श्लोक (७१ आणि ७२)/२: ब्रह्मस्थितीची परीपूर्णता

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

विहाय कामान्‌ यः सर्वान्पुमांश्चरति निःस्पृहः ।

निर्ममो निरहंकारः स शांतिमधिगच्छति ॥ गीता ७१:२ ॥

एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति ।

स्थित्वाऽस्यामंतकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति ॥ गीता ७२:२ ॥

व्यवहारात निव्वळ भौतिक सुखसोयींमध्ये नव्हे तर अगदी नृत्य, गायन, क्रिडा इत्यादी हिशेबवहीच्या बाहेरील विषयांमध्येसुद्धा निरंतर प्रगतीची अपेक्षा असते. त्यामुळेच यंदाच्या वर्षी अमुक रकमेचा फायदा झाला की लगेच कंपनी पुढील वर्षाचे लक्ष्य त्याहून जास्त ठेवते आणि एखाद्या गायकाने ठराविक रागावर प्रभुत्व मिळविले की दुसरा राग शिकायची धडपड सुरु होते. या जगातील बहुतेक सर्व मंडळी जे सध्या आहे त्यापेक्षा अधिक चांगले कसे मिळेल या विचारत गुंगून गेले आहेत. ‘थांबला तो संपला’ ही म्हण या वस्तुस्थितीचे अगदी समर्पक वर्णन करते. भगवंतप्राप्तीचा आटापिटा आपण या पार्श्वभूमीवर सुरु केला असल्याने साधनेतही आपण एक टप्पा गाठला आहे हे कळले की प्रगतीचा पुढचा टप्पा कधी आवाक्यात येईल इकडे सतत बघत असतो. वारीला जाऊन आले की श्रावण महीन्यातील व्रते आणि मग नवरात्रीची उपासना आणि नंतर मार्गशीर्षातील साधना असा आपला क्रम अव्याहत चालू असतो. आपले हे प्रयत्न निःसंशय जरुरी आहेत. परंतु या सर्व उपायांमध्ये साधनेच्या सुरुवातीलाच ‘ती कधी संपणार’ याची तरतूद आपण केलेली असते ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे! उदाहरणार्थ वारी आषाढी एकादशीला समाप्त होते, श्रावण महीना भाद्रपदात विलीन होतो आणि नवरात्राची सांगता विजयादशमीत होणार असते. अगदी दररोज उठून ध्यान करणे या क्रियेकडे जरी बघितले तरी ध्यान संपले की काय करावे याचा विचार आपण बहुतेक वेळा ध्यान सुरु करण्याच्या आधीच केलेला असतो असे दिसून येते आणि वर्षोनुवर्षे इष्टदेवतेच्या नामजपामध्ये रमणाऱ्यांनासुद्धा जपफलाची म्हणजे साक्षात्काराची ओढ असते. थोडक्यात सांगायचे झाले तर परमार्थातही आपण सतत प्रगतीच्य मागे लागलेलो असतो. आपले ध्येय ‘जे स्वयंभू आहे त्या अवस्थेमध्ये आयुष्यभर रहायचे आहे’ याची जाणीव आपणापैकी अतिशय दुर्मिळ लोकांना असते.

निरंतर प्रगतीचे विचार आपणा सर्वांच्या मनात असण्याचे महत्वाचे कारण म्हणजे आपण असे ठीकाण वा मानसिक अवस्था बघितलीच नाही की जी स्वतः निरंतर स्थिर आहे. आज स्वच्छ दिसलेले पाण्याचे तळे उद्या अस्वच्छ डबके होते आणि आज अतिशय आदर्श वाटणारी व्यक्ती सवयीची झाली की सामान्य होते असाच आपला अनुभव आहे. मनात घर करुन बसलेले आदर्श विचारसुद्धा आचरणात आणायला लागले की व्यावहारीक तडजोडींच्या संगतीने बदलायला लागतात. ‘स्थिरता’ आपणास तीच्या प्रादुर्भ्याने न जाणविता अभावानेच जाणविते. परंतु भगवंतांना अभिप्रेत असलेली ब्राह्मीस्थिती या सर्वांपेक्षा मुलभूतपणे वेगळी आहे. एकदा या स्थितीमध्ये साधकाने प्रवेश केला की त्याच्या मनात कुठलाही बदल, कुठलीही प्रगती करण्याची इच्छा उरत नाही. साधकाची ही स्थिती वर्णन करण्यास (वरील श्लोकांमधून) भगवान म्हणत आहेत की ‘ज्या मनुष्याने ममता आणि अहंकार यांचा पूर्ण त्याग केला आहे त्याच्या मनात विषयसुखाच्या इच्छेची प्रबळता नाहीशी होऊन सर्व कामना नाहीशा होतात आणि त्याला परमशांति प्राप्त होते (७१). अर्जुना, या स्थितीलाच ब्राह्मी स्थिती म्हणतात आणि ती प्राप्त झाली की (काही वेगळे करण्याचा) मोह कधीही उत्पन्न होत नाही, (आणि त्यामुळे) अगदी स्वतःच्या देहविनाशाची वेळ सामोरी आली तरी तो मनुष्य (तिकडे लक्षसुद्धा न देता) आपल्या ब्राह्मी स्थितीतच रममाण होऊन राहतो (७२). ’ आयुष्यभर नुसती चंचलता बघत असल्याने ब्राह्मी स्थितीची ही अकल्पनीय स्थिरता कशी असू शकेल यावर आपण विचार करुया.

