1/1: Sadhana In A Nutshell

॥ ॐ श्री सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥

 

ॐ नमॊ जी आद्या । वेद प्रतिपाद्या ।

जय जय स्वसंवेद्या । आत्मरुपा ॥१॥

 

साधनेचे ध्येय

 

ज्ञानेश्वरीची सुरुवात करताना ज्ञानेश्वरांनी श्री गणेशाला नमन केले आहे. ह्या पहिल्या ओवीमध्ये त्यांनी निर्गुण रुपाला नमस्कार केला आहे. एखाद्या गोष्टीची सुरुवात करताना आपल्याला आपल्या ध्येयाची जाणीव असणं ही एक जरूरी गोष्ट आहे. उदाहरणार्थ: जर परीक्षेमध्ये मार्क्स मिळवायला हवेत ही जाणीव नसली तर आपला अभ्यास नीट होणार नाही. किंवा स्वयंपाक करताना शिजलेला जिन्नस कसा असतो हे जर आपल्याला माहीत नसेल तर गॅस केव्हा बंद करायचा हे कळणार नाही! त्याचप्रमाणे, जर आपल्याला अध्यात्मिक साधना करायची असेल तर ती साधना करुन आपण काय मिळवणार आहोत, याची थोडी तरी कल्पना असणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. खरं म्हणजे साधना ह्या शब्दाचा अर्थच “हवी असलेली गोष्ट मिळविण्यासाठी केलेली खटपट” असा आहे. त्यामुळे आपल्याला काय हवे हे जर कळले नाही तर खऱ्या अर्थाने आपली साधना ही सुरुसुद्धा झालेली नाही हे स्पष्ट होते. म्हणूनच ज्ञानेश्वरांनी आपल्या पहिल्या ओवीत, त्यांचे स्वतःचे ध्येय काय आहे, हे स्पष्ट केले आहे. ह्या अर्थाने बघितल्यास ह्या एका ओवीमध्ये श्री ज्ञानेश्वरांनी काय भूमिका ठेवावी हे स्पष्ट केले आहे. ज्ञानेश्वरीमध्ये जे जे काही मार्ग सांगितले आहेत, ते ते सर्व ह्या एका ध्येयाच्या प्राप्तीकरीताच करायचे आहेत याची जाणीव ते आपल्याला ह्या ओवीमधून देत आहेत. सर्व साधनेचे ध्येय हे आपण आपलं आत्मरुप जाणून घेणं हेच आहे.

परंतु हे ध्येय गाठणं ही काही सोपी गोष्ट नाही! ज्याप्रमाणे बुध्दी तल्लख असुनसुध्दा दररोजचा नियमित अभ्यास ही परिक्षेत मार्कस्‌ मिळवण्याकरिता जरूरीची गोष्ट आहे, किंवा ज्याप्रमाणे गायीच्या आंचळात त्वचेला लागूनच दूध असले तरी दूध काढण्याची हातोटी साधल्याशिवाय दूध हातात येत नाही, त्याचप्रमाणे आपलं आत्मरुप हे जरी सतत आपल्याजवळच असलं तरी ते ऒळखणं ही सोपी गोष्ट नाही. ह्या दृष्टीने बघितले तर बाकी सगळी ज्ञानेश्वरी ही कुठला अभ्यास केला, किंवा काय हातोटी साधली की हे ध्येय साध्य होईल हे सांगण्याकरीताच लिहीली आहे असं म्हणता येईल. जर आपण ज्ञानेश्वरीमधील आत्मरुपी देवासंबंधीच्या अनेक ओव्या बघितल्या तर ज्ञानेश्वरांना ह्या ध्येयाबद्दल किती आत्मीयता आहे हे कळेल. साधनेला संपूर्ण आकार ध्येयामुळेच येत असतो. आपले ध्येय नुसते पास व्हायचे आहे की वर्गामध्ये पहिले यायचं आहे यावर आपला अभ्यास अवलंबून असतो. म्हणून ह्या ओवीचे महत्व अनन्यसाधारण आहे. जर आपलं ध्येय ज्ञानेश्वरांसारखेच असेल तर आपली साधना वेगळी होईल आणि जर सर्वसामान्य लोकांसारखी असेल तर वेगळी होईल. म्हणून ह्या ओवीचा अर्थ आपण नीट समजाऊन घेतला पाहीजे.

