(158+159)/3: Sadhana and Daily Life

 

॥ ॐ श्री सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

एथ वडील जें जें करिती । तया नाम धर्म ठेविती ।

तेंचि येर अनुष्ठिती । सामान्य सकळ ॥ १५८:३ ॥

 

हें ऐसे स्वभावे । म्हणोनि कर्म न संडावे ।

विशेषें आचरावें । लागे संतीं ॥ १५९:३ ॥

 

ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराज असे म्हणतात की कैवल्यपद प्राप्त केल्यावरही कर्मयोग्याने आपली कर्मे सोडू नये. वरील दोन ओवींत ते सांगत आहेत की `या जगातील प्रतिष्ठित माणसे जसे वागतील त्याला योग्य मानून त्याचे अनुकरण सामान्य मनुष्य करतो. (स्वतंत्र विचार करण्याची शक्‍ती नसल्याने) सामान्य माणसाचा स्वभावच अनुकरण करण्याचा असल्याने संतांना कर्मत्याग न करीता लोकांसमोर आदर्श ठेवता येईल असे कर्म करावेच लागते’. ज्ञानेश्वरीकडे बघण्याचा आपला हेतू स्वतःच्या जीवनात उत्क्रांती घडवून आणण्याचा आहे. त्यामुळे माऊलींची प्रत्येक ओवीतून आपल्या जीवनात काय धडा शिकायचा हेच आपण सतत बघत असतो. आपण स्वतः संत नाही असे म्हणून वरील दोन ओवींना दुरुनच नमस्कार करण्यापेक्षा आज त्यांचा आपणांस काय आदेश आहे हे बघायचा प्रयत्‍न करु.

 

साधक आणि व्यावहारीक जीवन

 

परमार्थाच्या मार्गावर चालायची इच्छा असणाऱ्या वा त्या मार्गावर चालत असणाऱ्या अनेकांच्या मनांत अशी शंका असते की आपणांस व्यवहारात वागताना जे `चुकीचे’ वर्तन करतो त्याचे परीणाम आपल्या साधनेवर होतो का? उदाहरणार्थ, एखाद्या धंदेवाईकाने नफा मिळविण्याकरीता ग्राहकाशी खोटे सांगितले तर ते योग्य की नाही? नोकरी करताना वरिष्ठांशी बोलताना (सत्यवचनाचे ब्रीद मोडून) त्याच्याशी अदबीने बोलण्याने प्रामाणिकपणा कमी होतो का? आपल्या मुलाला चांगले वळण लावण्याकरीता त्याच्या अंगावर रागाने ओरडावे लागते, वेळप्रसंगी मारावे लागते मग हा क्रोध का येतो? मी त्याला शांतपणे समजावून का सांगू शकत नाही? इत्यादी प्रश्नांनी भंडावून बरेचसे साधक परमार्थाचा मार्ग आपल्याकरीता नाही असे मानतात. परंतु असा विचार करुन खऱ्या अर्थाने परमार्थ करण्याकरीता आपल्या वृध्दापकाळाची वाट बघणे संपूर्ण चुकीचे आहे हे आपणांस वरील ओवींतून शिकायचे आहे. हे कसे ते आता आपण पाहू.

आपण साधना करतो किंवा अध्यात्माच्या मार्गाकडे जातो याचा हेतू काय आहे तर आपली आणि भगवंताची सतत जवळीक साधणे. ह्या जगातील सर्व वस्तू, प्रत्येक घटना प्रत्यक्ष भगवंताच्या अधिष्ठानावरच उभारलेल्या आहेत ही वस्तुस्थिती भर दुपारच्या सूर्यप्रकाशासारखी निःसंदेह दिसणे हेच आपल्या साधनेचे ध्येय आहे. आयुष्यातील प्रत्येक प्रसंगात परमेश्वराचा हात आहे अशी सतत जाणीव असण्यातच आपले व परमेश्वराचे नित्य सान्निध्य आहे. हा आपला हेतू असल्याने साधकाने स्वतःला एका साच्यात (उदाहरणार्थ मी सत्यवादी आहे, प्रामाणिक आहे, जगाला मदत करणारा आहे इत्यादी इत्यादी) घालण्यातच स्वतःची अध्यात्मिक प्रगती बघणे निरर्थक आहे हे दिसून येते. साधनेत प्रगती मोजण्याचा एकच मानदंड म्हणजे आयुष्यातील किती घटना आपण परमेश्वरानेच घडविलेल्या आहेत असे मानतो यात आहे. आणि आपण त्यात भगवंताचा हात बघितला आहे याचे प्रमाण म्हणजे आपण घटनेचा आहे तसा स्वीकार केला आहे की नाही हा होय. असे बघा प्रत्यक्ष भगवंताने आपल्याला आजारपण आणलेले आहे हे कळले तर आपली प्रतिक्रीया काय होईल? भगवंताच्या परमदयाळू स्वभावाबद्दल खात्री असल्याने त्या मनाविरुध्द घडलेल्या गोष्टीबद्दल विषाद न येता आपोआप आपण स्वीकार करु. म्हणूनच आपल्या साधनेची प्रगती बघायची असेल तर किती गोष्टींचा आपण विनाआक्रोश स्वीकार करतो हे बघावे. आपण कितीवेळा सत्य बोललो हे बघायची जरुरी नाही!

