गीता श्लोक ८/४: पापाची व्याख्या

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्‌ ।

धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥ गीता ८:४ ॥

श्रीमद्भगवद्गीतेतील वरील श्लोक सर्वश्रुत आहे. जगामध्ये जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा पापांचा विनाश करण्यास आणि सत्कर्म करणाऱ्यांचे रक्षण करुन परत धर्माचे संस्थापन करण्यास मी युगान्‌युगे जन्म घेत असतो असे भगवान या श्लोकातून अर्जुनाला सांगत आहेत. या श्लोकावर भाष्य करताना श्री ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले आहे की :

तै पापाचा अचळ फिटे । पुण्याची पहाट फुटे ।

जै मूर्ति माझी प्रगटे । पंडुकुमरा ॥ ज्ञा. ५६:४॥

ऐसेया काजालागीं । अवतरे मी युगी युगीं ।

परी हेंचि ओळखे जो जगीं । तो विवेकिया ॥ ज्ञा. ५७:४॥

अर्थ: अर्जुना, जीवनात पुण्याची पहाट येण्यास प्रतिबंध करणाऱ्या पापाचा पर्वत भगवंताच्या अवताराने नष्ट होतो आणि या एका कामासाठीच मी युगान्‌युगे जन्म घेत आहे. परंतु हे सत्य केवळ ज्ञानी मनुष्यच ओळखून असतो.

वरील दोन ओव्यांतून त्यांनी असे सूचित केले आहे की पापाचे निर्दलन करण्यास भगवान अवतार घेतात हे जाणण्यास विवेक जागृत असणे आवश्यक आहे. परंतु आपणा सर्वांनाच ( पुराणांतील कथा ऐकल्या असल्याने ) भगवान दुष्टांचा विनाश करण्यासाठी जन्म घेतात हे माहित आहे. त्यामुळे ही वस्तुस्थिती कळण्यास ज्ञानी होण्याची काय आवश्यकता आहे? असा प्रश्न याठिकाणी उद्भवणे साहजिक आहे. श्रीज्ञानेश्वर महाराजांचा श्रीज्ञानेश्वरीतील प्रत्येक शब्द अतिशय समर्पक असल्याने त्यांच्या तोंडून हे शब्द अनवधानाने निघाले असणे अशक्यच आहे. आज आपण या दोन ओव्यांचा नक्की काय अर्थ असेल याचा विचार करु.

प्रत्येकाच्या मनात जीवनात कित्‌पर्यंत नैतिक चुका केल्या तरी चालतील याची व्याख्या वेगळी असते. म्हणजेच पाप म्हणजे काय याची व्याख्या अत्यंत व्यक्तिगत आहे. त्यामुळे वरील ओव्यांत असणाऱ्या शब्दांमध्ये अत्यंत व्यक्तिगत अर्थ असणारा एक शब्द म्हणजे ‘पाप’ हा आहे. या शब्दाचा भगवंताच्या मनातील अर्थ ज्याला कळला तो ज्ञानी मनुष्य म्हटला जातो. म्हणून वरील ओव्यांचा गूढार्थ जाणण्यास या शब्दाचा खरा अर्थ काय असेल यावर विचार करणे जरुरी आहे.