ह्या ओवीचा शाब्दीक अर्थ असा आहे: हे माझ्या आत्मरुपामध्ये स्थित असलेल्या देवा, तुझ्यापासूनच सर्व सृष्टी निर्माण झालेली आहे व तुझ्या बद्दलच वेद लिहीले गेले आहेत. केवळ स्वानुभवानेच जणू शकणाऱ्या तुझा मी जयजयकार करून तुला वंदन करतो.

आपल्या सर्व साधनेचे फळ अर्पण करण्याजोगा हा एकच देव आहे. ह्या देवाला समोर ठेऊनच माझी साधना चालू ठेवणार आहे असा ह्या ओवीचा गर्भित अर्थ. ह्या अर्थामध्ये आपण साधना कुठल्या हेतूने करावी, ह्याबद्दलची सूचना आहे.

सर्वसाधारणपणे आपण आपली साधना सुरू करतो, तेव्हा आपल्या मनात काही हेतु असतो. काही जणांना व्यावहारीक अडचणीतून सूटका हवी असते. काही जणांना सध्याच्या स्थितीतून अधिक चांगल्या अवस्थेत कायम राहण्याची इच्छा असते, तर काही जणांना कुठल्याही परीस्थितीमध्ये मानसिक शांतता हवी असते. जेव्हढी आपली इच्छा प्रबळ असते, तेव्हढीच आपली साधनेकरीता कष्ट करायची तयारी जास्त असते. शिवाय साधना करीत असताना आपण आपल्या नकळत, ध्येयाच्या किती जवळ आलो आहोत हे सतत बघत असतो. त्यामुळे आपल्या मनात आपली साधना नीट चालली आहे की नाही ह्याची जाणीव होत असते. काही जण कुठलाही हेतु न ठेवता आपल्या गुरूंनी सांगीतले आहे तर ते आपल्याकरिता चांगलेच असणार अशा विचाराने साधना सुरू करतात. अशा लोकांचा जेव्हढा विश्वास, तेव्हढी साधना. साधना सुरु असताना जर जीवनात अडचणी आल्या तर त्यांचा विश्वास डळमळीत होण्याचा संभव असतो. अगदी नुसत्या विश्वासाने साधना करणारे सुद्धा आपल्या भल्याकरताच साधना करीत असतात आणि आपले भले म्हणजे काय याची पूर्ण जाणीव त्याना असतेच!

ह्याचा अर्थ असा की आपण सर्व जी काही साधना करतो ती अशी एक गोष्ट मिळविण्याकरता करतो की जिच्याबद्दल आपल्याला माहीती आहे पण जी आत्ता आपल्या जवळ नाही.

श्री ज्ञानेश्वर महाराज ह्या ओवीमध्ये म्हणताहेत की आपण साधना अशा गोष्टीकरीता करायची आहे की जी आत्ताच आपल्याजवळ आहे पण जीच्याबद्दल आपल्याला काहीच माहीती नाही! आपले स्वतःचे “आत्मरुप” हे सतत आपल्याजवळ असतेच. ते आत्मरुप म्हणजे काय हे कळण्यासाठीच आपण साधना करावी हे आपल्याला ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत. तेव्हा ह्या ओवीचा आपल्या साधनेशी संबंध, आपल्या साधनेच्या मुळाशीच, म्हणजे साधनेच्या हेतूशीच सुरु होतो.

जरा विचार केला तर असे दिसुन येईल की लहानपणापासुन आपले शरीर इतके बदललेले असले तरी सुद्धा आपल्या मनात एकाच व्यक्तीची ही रुपे आहेत ही जाणीव असते. सर्व जग आपल्याला एकाच नावाने लहानपणापासून हाक मारीत आहे व एकच व्यक्ती ह्या नावाला आपलेसे म्हणत आहे ही वस्तुस्थिती जाणून घ्यायला फार वेळ लागत नाही. म्हणजे आपण म्हणजे आपले शरीर ही कल्पना वस्तुस्थितीवर आधारीत नाही व म्हणूनच चुकीची आहे. परंतु हीच विचारसरणी आपण आपल्या मनाबद्दल, बुद्धीबद्दल करु शकतो. आपल्या मनात, बुद्धीत एवढी स्थित्यंतरे होतात पण एकच व्यक्ती ह्या सर्व बदलांची नोंद घेत असते. ही जी एक व्यक्ती आहे, हे जे एक अस्तित्व आहे ते सतत आपल्याजवळच आहे, पण ते नक्की काय आहे हे आपल्याला माहिती आहे का? ज्याप्रमणे सतत तोंडात असल्यामुळे आपल्या लाळेची चव सांगु शकत नाही, त्याचप्रमाणे ह्या अस्तित्वाबद्दल आपण “ते आहे” ह्या पलिकडे काहीच सांगू शकत नाही. ह्या आत्मरुपाला अधिक जाणून घेणे हा साधनेचा हेतु ठेवा असच ज्ञानेश्वर महाराजांना ह्या ओवीत सांगायचे आहे.