एकदा हे कळले की व्यवहारात समोर आलेल्या सर्व घटनांना त्यांच्या योग्यतेनुसार प्रत्युत्तर देण्यात आणि आपल्या साधनेत काही विसंवाद नाही हे लगेच स्पष्ट होते. कुटुंबाच्या पालनपोषणाची माझी जबाबदारी आहे, त्याच्या पूर्णतेकरीता मला नफा मिळविला पाहीजे ह्या गोष्टीची ज्या दुकानदाराला जाणीव असते त्याने सत्य बोलण्याच्या नादात तोट्यात धंदा करणेच त्याच्या साधनेला घातक आहे. क्रोध येणे चुकीचे आहे अशी ठाम समजूत मनात असल्याने जरुरी असतानादेखील मुलाला न रागावण्यात आपली अधोगतीच होत आहे हे निःसंशय प्रत्येक पालकाने जाणावे.

ज्यांनी भगवंताला वश करुन घेतले आहे अशा संतांनादेखील माऊली व्यवहारात सर्वसामान्य माणसासारखे वर्तन ठेवायला सांगते तर आपल्याला कुठल्यातरी अतिरंजित कल्पना ठेवण्याची काय आवश्यकता आहे? पण म्हणून साधकाने व्यवहारात काहीच बदल करु नये असेही नाही. बाह्यकर्मांमध्ये फारसा बदल न करीता साधकाने बदलायला काय हवे तर आपल्या वागण्यामागील हेतू. सावत्र आईचा द्वेष आणि सख्या आईचे रागावणे बाह्य दृष्टीला एकच दिसले तरी त्यांचा मुलावर परीणाम भिन्न होत असतो हे ध्यानात घ्या! नफेखोर दुकानदाराने ग्राहकाला फसविणे व कर्तव्याची जाणीव ठेवून योग्य तितका फायदा घेण्यात फरक आहे हे वेगळे सांगायची जरुरी नाही. तेव्हा आपण सर्वांनी हे ध्यानात घेतले पाहीजे की आपण साधना करीत आहोत म्हणून समाजात वेगळे वागायची जरुरी नाही. नेहमीचे जीवन जगण्यामध्येच त्यामागील भगवंताचे अधिष्ठान पाहण्याचा हेतू ठेवणे जरुरी आहे. आपला हेतू काय आहे हे फक्‍त आपणांस (आणि आत्मरुपी भगवंतास) ठाऊक असते म्हणूनच गीतेत असे सांगितले आहे की ज्ञानी माणसांना त्यांच्या वर्तनावरुन ओळखणे सोपे नाही. गोंदवलेकर महाराजांनी आपल्या भाऊबंदांबरोबर वडीलोपार्जित जमिनीवरुन खटले लढविले आहेत व श्री रामकृष्ण परमहंस आपल्या देवीच्या पुजारी या नात्याने येणारा प्रसाद आलाच पाहीजे याचा आग्रह ठेवला होता हे बघून त्यांच्या निस्पृहतेबद्दल शंका घेण्याची गरज नाही.

खरे म्हणजे आपल्या मनात साधकाने व्यवहारात कसे वागावे याबद्दल अतिरंजित कल्पना असतात याचे एक महत्वाचे कारण म्हणजे त्यातून आपल्याला साधना न करायला कारण मिळते हे होय. आपल्या गुरुंना देवासारखे मानले की आपणांस त्यांच्यासारखी साधना करता येणे शक्य नाही हे कबूल करायला आपल्याला लाज वाटत नाही. संतलोक जन्मापासूनच वेगळी असतात असे म्हटले की आपण संतांसारखे होऊ शकतो ही भावना नष्ट होते. सर्वकाही पूर्वसुकृतांवर अवलंबून आहे असे म्हणून आपण मनासारखे जीवन जगण्यास मोकळे होतो. परंतु असे वागण्याने नुकसान आपलेच होत आहे, दुसऱ्या कोणाचे नाही हे जाणून घ्या. साधनेबद्दल असलेल्या अतिरंजित कल्पना सोडून आत्ता आपल्या हातात काय करण्यासारखे आहे याचा सतत विचार करा. व्यवहारातील आपल्या कुठल्याही वागण्याने साधनेला प्रतिबंध होत नाही हे लक्षात घ्या. साधनेला धोका निर्माण होतो तो आपल्या वागण्यामागील हेतूने हे ध्यानात ठेवून नेहमीचेच जीवन शुध्द हेतूने जगायचा प्रयत्‍न करा. वरील ओवींपासून हा धडा आपण शिकलो तर आपल्या आयुष्याचे सार्थक होईल.

 

॥ हरि ॐ ॥

(बंगलोरमध्ये दिनांक २५ ऑगस्ट २००७ रोजी दिलेल्या प्रवचनावर आधारित.)