गीता श्लोक (१४ आणि १५)/२: तटस्थतेचे मूलभूत महत्व

 

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः ।

आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत ॥ श्लोक १४ : २ ॥

यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ ।

समदुःखसुखं धीरं सोऽमृतत्वाय कल्पते ॥ श्लोक १५ : २ ॥

ज्याप्रमाणे देहाला कुमारत्व, यौवन आणि वृध्दापकाळ येतो त्याचप्रमाणे आपल्या शाश्वत अस्तित्वाला निरनिराळ्या देहांमधून जावे लागते असे भगवंतांनी अर्जुनाला सांगितल्यावर त्याच्या मनात असा संदेह उत्पन्न झाला की परमार्थातील ही सर्वात गूढ गोष्ट एवढी सरळ आणि सोपी असली तर या जगात कुणालाच ती कशी माहिती नाही?

आपल्या मनाची काय गंमत असते बघा. स्वतःला बदलण्यास ते इतके नाखूश असते की आहे तसे राहण्यास ते सतत कारणे शोधीत असते. म्हणूनच, परमार्थामध्ये आपणास एखादा मार्ग आढळला तर त्याच्यात दोष काढून वा आपल्यातील तो मार्ग चालण्याची अक्षमता दाखवून आपण त्याच्यावर चालण्याचे टाळतो. उदहरणार्थ, हिमालयात जाऊन एकांतात तपश्चर्या करावी असे ऐकले की वाटते आपल्याला हे काही जमणार नाही. याउलट घरबसल्या वेळ मिळेल तेव्हा भगवंताचे नाम घ्या असे कुणी सांगितल्यास वाटते की मोक्ष मिळणे एव्हढे सोपे असते तर जगात सर्वांनाच मुक्‍ति मिळाली असती की. आणि या कुशंकेच्या प्रभावाने सरळ, साधे आणि सोपे नाम घेण्यातही आपण कुचराई करु लागतो! थोडक्यात म्हणजे आपली सद्यपरीस्थिती बदलणे अत्यंत जरुरी आहे हे कळले तरीसुध्दा सध्या आहे तसेच जीवन पुढे ढकलण्याकरीता आपण सतत उत्सुक असतो.

त्यामुळे अर्जुनाच्या मनात भगवंतांच्या सांगण्याबद्दल वरील शंका उत्पन्न होणे अगदी साहजिक आहे. साधनेच्या दृष्टीकोनातून श्रीमद्भगवद्गीतेकडे पहायाचे ठरविल्यास कुरुक्षेत्रावरील संभ्रमयुक्‍त अर्जुन म्हणजे अतिशय प्रामाणिक साधकाचे रुपक आहे हे पदोपदी जाणविते. आपल्या मनात अध्यात्माबद्दल अतिशय ओढ असली तरी दैनंदिन जीवनात त्या आकर्षणास कसे दृष्य रुप द्यावे याबद्दल आपण भांबावलेलोच असतो. भगवद्गीतेच्या सुरुवातीस अर्जुनाच्या हातातून धनुष्य गळून जाणे याच वस्तुस्थितीचे प्रतीक आहे असे वाटते. आणि आत्ताही भगवंतांनी जीवनाचे खरे रुप अत्यंत थोड्या शब्दात स्पष्ट केल्यावरही त्याच्या मनाची चलबिचल आपल्या साधनेबद्दलच्या संदेहांना दर्शवित आहे. अर्थात भगवंतांना त्याच्या मनात काय गडबड चालली आहे याचे पूर्ण ज्ञान आहे. म्हणूनच त्याने आपले मन शब्दांच्या माध्यमातून व्यक्‍त करण्याआधीच त्याच्या शंकांचे उपशम करीत ते म्हणतात की: ‘जेव्हा इंद्रियांचा विषयांशी संयोग होतो तेव्हा त्यायोगे आपल्यामध्ये शीत वा उष्ण इत्यादी कधी सुखद तर कधी दुःखद भावना निर्माण होतात. त्या निरनिराळ्या भावना जशा येतात तशाच निघूनसुध्दा जातात. त्यामुळे त्या अनित्य असतात. (हे पूर्णपणे जाणून घेऊन) हे अर्जुना त्यांना तू सहन कर (किंवा, त्यांच्यावर उपाय शोधण्यापेक्षा त्यांना सहन करणेच योग्य आहे हे तू जाणून घे.) (श्लोक १४). स्वतःच्या शाश्वत (म्हणजे जे कधीही मृत होत नाही असे, म्हणजेच अमृतमयी रुप) अस्तित्वाला जाणण्यासाठी या सुखदुःखादी भावनांच्या कल्लोळात स्वतःला आंदोलीत होऊ न देणे जरुरी आहे. (भावनांच्या अनित्यतेला जाणल्यामुळे जो त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो अशा) शहाण्या माणसालाच या (सकृतदर्शनी सोप्या) अमृतमयी सत्याचे ज्ञान होते (श्लोक १५).