 

आत्मरुप जाणून घ्यायची साधना

 

एकदा हेतु नक्की झाला की साधनेचं रुप स्पष्ट होते. आत्मरूप जाणून घेणं ह्या हेतूची साधना कशी होते हे आता बघीतले पाहिजे. ह्या पहिल्या ओवीतच “जय जय स्वसंवेद्या” ह्या भागात ज्ञानेश्वरांनी आपल्याला साधनेची रूपरेखा संगितली आहे. ती कशी हे आता आपण पाहूया.

कुठल्याही गोष्टीची जाणीव आपल्याला (आपल्या) मनांत उठलेल्या प्रतिबिंबामुळेच होते. एखादा पानांमधे दडलेला पक्षी आपला मित्र आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु तो स्वतःला दिसेपर्यंत त्याचे अस्तित्व आपल्याकरिता नसते. एखादवेळेस मित्रावर विश्वास ठेऊन आपण तो पक्षी आहे असं गृहीत धरतो पण अशावेळी त्या पक्ष्याबद्दलची बाकी माहिती( पिसांचे रंग, चोचीचा आकार वगैरे) आपल्याला नसते. बाह्य जगातील गोष्टीबद्दल हा प्रकार तर अंतःर्गत असलेल्या मानसिक भावनांबद्दल तर स्वतःला जाणवल्याशिवाय समजायच्या काहीच आशा नसतात. कितीतरी वेळा आपल्या सहज वागण्यामुळे दुसऱ्यांच्या मनात दुःखदायक संवेदना होतात त्या आपल्याला कळतसुद्धा नाहीत. आणि न कळल्यामुळे आपल्यामुळे दुसऱ्याना त्रास झालाय ही घटना आपल्या आयुष्यात अस्त्वित्वातच नसते. याउलट ज्या माणसाला त्रास झाला आहे त्याच्या आयुष्यामध्ये `मी त्याला त्रास दिला’ ही घटना अत्यंत सत्य असते. अशा गोष्टींमुळे जगाबद्दलची माझी कल्पना व त्याची कल्पना ह्यामध्ये फरक निर्माण होतो. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणांमध्ये व आपल्या प्रत्येक कृतीमध्ये आपण व बाकीचे जग यामध्ये विसंवाद करायचे असं सामर्थ्य आहे. तरीसुध्दा आपली अशी अपेक्षा असते की ह्या जगात आपल्या भावना जाणुन घेणारी एखादी तरी व्यक्ती असावी! बाकी लोकांची तर गोष्टच सोडा, ते बिचारे माझ्या फक्त बाह्य गोष्टी बघू शकतात, पण मी स्वतः किती माझ्या मनाला जाणतो? माझ मन इतकं चंचल आहे की आत्ता आलेला विचार हा जाणण्याआधीच निघून गेलेला असतो व त्या विचाराप्रमाणे आपण कुठली तरी क्रिया करुन बसलेलो असतो. जर नंतर आपल्याला कुणी विचारले की `का बरं तू असं वागलास?’ तर उत्तर देणं आपल्याला कठीण होतं. आपण थोडासा विचार केला तर असं दिसुन येईल की आपल्या जीवनातील ९० टक्के गोष्टी आपण आधी करतो व मग कारणे शोधतो! याउलट ज्या गोष्टी आपल्याला करायच्याच आहेत हे स्पष्ट असते त्याबद्दल आपण टाळाटाळ करतो (उदाहरणार्थ: नित्यनैमित्तिक साधना, कौटुंबिक जबाबदाऱ्या वगैरे)!! टाळाटाळ का करतो ही गोष्ट आपण सध्या बाजुला ठेऊ परंतु हे स्पष्ट आहे की आपण ज्या गोष्टी स्वतः करतो त्यातील बऱ्याचश्या गोष्टींचा कार्यकारणभाव आपल्याला माहीत नसतो. ह्या अर्थाने, आपल्या आयुष्यातील बऱ्याचश्या गोष्टींबद्दल आपण अनभिज्ञ असतो, त्यांचे पूर्ण ज्ञान आपल्याला नसते. मग बाकीच्या माणसांच्या आयुष्याबद्दल तर बोलायलाच नको. परंतु वस्तुस्थिती अशी असताना आपल्याला असं सारख वाटत असते की मला मी कसा आहे हे पूर्णपणे माहीती आहे.

