1/17: Gurukrupa is a beginning and an end

 

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

विश्वविकासितमुद्रा । जया सोडवी तुझी योगनिद्रा ।

तया नमो जी गणेंद्रा । श्रीगुरुराया ॥ १ : १७॥

 

श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या अलौकिक प्रतिभेचे स्पष्ट दर्शन त्यांनी रचलेल्या गुरुस्तवनांतून होते. तुम्ही बाराव्या अध्यायातील ‘जय जय वो शुध्दे, उदारे प्रसिध्दे, अनवरत आनंदे, वर्षतिये’ बघा, चौदाव्या अध्यायातील ‘जयजय आचार्या, समस्तसुरवर्या’ वाचा वा पंधराव्या अध्यायातील ‘आता ह्रुदय आपुले, चौफाळूनिया भले, वरी बैसवू पाऊले’ याकडे नजर टाका. या सर्व आणि ज्ञानेश्वरीतील इतर गुरुस्तवनांतून माउलींची आपल्या गुरुंवरची अपार श्रध्दा, विश्वास नजरेस येते आणि त्यांच्या कवित्वाला आलेला बहार दिसून येतो. श्रीमद्भगवद्गीतेवरील आपल्या टीकेचे, म्हणजे ज्ञानेश्वरीचे, सर्व श्रेय ते आपल्या गुरुंना म्हणजे श्रीसंत निवृत्तिनाथांना वेळोवेळी अर्पण करतात. स्वतःला निवृत्तिदास या नावाने संबोधित करुन त्यांनी असे सूचित केले आहे की ज्याप्रमाणे दासाच्या मुखातून त्याच्या स्वामीची आज्ञा सामान्य लोकांना ऐकायला मिळते त्याचप्रमाणे माझ्या मुखातून तुम्हाला निवृत्तिनाथांचे ज्ञान ऐकायला मिळत आहे. ज्ञानेश्वरीतील ‘निवृत्तिदास’ या शब्दाचा अर्थ ‘ज्याच्या मुखातून निवृत्तिनाथ बोलत आहेत तो’ असा असणार असे वाटते. असो.

आज निरुपणाला घेतलेल्या ओवीमध्ये आपल्या गुरुंना सर्व जगाचे स्वामी (गणेंद्र = सर्व गणांचा इंद्र, राजा) असे संबोधून महाराज म्हणत आहेत: ‘तुझ्या योगनिद्रेतूनच हे सर्व विश्व विकसित होऊन स्थित झाले आहे अशा सर्व चराचराच्या स्वामीला मी गणेशरुपात वंदन करतो.’ ह्या ओवीतील ‘जया सोडवी तुझी योगनिद्रा’ या पदाचा अर्थ ‘तुझ्या निर्विकल्प समाधितूनच हे विश्व निर्माण झाले आहे’ असा घेतला आहे. परंतु सोडवी ह्या शब्दाचा आधार घेऊन ह्या ओवीचा असाही अर्थ घेता येईल: ‘माझ्या अवतिभोवति हे जे विश्व पसरलेले आहे (विश्वविकासितमुद्रा), त्यापासून माझी सुटका करण्यास तुझी निर्विकल्प समाधी हाच एक उपाय आहे. म्हणून या विश्वापेक्षाही तू मोठा आहेस, गुरु आहेस. तुझ्या सर्व गणांच्या स्वामीरुपाला माझा नमस्कार असो.’ माउलींनी अशी शब्दरचना केली आहे की तुझ्या निर्विकल्प समाधीमुळे हे विश्व निर्माण झाले आहे आणि तुझ्या निर्विकल्प समाधीमध्येच या विश्वापासून सुटका आहे असे दोन्ही अर्थ एका वाक्यातून निघू शकतात! यापैकी कुठला अर्थ बरोबर असा विचारले तर असे वाटते की दोन्ही अर्थ बरोबर आहेत! हे कसे होऊ शकेल ते बघायचा आपण आज प्रयत्‍न करुया.