सर्वात प्रथम लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे आपले आयुष्य आपण अनेक पातळ्यांवर जगत असतो. आणि पाप या शब्दाचा अर्थ प्रत्येक पातळीवर भिन्न असतो. उदाहरणार्थ, मी स्वतःचे रुप माझ्या देहापुरते सिमीत ठेवले तर या देहाला कष्ट देणाऱ्या गोष्टी करणे माझ्याकरीता पाप होते. शक्यतो देवाने दिलेल्या या देहाची काळजी घेणे हे साहजिकच पुण्य होते. जर माझ्या मनातील इच्छांना मी स्वतःचे रुप समजले तर आवडत्या माणसाकरीता देहाला कष्ट देण्यास मी पाप समजत नाही. समाजातील प्रतिष्ठेत मी स्वतःला पहायला लागलो तर आपले नाव बदनाम होईल असे वर्तन करणे पाप होते. माझे एकसंध असलेले अस्तित्व मी अशा अनेक पातळ्यांतील प्रतिबिंबात पहात असल्याने माझ्या मनात पाप म्हणजे काय याबद्दल अनेक परस्परविरोधी मते एकाचवेळी नांदत असतात! त्यामुळे मी रविवारी सकाळी शरीराला आराम होईल असे वर्तन आवडत्या माणसांना त्रास झाला तरी करतो, आणि कधीकधी त्यांचे मन सांभाळण्यासाठी स्वशरीराला कष्ट द्यायला मागेपुढे बघत नाही. पापाच्या अशा विभिन्न व्याख्या बघितल्या की प्रश्न निर्माण होतो की यपैकी कुठल्या पापांचे निर्दलन करण्यासाठी भगवान अवतार घेत असतील? याचे उत्तर अर्थातच असे की आपल्या सर्व पातळ्यांचे जे मूळ अस्तित्व आहे तिथे जे पाप होते त्याचे निर्दलन करण्यास भगवान आपल्या जीवनात अवतार घेतात. त्यामुळे आपण स्वतःचे जीवन पारमार्थिक पातळीवर ठेवले तर त्यामध्ये काय पाप असू शकेल? हा विचार करणे जरुरी आहे. या दृष्टीने भगवंतांनी अर्जुनाला गीतेमध्ये आत्तापर्यंत केलेल्या उपदेशाकडे बघितले तर उत्तर असे मिळते की भगवंताला विसरणे हे एकच पाप पारमार्थिक स्तरावर आहे. (पहा: गीतेतील तृतीय अध्यायातील ३०वा श्लोक: मयि सर्वाणि कर्माणि …) आणि पाप करताना जे काही कर्म आपल्या हातून होते ते दुष्कर्म असल्याने ज्या कुठल्या कारणाने आपण भगवंताला विसरतो ती सर्व कारणे दुष्कृते आहेत असे आपण मानायला पाहिजे. याचा अर्थ असा की भगवंताचे विस्मरण झालेले असताना जी काही कृत्ये माझ्या हातून घडलेली आहेत ती सर्व पारमार्थिक नजरेत दुष्कृत्य आहेत.

एकदा पाप म्हणजे काय हे नक्की झाले की असे लक्षात येते की आपण हे पाप करण्यास म्हणजे भगवंताला विसरायण्यास एकच कारण आहे. ते म्हणजे स्वतःच्या संसारात रमणे. माझा संसार अतिशय चांगला आहे म्हणून काहीजण रमतात तर बहुतांशी लोक माझा संसार मनासारखा होत नाही या रडगाण्यात रमतात! (इथे रमणे या शब्दाचा अर्थ स्वतःच्या मनात प्रामुख्याने एखादा विचार ठेवणे असा आहे. म्हणून रडगाणे गातानासुद्धा आपण त्यात रमलेलोच आहोत असे म्हणायला पाहिजे!) यातून दूर करायला भगवान आपल्या जीवनात जन्म घेतात. ज्याप्रमाणे कुरुक्षेत्रात अर्जुन ‘मी स्वतःच्या नातेवाईकांना कसे मारु?’ या विषादात रमल्यावर त्यातून बाहेर काढण्यास श्रीकृष्णांच्या रुपात भगवान अवतीर्ण झाले त्याचप्रमाणे ज्या गोष्टी वा घटना वा व्यक्ती आपणास संकुचित व्यक्तिमत्वातील फोलपणा दाखवितात त्या सर्व आपल्या जीवनातील भगवान आहेत असे विवेकी मनुष्य जाणतो. म्हणून निव्वळ त्यालाच भगवंताच्या वक्तव्यातील सत्यत्व जाणविते. महाभारतात कुंतीने श्रीकष्णांकडे ‘त्यायोगे मला तुझी आठवण प्रकर्षाने होईल’ असे म्हणून दुःखे मागितली. याचा अर्थ असा की स्वतःच्या जीवनातील दुःखांनाच भगवंताचा अवतार मानत होती!

सांगायची गोष्ट अशी की जेव्हा जीवनात आपण नक्की काय करत आहोत? असा प्रश्न जेव्हा मनात येतो तेव्हा आपल्या जीवनात भगवान अवतीर्ण झालेले आहेत असे आपण समजायला हवे. आणि भगवंतापासून दूर नेण्यास कारणीभूत असणारी आपल्या मनाची या संसारातील ओढ दुष्कृत्य आहे ही जाणीव ठेवायला हवी. असे करणाऱ्या माणसालाच वेदांतामध्ये सरासार जाणणारा विवेकी मनुष्य म्हटले आहे. ज्या साधकाची नजर संसारातून दूर नेणाऱ्या घटनांबद्दल सकारात्मक आहे त्यालाच भगवंताचे अस्तित्व जाणविते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. म्हणून माऊली म्हणतात की: परी हेंचि ओळखे जो जगीं । तो विवेकिया ॥. इति.

॥ हरि ॐ ॥