स्वतःबद्दल सोडाच पण आपली दुसऱ्यांच्याबद्दल तर अजूनच ठाम मतं असतात! शिवाय आपली पूर्ण खात्री असते की माझी मतं ही पूर्ण वस्तुस्थितीवर आधारीत आहेत व ती खरीच असणार. अशा रीतीने विचार केल्यास असे सिध्द होते की आपणा सर्वाच्या मनात अनेक गोष्टींबद्दल ठाम पुर्वानुग्रह असतात व कित्येक वेळा आपल्याला त्याची जाणीव सुध्दा नसते. ह्या सर्व पुर्वानुग्रहाचा, आपल्या ठाम विचारांचा आपल्या दररोजच्या जीवनावर काय परिणाम होतो? खरं म्हणजे आपले व्यावहारीक जीवन अत्यंत सोपे होते! आपल्या आयुष्यातील प्रत्येक घटनांबद्दल विचार करयची गरज भासत नाही. उदाहरणार्थ, एकदा का आपल्यामध्ये ठाम भावना झाली की सिगारेट पीणारी वा देवाचे नाव न घेणारी वा भांडखोर अशी माणसे वाईट असतात, की अशी व्यक्ती दिसल्यास आपल्याला, पुढचा विचार न करता, ती व्यक्ती वाईटच आहे असा निष्कर्ष घेता येतो. आपल्याला आयुष्यात घडलेल्या प्रत्येक घटनेचा “ही चांगली”, “ही वाईट” असा गोषवारा पटापट घेता येतो. काही वेळाने अशी वर्गवारी करायची एवढी सवय होऊन जाते की आपण आयुष्यातील घटनांकडे प्रथम वर्गवारी करायच्या दृष्टीनेच बघू लागतो. ह्या अर्थाने आपले पूर्वानुग्रह आपल्या जीवनावर नियंत्रण ठेवू लागतात. अशा वेळी देवाचं नाव मनापासून घेणारी व्यक्ती दारू पिऊन भांडायला लागली की आपल्याला कळत नाही की काय करावं?! एका दृष्टीने ती व्यक्ती चांगली आहे (देवाचं नांव घेते) व दुसऱ्या दृष्टीने ती वाईट आहे! अशा व्यक्तीशी संबंध आपण फार ठेवत नाही! म्हणजे आपले पूर्वग्रह बदलायच्या ऎवजी आपण आपल्या सध्याच्या जीवनाला असं वळण देतो, ते असं बदलतो की पूर्वग्रहांना बदलायला नको! थोडक्यात म्हणजे आपण आपल्या जीवनात सत्य काय आहे हे जाणून घ्यायच्याऎवजी `सध्या मी आहे तसा सुखी आहे. आयुष्य आहे तसेच सतत असावे’ ह्या विचारप्रणालीचा पुरस्कार करतो व तेच आचरणात आणतो. आपली जर अशी अवस्था असेल तर आपले `आत्मरूप’ जाणून घ्यायची `स्वसंवेद्या’ हा मार्ग आपल्यापासून खूप दूर आहे हे आपण जाणले पाहीजे.

