीक होय. ज्या ज्या वेळी आपण गुरूची शारीरीक सेवा करतो त्या प्रत्येक वेळी ही गोष्ट लागू पडते. ह्या वस्तुस्थितीमुळे आपल्या अशा गुरू-भक्तीमुळे मिळणारे फळ हे देखील मिश्र असते. पाद्यपूजा करताना मिळालेले समाधान फार टिकत नाही व आपल्या साधनेमध्ये फार फरक पडलेला जाणवत नाही. परंतु आपण परत परत द्वैत भक्तीमार्फतच गुरूबद्दलची आपली आत्मीयता दर्शवित राहतो कारण अद्वैत गुरू-भक्ती आपल्या शक्तीपलीकडची आहे अशी आपली कल्पना असते. याशिवाय आपल्या मनात आत्मविश्वास कमी असल्याने बाह्य गोष्टींमध्ये आपण आपल्या श्रध्देचे रुप दर्शवू इच्छितो. त्यायोगे गुरूसमोर आपला नम्रपणा दिसून येऊन आपले गुरू प्रसन्न होतील असे आपणांस वाटत असते. परंतु अशा प्रकारच्या गुरू भक्तीमध्ये अनेक विघ्ने येऊ शकतात. पहिली गोष्ट म्हणजे गुरूंच्या ठिकाणी गेल्यावरच त्यांची शारीरीक सेवा करण्याचा संभव असतो. याशिवाय आपल्या मनांत जर त्यांना उत्तम भोजन द्यायचे असेल आणि त्यांचा उपवास असेल तर आपली इच्छा पूरी होत नाही. म्हणजेच आपल्या मनातल्या इच्छेत त्यांचा शारीरीक सहयोग आवश्यक आहे. सर्वात शेवटी म्हणजे आपल्या मनातील इच्छेप्रमाणे गुरू सेवा करून घ्यायला तयार असले तरी त्यांच्या इतर भक्तांपासून त्यांना फक्त आपल्याकरीता वेगळे काढणे जमतेच असे नाही. अशा रीतीने गुरूची शारीरीक सेवा करण्याच्या आपल्या इच्छापूर्तीमध्ये अडथळेच अडथळे भरलेले असतात. एवढे सर्व करूनसुध्दा ह्या प्रकारच्या गुरू भक्तीचे फळ उच्च प्रतीचे नसतेच! म्हणून आपण सर्वांनी अंतर्गत गुरू भक्तीचे गूढ शिकायला हवे.

खरं म्हणजे गुरूंची अद्वैतात भक्ती करणे हे फार कठीण नाही. ज्या क्षणी आपण आपल्या गुरूंची मनात आठवण काढतो त्या क्षणी आपल्या मनातील त्यांच्या मूर्तीला आपल्या भावांची फुले अर्पण करीत असतो. ही अद्वैत भक्तीच आहे. परंतु इतक्या सहज रीतीने गुरू-भक्ती होऊ शकते याच्यावर आपला विश्वास बसत नाही व हा संशयच आपल्याला बाह्य गोष्टी करायला उद्युक्त करतो. गुरूंनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट अत्यंत प्रामाणिकपणे केवळ त्यांनी सांगितली आहे म्हणून करणे हा सुध्दा त्यांच्या अद्वैत रुपाच्या भक्तीचाच प्रकार आहे. ह्यामुळे आपण मनातील त्यांच्या शब्दरुपी प्रतिमेची आचरणानी पूजा करीत असतो. अशा अनेक रीतीने अद्वैत गुरू-भक्ती करता येते व ह्या पैकी कुठल्याही भक्तीचे फळ हे द्वैतरुपाच्या भक्तीपेक्षा श्रेष्ठ असते. अद्वैत भक्तीची परमावस्था म्हणजे ज्ञानेश्वरीतील वरील ओवी आहे. तीचा अर्थ असा आहे: `माझ्या शरीराची माती करून ती मी, ज्या ठीकाणी माझ्या सद्‍गुरूंचे (आराध्याचे) चरणकमळ आहेत त्या ठीकाणी वाहतो.’

देहांत ह्या शब्दाचा अर्थ मराठीमध्ये मृत्यू असाच मानतात. परंतु ज्ञानेश्वरीच्या ४३१व्या ओवीमध्ये ह्या शब्दाचा अर्थ `साधकाची स्वतःच्या देहाबद्दलची आपुलकी नष्ट झाल्यावरची स्थिती’ असा होऊ शकतो. ज्या क्षणी देहाबद्दलचे ममत्व नाहीसे होऊन साधकाला स्वतःच्या अमूर्त स्वरुपाची संपूर्ण जाणीव होते, त्याच क्षणी त्याच्या देहाचा (त्याच्याकरीता) अंत झाला असे म्हणायला हरकत नसते. अशा रीतीने जीवंत असतानासुध्दा साधनेच्या बळाने आपण आपला `देहांत’ करू शकतो. कुठला साधक माझा देहांत झाला आहे असे म्हणू शकतो ते आपण आता पाहूया.