असे बघा, जरी या जगातील प्रत्येक वस्तू अशाश्वत असली तर काही गोष्टींचा समूह केला तर त्यांच्या एकत्रितपणे तो शाश्वत राहतो. उदाहरणार्थ, समुद्रातील पाणी कमी-जास्त होऊ शकते पण या पृथ्वीवर आणि वातावरणात असलेल्या पाण्याकडे पाहीले तर ते स्थिर आहे असे दिसून येते! समुद्रातील कमी झालेले पाणी बाष्पीभवनाने आकाशात आहे आणि पावसाने जमिनीवर आलेले पाणि निरनिराळ्या नद्यांतून वहात आहे. काही पाण्याचे बर्फ बनत आहे तर कुठेतरी हिमनद्या वितळत आहेत. परंतु या जगातील पाण्याचा साठा आहे तसाच आहे! असेच एक छोट्या प्रमाणातील उदाहरण म्हणजे एखाद्या घरातील वातावरण प्रसन्न आहे असे आपण म्हणतो. परंतु त्या घरातील एखादी व्यक्‍ती बघितली तर ती नेहमी प्रसन्न असतेच असे नाही! कधी सासू नाखूश असेल तर कधी सून रुसलेली असेल तर कधी नातू हट्ट करीत असेल, परंतु तरीसुद्धा त्या घराचे एकंदर वातावरण प्रसन्नच असते आणि तिकडे आपणास नेहमीच जावेसे वाटते. अगदी त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील चंचलतेमध्ये स्थिरता आहे. ज्या साधकाने आपल्या जीवनातील अनंत घटकांपासून दूर राहून त्यांच्यामधील सामंजस्य बघितले असेल तो स्वतःच्या तटस्थपणामध्ये स्थिर असतो. आपण अस्थिर का आहोत तर आपण नेहमी कुणाची तरी बाजू घेऊन जीवनाच्या रणांगणात उतरत आहोत! असे बघा, कुरुक्षेत्रामध्ये इतके घनघोर युद्ध झाले तरी संजय आपल्या जागेपासून चळला नाही, तो आपला लांबूनच धृतराष्ट्राला सर्व वृत्तांत सांगत होता. खरे म्हणजे त्याच्या मनाची ओढ पांडवांच्या जयाकडे होती पण तिकडे त्याने लक्ष दिले नाही! त्याचप्रमाणे आपण आपल्या जीवनातले सर्व चढ-उतार, मनातील भावनांचा सगळा आवेग आत्मरुपी राजाला वर्णन करण्याच्या हेतूने नुसता बघितला तर आपली स्थिती संजयाप्रमाणेच स्थिर होईल. ब्राह्मीस्थितीमध्ये आपल्या देह-मनाच्या कुरुक्षेत्रावरील निरनिराळ्या वासनांच्या कलहांकडे तटस्थपणे पहायची शक्ती आहे. असा स्थितप्रज्ञ दगडाप्रमाणे निर्जीव, निश्चल होत नाही तर पृथ्वीवरील वातावरणासारखा सर्वव्यापी होतो. सर्व बदलांना तो व्यापून असल्याने तो निश्चळ होतो. अरुंद पायवाटेने डोंगरावर चढत असताना आपणास दिसत असलेले दृष्य सतत बदलत असते. परंतु एकदा माथ्यावर पोहोचले की संपूर्ण विहंगम नजारा दिसायला लागतो आणि मग दृष्यात फरक पडत नाही. संतांची स्थिरता अशी व्यापकपणे स्थिर असते. या व्यापकतेमध्ये जी गोडी आहे ती अवीट आहे. अगदी मृत्यू समोर आला तरी आपली ही स्थिती ढळत नाही मग बाकीच्या गोष्टींची बातच करु नका! स्थितप्रज्ञ कसा चालतो, बोलतो, वागतो याचे वर्णन करताना भगवंतांनी काढलेला हा पूर्णोद्गार आपणा सर्वांसाठी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहे. संसारातील निरंतर चंचलतेमुळे उद्भवलेल्या बुद्धीच्या अंधःकारात निश्चळ चमकणारा हा तुरीयावस्थेचा प्रकाश आपणा सर्वांना योग्य मार्ग दाखवेल यात शंका नाही. कारण भगवंतांची तशीच योजना आहे.

॥ हरिः ॐ ॥