पूर्वग्रह ठेऊन जगणे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे चश्मे डोळ्यांवर ठेऊन जग पाहणे याउलट स्वसंवेद्याच्या मार्गावर चालणे म्हणजे जी गोष्ट आहे तशी स्वीकारणे. ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी अस्त्वित्वात राहू शकत नाहीत. म्हणुन जर आपले ध्येय `आत्मरूप’ जाणुन घेणे हे असेल तर आपली साधना सुरू होण्याकरता प्रथम आपले सर्व पूर्वग्रह जाणे ही एक आवश्यक गोष्ट आहे. जेव्हढे पूर्वग्रह कमी असतील तेव्हढी आपली दृष्टी निर्मळ होते, आपला मनरूपी आरसा स्वच्छ व्हायला लागतो व आपण आपली साधना सुरू करायच्या जवळ येतो.

पूर्वग्रह दूर करणे म्हणजे काय? जी गोष्ट आपण इतकी वर्षे जपत होतो ती आपण कशी सोडू? खरं म्हणजे आपण आपल्या जीवनात एक तरी गोष्ट, मानसीक किंवा शारीरीक सोडली आहे का? जरा विचार केला तर असं आढळून येईल की जेव्हा जेव्हा एखादी वस्तू आपण आपल्या आयुष्यातून काढली होती तेव्हा तेव्हा त्या घटनेच्या आधी ती वस्तू आपल्याकरीता चांगली नाही हे ज्ञान आपण मिळवले होते. नंतर आपोआपच ती वस्तू आपल्या जीवनातून गेली. उदाहरणार्थ, सिगारेट पीणारा अथवा अतिशय गोड खाणारा केव्हा त्या गोष्टी कमी करतो तर जेव्हा त्या गोष्टींचे दुष्परिणाम संपूर्णपणे जाणविल्यानंतरच. म्हणून एखादी गोष्ट आपल्याकरीता चांगली नाही हे पटल्यावरच ती गोष्ट आपल्या जीवनातून निघून जाते. ज्याप्रमाणे अर्जुनाच्या मनात दया आली तेव्हा त्याची वीरवृत्ती आपोआप निघून गेली व कुरुक्षेत्रात त्याने युध्दाला नकार दिला त्याचप्रमाणे आधी आपणांस हे जाणविले पाहिजे की पूर्वग्रह धरून जगण्यामध्ये एक सुरक्षितता असली तरी ती चांगली नाही. अस्वलाच्या तावडीतून सुटण्याकरीता वाघाच्या गुहेत शिरण्यामध्ये जी सुरक्षितता आहे तीच सुरक्षितता जीवनातील अनियमीतता टाळण्याकरीता पूर्वग्रह वापरण्यामध्ये आहे! वाघ गुहेत आल्यावर ज्याप्रमाणे आपल्याला पळून जायला वाव नसतो, त्याचप्रमाणे आपली मते एकदा का ठाम झाली की सत्य म्हणजे काय हे कळायला मार्ग नसतो. ही गोष्ट आपण जाणून घेतली पाहिजे. त्याकरीता, आपल्या जीवनात ठाम मतांमुळे किंवा पुर्वग्रहांमुळे आपण चुकीचा अर्थ काढतो हे जेव्हा आपणांस जाणविते तेव्हा आपली मतं चुकीची आहेत हे मान्य करून ती बदलणं हा एकच मार्ग आहे. दररोजच्या जगण्यामध्ये असं न चुकता वागणं म्हणजेच आपले पुर्वग्रह दूर करणं हे होय. हे सर्व केल्यानंतरच आपल्या मनात उठणाऱ्या संवेदना आपण जाणून घेण्याच्या पातळीला येतो. अशाच वेळी स्वसंवेद्या ह्या मार्गाच्या सुरुवातीला येतो. एव्हरेस्ट शिखराच्या पायथ्यापाशी जाण्याकरिताच अनेक डोंगर पार करावे लागतात तशीच ही तयारी आहे. अजून डोंगर चढायला सुरुवातसुध्दा झालेली नाही! एखाद्या पडिक, बुजलेल्या विहिरीतला झरा जिवंत करायला विहिरीतला गाळ काढून टाकणे हे जरूरीचे आहे, त्याप्रमाणे आपले पुर्वग्रह काढून टाकणे हे जरूरीचे आहे. आरसा धुवून, पुसून स्वच्छ केल्यावरच खरं प्रतिबिंब दिसू शकते. तसंच आपली ठाम मते गेल्यावरच सत्य रूप दिसते. बागेतील तण काढताना ते का आले, कसे आले याचा विचार न करता ते सर्व काढायचेच असतात त्याचप्रमाणे आपली ही मते कशी आली व आत्तापर्यंत ती का मी ठेवली याचा विचार न करता ती सर्व काढायची आहेत. हीच आपली साधना आहे. ह्या साधनेद्वारे आपले मन अधिक संवेदनाशील होते व वस्तुस्थिती आहे तशी जाणुन घ्यायचा मानसिक लवचिकपणा प्राप्त होतो. ह्या साधनेची गोडी लागुन त्याप्रमाणे आपले आचरण होत राहिले की आपल्या ह्र्दयातील सद्‌गुरू प्रसन्न होऊन पुढचा मार्ग दाखवतात व आपले आत्मरूप आपल्याला दिसू लागते.

