शिष्यांचे कर्तव्य

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

म्हणोनि साधकां तूं माउली । पिके सारस्वत तुझिया पाउलीं ।

या कारणे मी साउली । न संडी तुझी ॥ ८:१२ ॥

स्वामी सत्यदेवानंद सरस्वती असे म्हणायचे की आपण दुधासारखे आहोत आणि सद्‌गुरु नवनीत. गुरुंचा अनुग्रह किंवा कृपा म्हणजे दह्याचे विरजण आहे. आपल्या जीवनाच्या दुधात ते मिसळून मग स्वतः स्तब्ध राहिले की आपले दह्यात रुपांतर होते. मग नंतर (वैराग्यरुपी) घुसळण करुन आपणही लोणी होऊ शकतो. लक्षात घ्या की गुरुकृपा झाली तरी शिष्याला त्या कृपेचा जास्तीतजास्त फायदा होण्यास स्वतःची जीवन जगण्याची पद्धत बदलणे जरुरी असते. बाराव्या अध्यायातील गुरुस्तुतीची ही अंतिम ओवी गुरुकृपेचा योग्य विनियोग कसा करायचा आणि तो केला तर शिष्यांचे जीवन कसे सहजपणे बदलते याचे वर्णन करीत आहे. माउली म्हणत आहे `म्हणून (आधीच्या तीन ओव्यांना धरुन) शिष्याला तू खरोखर आईसारखी दिसतेस. तुझ्या सल्ल्यानुसार वागल्यावर जीवनाचा खरा अर्थ कळायला लागतो. म्हणूनच मीसुद्धा (ज्ञानेश्वर महाराज इथे स्वतःचा संदर्भ देत आहेत) तुझ्या कृपेच्या आधारावरच आपले आयुष्य व्यतीत करीत आहे.

एखाद्याच्या पाउलावर पाऊल टाकून जाणे याचा सर्वसाधारणपणे अर्थ दुसऱ्याच्या वर्तनाप्रमा णे वागणे असा होतो. परंतु परमार्थात जन्मतःच आपला स्वतःचा मार्ग ठरलेला असतो. हा जन्मजात मार्ग आपल्या पूर्वकर्मे आणि प्रवृत्तींवर आधारित असतो, त्यांच्याशी सुसंगत असतो. स्वतःला चपखलपणे लागू होणाऱ्या या मार्गाने साधक फार लवकर प्रगती करु शकतो. आपल्या स्वतःला आपली पूर्वजन्मींतील कर्मे आणि या जन्मातील प्रवृत्ती या जगात दुसऱ्या कुणाचीही असत नाही. म्हणून कुणाची नक्कल करुन स्वतःची प्रगती लवकर होत नाही. अर्थात्‌ सद्‌गुरुंना याची जाणीव असते आणि आपल्या सद्यपरिस्थितीचे संपूर्ण ज्ञान असते. म्हणून ते शिष्याला जो सर्वात सोयीस्कर आहे तोच मार्ग चोखाळायला सांगतात. ते स्वतः केलेली साधना त्याच्यावर लादत नाहीत. म्हणूनच समर्थांनी कुठल्याही शिष्याला बारा वर्षे गोदावरीच्या पाण्यात उभे रहायला सांगितले नाही. आणि स्वामी स्वरुपानंदांनी एकाच ७ बाय १२ च्या खोलीत पंचवीस वर्षे रहायचा सल्ला कुणाला दिला नाही. याचे अजून एक उदाहरण म्हणजे रामकृष्ण परमहंसांनी आपल्या नऊ संन्यासी शिष्यांना अगदी वेगवेगळी साधना सांगितली होती आणि त्यातील कुठलीही त्यांच्या स्वतःच्या साधनेची नक्कल नव्हती! त्यामुळे वरील ओवीतील “मी तुझ्या पाउली रहायला तयार आहे” या शब्दांचा अर्थ ‘मी तुमचे अनुकरण करीन’ असा न घेता ‘तुम्ही मला जो उपदेश केलेला आहे त्याप्रमाणे माझे आयुष्य जगायची मी तयारी ठेवलेली आहे’ असा घ्यायला हवा. सद्‌गुरु जीवनात येण्याआधी आपण आपल्या पूर्वकर्मांबद्दल आणि स्वतःच्याच मूळ प्रवृत्तीबद्दल अनभिज्ञ असतो. संगतीने वा आपोआप येणाऱ्या विचारांवर आपण आपले आयुष्य उभारलेले असते. त्यामुळे आपले सवयीनुसार होणारे वर्तन साधनेच्या दृष्टीने योग्य असेलच असे खात्रीपूर्वक सांगता येत नाही. किंबहुना ते तसे नसण्याचीच शक्यता जास्त असते असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. म्हणूनच सद्‌गुरुंच्या आदेशानुसार वागताना आपल्या सवयींना मुरड घालणे अत्यावश्यक ठरते. जेव्हा आपली सवय व सद्‌गुरुंचा आदेश यांमध्ये संघर्ष निर्माण होतो त्या प्रत्येकवेळी शिष्याला एक निर्णय घ्यावा लागतो. तो म्हणजे आत्तापर्यंत लागलेल्या सवयींनुसार वागायचे की त्या बदलायच्या. साधकाचे हे कर्तव्य असते की पूर्वाश्रमीच्या सवयींकडे दुर्लक्ष करुन नव्या आयुष्याची सुरुवात करणे. असे सातत्याने जो वागतो त्याने स्वतःला स्तब्ध करुन गुरुकृपेच्या विरजणाला वर्धन होण्याची मुभा दिली आहे असे आपण स्वामी सत्यदेवानंदांच्या शब्दांचा आधार घेऊन म्हणू शकतो.