 

श्रीज्ञानेश्वरीचे करिता चिंतन । चित्ती उठे जे जे स्फुरण ।

ते ते असे आपुलेंच दर्शन । ‘भावार्थदिपिका’ म्हणजे निर्मळ दर्पण ॥

 

दररोजच्या व्यवहारात आपण बघतो की ‘जशी आपुली दृष्टी, तशीच दिसे सृष्टी’. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्‍तीबद्दल आपले मत चांगले नसेल तर त्या व्यक्तीने केलेल्या सत्क्रियेंमागेही आपणास स्वार्थच दिसू लागतो. याउलट प्रेमाने आंधळ्या झालेल्या मातेस आपल्या ‘सुपुत्रात’ एकही अवगुण दिसत नाही. म्हणजे काय तर आपली जशी मनोवृत्ती असते तशीच आपली घटनांबद्दलची भावना तयार होते. हीच गोष्ट कुठल्याही पुस्तकालासुध्दा लागू पडते. लेखकाच्या वाक्यांचा त्याच्या मनातील अर्थ आपणास ठाउक नसल्याने त्याने वापरलेल्या शब्दांचे आपल्या जीवनातील प्रतिबिंब आपण बघतो आणि तोच अर्थ लेखकाला अभिप्रेत आहे असे मानतो. परब्रह्माचे ‘सच्चिदानंद’ असे वर्णन केलेले ऐकून आपण भगवंताला आनंदरुपात बघतो पण आनंद म्हणजे काय याची व्याख्या प्रत्येक साधकाच्या मनात भिन्न असते. एखादा साधक प्रतिकूल परिस्थितीशी सामना करीत असला तर त्याच्या मनात आनंद म्हणजे नित्य अनुकूल स्थिती अशी भावना होते तर जो जन्मापासूनच अनुकूल स्थितीमध्ये वाढला आहे त्याच्या मनात आनंद म्हणजे मानसिक शांति हे समीकरण निर्माण होते. गंमत म्हणजे प्रत्येकाला आपल्या मनातील अर्थच खरा आहे आणि बाकीच्यांना बरोबर कळले नाही असे वाटत असते! सर्वसाधारण पुस्तकाला जर ही गोष्ट लागू पडते तर श्रीज्ञानेश्वरी सारख्या प्रतिभेचा आणि तत्वज्ञानाचा सर्वोत्कृष्ट आविष्कार असलेल्या कलाकृतीबद्दल बोलायलाच नको. महाराजांनी इतकी गूढ गोष्ट प्रगट केली आहे की त्यात आपणास हवे ते दिसेल. म्हणूनच लोकमान्य टिळकांना गीतेमध्ये कर्मयोग दिसला तर आचार्य विनोबा भाव्यांना भक्‍ती दिसली. जसा ज्याचा भाव तसा त्याचा देव आणि तशी त्याची ज्ञानेश्वरी. आता ह्या वस्तुस्थितीचे प्रतिबिंब वरील ओवीत कसे दिसू शकेल हे बघा.

गुरुंकडे जाणारे बहुतांशी साधक व्यावहारिक जीवनाला तोंड देताना थकून गेलेले असतात. स्वतःच्या मनातील आकांक्षा आणि प्रत्यक्ष समोर येणारी परिस्थिती यामधील विसंगतींमुळे त्यांच्या मनात प्रचंड वादळ उठलेले असते. आपले जीवन अजून परिपूर्ण करण्यासाठी आता काय करावे हे त्यांना सुचत नसते आणि एक आधार म्हणून ते गुरुंकडे येतात. अशा प्रवृत्तीपेक्षा थोडी वेगळी वृत्ती असलेल्या साधकांचे जीवन सुरळीत असते. अथक परीश्रमाने मिळविलेल्या अनुकूल परिस्थितीबद्दल त्यांना वृध्दाप्यकाळी झालेल्या एकुलत्या एक संतानावरील प्रेमासारखी अतीव आत्मियता असते. सद्यपरिस्थिति चांगली आहे आणि ती तशीच रहावी याचा एक उपाय म्हणून ते गुरुंकडे येतात. तरुणपणीच आपण विमा काढतो आणि त्याचे हप्ते वेळच्यावेळी देतो तसे हे साधक गुरु करतात कारण अडिअडचणीला गुरु उपयोगी पडतील म्हणूनच. गुरुंकडे सातत्याने जाणाऱ्या साधकांपैकी बहुतांशी साधक वरील दोन प्रकारात मोडतात. अशा साधकांची व्यावहारिक जीवनावर नियंत्रण मिळविण्याची धडपड निरंतर सुरु असते आणि ह्या उद्योगात ते स्वतःची कमजोरी ओळखून असल्याने गुरुंचा आधार घेतात. त्यांच्या जीवनात ‘ जया सोडवी तुझी योगनिद्रा’ या शब्दांचा एकच अर्थ असतो. तो म्हणजे: ‘या प्रपंचातील सर्व अडचणींतून तुझी शक्‍ती आम्हांस सोडवेल.’