पहिल्या ओवीमध्येच ज्ञानेश्वरांनी असा साधनेचा राजमार्ग उघडून दिला आहे. मनाचा दृढ निर्धार करुन आयुष्यभर ह्या मार्गावर चालणे हा एकच ज्ञानेश्वरीचा आपल्याला आदेश आहे. गणितातील एखाद्या अज्ञात गोष्टीला आपण `क्ष’ असे नाव देतो व गणिताच्या शेवटी (जर बरोबर सोडवले तर!) आपोआप क्ष ची किंमत कळते त्याचप्रमाणे आत्मरूपाला आपण सध्या क्ष म्हणुया व जीवनामध्ये कधीतरी ह्या क्ष ची किंमत जाणुन घेऊया.

 

परंपरेचे व गुरुचे महत्व

 

आत्तापर्यंतच्या साधनेच्या सर्व गोष्टी अंतर्गत आहेत. तेव्हा साधकाच्या मनात बाह्य साधनांच्या आवश्यकतेबद्दल शंका येण्याची शक्यता आहे. त्याबाबत आपण आता विचार करूया. नेमाची ध्यानसाधना, वार्षिक नवरात्र साधना किंवा उत्सवातील साधना, गुरूचरित्राची पारायणे ह्या बाह्य साधनांमुळे आपले जीवन अधिक संवेदनाशील कसे होईल? पहाड चढताना निसरड्या बर्फावर चालण्याकरीता लोखंडी खिळ्यांचा तळवा असलेल्या बुटांची आवश्यकता असते. गाळ साचलेल्या विहिरीला साफ करण्याकरिता विविध साधनांची जरूरी भासते किंवा आरशाला साफ करण्याकरिता साबण, पाणी, कपड्याची गरज असते. त्याचप्रमाणे आपल्या मनातील पूर्वग्रहांचा निचरा करताना ज्या बिकट मनःस्थितीला सामोरे जावे लागते त्याकरिता गुरूचे पाठबळ, परंपरेवर श्रध्दा आपल्या बरोबर असणे ही जरूरीची गोष्ट आहे. आत्तापर्यंत जीवनात आपण दुसऱ्यांचा विचार करुनच वागत आलेलो आहोत. म्हणून आपलं या जगात खरं कोणीही नाही ही भावना जागृत झाल्यावर आपला प्रचंड गोंधळ उडण्याची शक्यता असते. अशा अनेक मानसिक घडामोडींना या साधनेत सामोरे जायचे असते. अशा वेळी एकच खंबीर आधार म्हणजे आपली गुरूवर, परंपरेवर असलेली श्रध्दा. ही श्रध्दा आपल्यामधे आहे ही जाणीव, ही संवेदना निर्माण होण्याकरीता आपल्याला गुरूने, परंपरेने घालून दिलेले नियम व रिवाज तंतोतंत पाळले पाहिजेत. त्या योगे आपल्या मनातील श्रध्देला बाह्यरुप मिळते व ती अधिक दृढ बनते. साधनेतील अनेक आणिबाणीच्या क्षणी ह्या श्रध्देची जरूरी भासते. म्हणुन आपण सर्वांनी परंपरायुक्त साधना चालू ठेवलीच पाहिजे. त्याच्या जोडीला अंतर्गत साधना चालु ठेवली की बाह्य साधनेचा खरा ऊपयोग होतो, सद्‌गुरू प्रसन्न होतो व आपली प्रगती व्हायला लागते.