आपल्या स्वतःच्या जीवनाला आकार सवयींनीच आलेला असतो. त्यामुळे त्यांना सोडून जेव्हा आपण जगात वावरायला सुरुवात करतो तेव्हा जणू नव्या आयुष्याची सुरुवातच आपण केलेली असते. या अर्थाने अनुग्रहानंतर आपला नवा जन्म झालेला असतो असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. म्हणूनच सद्‌गुरु अनुग्रह देताना “आता तुझे आयुष्य या क्षणापासून सुरु झाले आहे असे समज” असे सांगतात. एकदा आपण गुरुंचे पाय (वरील अर्थाप्रमाणे) घट्ट धरुन ठेवले की नेहमीच्या जीवनातच आपणांस नवीन अर्थ दिसायला लागतात. प्रत्येक गोष्टींतील सुप्त सौंदर्य दिसायला लागते. दैनंदिन जीवनात होणाऱ्या सर्वसामान्य घटनांकडे बघायची आपली नजर जेव्हा बदलते तेव्हा आपल्या मनात वेगळीच समज यायला लागते. आणि समोर आलेल्या घटनांतून आपण पारमार्थिक गोष्टी शिकायला लागतो म्हणून याला सारस्वत (सरस्वतीच्या (म्हणजे ज्ञान प्रदान करणाऱ्या देवतेच्या) कृपेने उत्पन्न झालेले) असे म्हटले आहे असे आपण समजू शकतो. ‘पिके सारस्वत तुझ्या पाउली’ या एका चरणातून माउलींनी गुरुपोनिर्दिष्ट मार्गावर प्रामाणिकपणे चालण्याच्या क्रियेने शिष्याच्या मनात बदल कसा होतो याचे सुंदर वर्णन केले आहे असे वाटते.

शेवटच्या दोन चरणांतून ज्ञानेश्वर महाराज स्वतःचे उदाहरण देऊन आपणांस या मार्गावर चालण्यास उद्युक्त करीत आहेत. सामान्यपणे मनुष्य शरिरीक कष्ट सहन करु शकतो पण आपल्या मनाला लागलेल्या सवयी मोडायला तयार होत नाही. याचे कारण असे की आपण कोण आहोत याची स्वतःच्या मनात असलेली संकल्पना आपल्या सवयींवर अवलंबून असते. आत्तापर्यंत आलेल्या अनुभवांवर आधारित जे काही अंदाज आपण बांधलेले आसतात त्यांना मोडीत काढणे फार कठीण ठरते. विशेषतः ज्यांनी स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवला आहे त्यांना. शेवटची दोन चरणे अशा बुद्धीवर विश्वास ठेवणाऱ्या साधकांना उद्देशून लिहिली आहेत असे वाटते. खुद्द मीसुद्धा याच मार्गाने चालून सिद्ध झालो आहे असे माउली जेव्हा म्हणते तेव्हा आपण स्वतःच्या बुद्धीला सोडायला तयार होतो. कारण माउलींच्या बुद्धीसमोर आपली हुशारी काहीच नाही याची जाणीव आपणा सर्वांना आहे. जर खुद्द माऊली स्वतःच्या बुद्धीला बाजूला सारुन सद्‌गुरुंच्या आदेशानुसार वर्तन करीत असेल, तर का म्हणून आपण आपल्याच हुशारीला कवटाळून बसायचे?

अशा रीतीने बाराव्या अध्यायातील सद्‌गुरुस्तवनावरील विवेचन गुरुकृपेने संपूर्ण झाले आहे. यानंतर आपण तेराव्या अध्यायाच्या सुरुवातीला केलेल्या गुरुस्तुतीवर विचार करण्यास सुरुवात करु. इति.

॥ हरि ॐ ॥