बंगलोरमध्ये जवळजवळ सर्व वर्षभर हवामान सुखद असते. इथे उन्हाळ्यात फार गरम होत नाही आणि हिवाळ्यात कडाक्याची थंडी पडत नाही. परंतु या नियमाला एप्रिल महिना अपवाद आहे. या महिन्यात इथे खूप गरमी असते. परंतु हा एक महिना काढला की तपमान चांगले असते या ज्ञानामुळे अजूनही कित्येक घरांमध्ये पंखा बसविलेला नाही. असे बघा, जेव्हा दुःख थोडा काळच टिकणारे आहे याची जाणीव असेल तर आपण त्यावर उपाय शोधण्यापेक्षा कळ सोसणे रास्त समजतो. ज्ञानी मनुष्य आपल्या मनातील भावनांकडे अगदी अशाच नजरेने बघत असतो. आपल्या मनाचे नैसर्गिक चांचल्य कुठल्याही भावनेला निरंतर अस्तित्वात ठेऊ शकत नाही हे जाणून तो शांतपणे तीच्याकडे बघत असतो.

परमार्थात काही लोक असे म्हणतात की जीवनातील दुःखाकडे तेसुध्दा आपल्याला हितकारक आहे या भावनेने बघा, तर काहीजण दुःखालासुध्दा तुम्ही सुखच माना असा उपदेश करतात. गंमत म्हणजे आपल्या उपदेशांना आधार म्हणून सर्वजण एका भगवद्गीतेचाच आधार देतात! परंतु इथे भगवंतांनी अर्जुनाला असा कुठलाही उपदेश केलेला नाही हे ध्यानात घ्या. येणारे दुःख जर आपोआप जाणार आहे तर कशाला चिंता करतोस असे तर ते म्हणत आहेत. आणि यात त्यांचे भिन्नत्व दिसून येतेच. परंतु याहीपुढे जाऊन त्यांनी वरील श्लोकांमध्ये सुखालासुध्दा दुःखाच्याच बरोबर मानले आहे. त्यांची हा दृष्टीकोन अतिशय म्हणजे अतिशयच भन्नाट आहे! इथे आपण सर्व दुःखरहित सुखाच्या शोधात आहोत आणि भगवंतांना या दोन परस्परविरोधी गोष्टींतही साम्य दिसत आहे. म्हणजे, जीवन जगण्याचा आपल्यासारख्यांचा उद्देश्यच ज्या सुख आणि दुःख यांच्या भिन्नत्वाच्या पायावर अवलंबून आहे तो पायाच हे दोन्ही एकच आहेत असे म्हणून भगवान हिरावून नेत आहेत.

आपणास अत्यंत भिन्न भासणाऱ्या या गोष्टी कुठल्या स्तरावर समान आहेत? या प्रश्नालासुध्दा त्यांनी फार सुंदर उत्तर दिले आहे. त्यांच्या अनित्यतेमध्ये सुख आणि दुःख समान आहेत. जसे एक महिन्याचा उष्मा निघून जाणार आहे त्याचप्रमाणे अकरा महिन्यातील सुखद हवामानही पुढच्या एप्रिलमध्ये निघून जाणार आहे इकडे भगवंत आपले लक्ष वेधून घेत आहेत. त्यामुळे त्यांचा उपदेश काय आहे? तर या दोन्ही गोष्टींकडे दुर्लक्ष कर. या गोष्टी वाईट आहेत असे ते म्हणत नाहीत तर अनित्य आहेत आणि म्हणून शहाणी माणसे त्यांच्या नादाला लागत नाहीत. कारण त्यांचे लक्ष जे सदा सर्वदा आहे, ज्याचा कधीही नाश होत नाही अशा स्वरुपाकडे लागलेले असते. भगवद्गीतेमध्ये एक गोष्ट अतिशय प्रकर्षाने जाणविते. ती म्हणजे इथे कुठल्याही एका गोष्टीची बाजू घेतलेली नाही (उदाहरणार्थ दुःख वाईट आणि सुख चांगले वा सुख नको आणि दुःख हवे असे कुठेही म्हटलेले नाही). म्हणूनच जेव्हा ज्ञानी माणसाला शत्रू नसतात असे सांगितले जाते तेव्हाच त्याला मित्रही नसतात हेसुध्दा स्पष्ट केले जाते. जीवनातील सत्याचे रुप दाखवायचा अतिशय प्रामाणिक प्रयत्‍न या अद्वितिय ग्रंथात केलेला आहे. त्यातून प्रत्येकजण आपल्याला सोयीस्कर असा अर्थ काढून जीवन जगायचा प्रयत्‍न करीत आहेत आणि त्यांच्या या सर्व प्रयत्‍नांना गीतामाउलीचा संपूर्ण आशीर्वादच आहे!

॥ हरि ॐ ॥

 

लेखक: Shreedhar

I finished Ph.D. in mathematics in 1991. Since 1996, I am making sincere efforts to see the relevance of the ancient Indian teachings in the modern world.

यावर आपले मत नोंदवा