आता दुसरे दृष्य बघा: असे फार विरळा साधक असतात की ज्यांना प्रपंचावर नियंत्रण मिळवायचे नसते तर प्रपंच म्हणजे नक्की काय आहे याचे ज्ञान मिळवायचे असते. हे ज्ञान झाले की आपणास भोवताली मनाजोगी परिस्थिती निर्माण करता येईल ही अपेक्षा त्यांच्या मनातसुध्दा नसते. निव्वळ जिज्ञासेपोटी ते गुरुंकडे आलेले असतात. अशा मोजक्या साधकांमध्येही स्वतः वेदांचा अभ्यास करुन त्यावर चिंतन-मनन करुन मग गुरुंकडे आलेले अजून विरळा. ह्यांना गुरुंकडे फार वेळ रहायची जरुरी नसते. गुरुंनी एखादे वाक्य बोलावे आणि ह्यांनी त्याचा बोध होइपर्यंत साधनेत रहावे. मग परत बोध झाल्यावर पुढचे गुरुवाक्य. कथोपनिषदामधील नचिकेत आणि यम यांचे संभाषण असे आहे. अशा साधकांना संपूर्ण खात्री झालेली असते की स्वतःच्या जीवनात आत्तापर्यंत बुध्दीचा उपयोग करुन जे मिळाले आहे ते सर्व मिथ्या आहे. जी गोष्ट खरी आहे ती मिळविता येत नाही तर आपोआप प्राप्त होते. सहज, कुठल्याही कष्टाशिवाय प्राप्त होणाऱ्या गोष्टीला कारण काय असे विचारले तर ते ‘गुरुकृपा’ असे उत्तर देतात. त्यांच्या जीवनात ‘जया सोडवी तुझी योगनिद्रा’ या पदाचा अर्थ ‘हे सर्व विश्व, त्यातील ज्ञान ज्या पायावर उभे आहे तो पाया तुझ्यामुळे आहे’ असा होतो. त्यांच्या स्वतःच्या जीवनातील सत्य परिस्थितीचेच ते प्रतिबिंब असते.

लक्षात घ्या की सर्व साधकांच्या जीवनात गुरु हा ‘गुरु’ आहे आणि ते ‘लघू’ आहेत ही वस्तुस्थिती आहे. परंतु तरीसुध्दा गुरुला गुरु का मानले यावर त्यांची साधना आणि साध्य अवलंबून असते. भगवंताकडे जायला हवे या भावनेने गुरुंकडे जाणाऱ्या साधकांनी आधी प्रपंचाबद्दल वैराग्य निर्माण करायला हवे. मगच त्यांना हे सर्व जग आनंदमयी दिसू लागेल (गुरुंनी निर्माण केले आहे ही भावना असेल तर आनंदच दिसणार, हो की नाही?!). समाजात पुढे जायची इच्छा मनात ठेवायची (म्हणजे इतरांनी आपल्यामागे असावे ही भावना ठेवायची!) आणि त्याबरोबरच त्यातून सतत सुखच मिळेल अशी अपेक्षा ठेवायची यापेक्षा अधिक विसंगती दुसरीकडे असेल असे वाटत नाही. एकतर तुम्हाला अवीट, अविनाशी सुख निरंतर मिळेल किंवा तुम्ही व्यवहारामध्ये नावाजलेले व्हाल. दोन्ही डगरींवर हात ठेवून आत्तापर्यंत कुणीही यशस्वी झालेला नाही. मग आपण कोण जगावेगळे लागून गेलो आहोत की जे आत्तापर्यंत कधी झाले नाही ते आपण करु शकू.

माउलींना निश्चितच हे जग त्यांच्या गुरुंनीच निर्माण केले आहे याबद्दल खात्री असणार. पण म्हणून आपल्या जीवनात वरील ओवीचा तोच अर्थ गोचर होतो असे मानण्यात अप्रामाणिकपणा आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आपल्या जीवनातील ज्ञानेश्वरी आपण स्वतःच ओळखली पाहिजे. त्यातच आपल्या साधनेची सुरुवात आहे.

 

॥ हरि ॐ ॥

 

(बंगलोर, दिनांक ३१ मे २००९)