अगदी थोडा विचार केला तरी असे स्पष्ट होते की हा देह म्हणजे आपण नाही. आपला देह जन्मापासून इतका बदलला आहे व तो इतका बदलत आहे, की सध्याच्या त्याच्या रुपामध्ये स्वतःला बघणे हे संपूर्ण चुकीचे आहे हे लगेच आपल्याला पटते. परंतु हे सर्व कळूनसुध्दा आपल्या देहाबद्दलचे आपले ममत्व कमी होत नाही. याचे कारण असे की (जरी आपण म्हणजे देह नसलो तरी) जगांतील यच्चयावत गोष्टींपैकी केवळ आपल्या देहाच्या व मनाच्या संवेदनाच फक्त आपल्याला सतत जाणवित असतात. म्हणून आपला देह हा जगातील इतर सर्व वस्तूंपेक्षा वेगळा आहे हे जाणविते व तोच फक्त आपल्याला आपलासा वाटतो. म्हणून जोपर्यंत जगातील इतर देह व मने यांच्या संवेदना आपण पाहिजे तेव्हा जाणू शकत नाही, तोपर्यंत आपला देहांत होणे शक्य नाही. आपल्यापैकी काही जण ही गोष्ट असंभाव्य मानतील. दुसऱ्याच्या देहाच्या वेदनांबद्दल जरी एखादवेळेस आपल्याला कळू शकले तरी सर्वांच्या मनातील विचार कळणे अशक्य आहे अशी शंका येणे साहजिकच आहे. या बाबत रामकृष्ण परमहंस खालील गोष्ट सांगत. एका अरण्यात नुसती झाडेच झाडे होती. एक दिवस अचानक तेथे एक माकड गेले. सर्व झाडांना त्याच्याकडे बघून अत्यंत आश्चर्य वाटले कारण ते एका झाडावरून दुसऱ्या झाडावर पाहिजे तेव्हा जाऊ शकत होते. त्यांनी त्याला विचारले `असे तू खरंच करू शकतोस का आम्हाला भास होत आहे?’ आपली अवस्था ही त्या झाडांसारखी आहे. खरा योगी एखाद्या माकडाप्रमाणे केव्हाही कुठल्याही माणसाबद्दल अंतर्बाह्य माहीती काढू शकतो. प्रत्येक संताच्या चरित्रामध्ये आपल्याला अनेक उदाहरणे आढळतील की ज्यामध्ये दुसऱ्यांच्या मनातील विचार त्यांनी अचूक ओळखले आहेत. वरील गोष्टीमधील माकड हे जन्मतःच माकड म्हणून जन्माला येते, तसे आपण नाही म्हणून साधकाने निराश होऊ नये. आपण आपल्या साधनेच्या बळावर सध्याच्या अवस्थेतून माकड होऊ शकतो! सर्वांनी ह्या गोष्टीवर विश्वास ठेवायला हरकत नाही की आपल्या साधनेमध्ये एक अवस्था अशी येऊ शकते की ज्यामध्ये सर्व मनांतील स्पंदने आपण जाणून घेऊ शकतो. ही गोष्ट साधक करेलच असे नाही, पण तेवढी त्याची क्षमता वाढलेली असते.

अशा वेळी साधकाचा स्वतःच्या देहाशी व मनाशी संबंध केवळ बाकीच्या देहांसारखाच होतो. तेव्हा त्याच्या देहाशी असलेले आपुलकीचे नाते तुटते. ह्या अर्थाने त्याचा देहांत झाला आहे असे आपण समजू शकतो. अशा वेळी त्याची गुरू-भक्ती एक वेगळे रुप घेते, `…मग देहांती नवल । बुध्दी आहे ॥ ‘ ह्या ओवीचा असा अर्थ होऊ शकतो.

ही गुरू-भक्ती कशी असेल? जर तो साधक खरा ज्ञानी असेल, तर ह्यावेळेस त्याचे व सद्‍गुरूचे एक अतूट असे नाते निर्माण होते. स्वतःच्या प्रगतीचा गर्व होण्याऐवजी त्याला सद्‍गुरूबद्दल अत्यंत प्रेम उत्पन्न होऊन तो स्वतः सद्‍गुरूमय होतो. जीवनातील प्रत्येक गोष्ट त्याच्या ह्रुदयातील सद्‍गुरूंच्या आज्ञेप्रमाणे तो करतो व या भावनेमुळे त्याची प्रत्येक कृती म्हणजे गूरू-भक्तीचे मूर्तिमंत रुपच होते. ही एकच गूरू-भक्ती पूर्णपणे सात्विक असल्याने ह्या भक्तीचे फळ (म्हणजे सद्‍गूरूंशी अजून जवळीक) त्याला क्षणोक्षणी मिळत असते व तो त्यायोगाने अत्यंत सुखी होतो.

आपल्यापैकी ज्या कुणाला साधनेच्या अनंत मार्गांमधील गूरू-भक्तीच्या मार्गाने जायचे आहे त्या सर्वांनी ह्या सर्वोच्च स्थितीची प्राप्ती करुन घ्यावी व ती होईपर्यंत आपला मार्ग सोडू नये हेच ही ओवी आपल्याला सांगत आहे.

 

 

॥ हरि ॐ ॥

 

 

(बंगलोरमध्ये ११ नोव्हेंबर २००६ ला दिलेल्या प्रवचनावर आधारीत.)