श्लोक २१/३: आपली अनुकरणाची आवड

 

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

यद्यदाचरति श्रेष्ठस्ततदेवेतरो जनः ।

स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥ गीता २१:३ ॥

भगवान श्रीकृष्णांनी गेल्या श्लोकात कर्मयोगाच्या मार्गात निरंतर रहाण्यास अर्जुनाला सांगताना ‘मी सांगतो म्हणून’ असे कारण न देता ‘जनक राजासारख्या लोकांनी हाच मार्ग अनुसरला होता’ आणि ‘जगातील इतर लोकांना मार्गदर्शन होईल’ अशी कारणे दिली. यातील पहिल्या कारणाबद्दल अधिक स्पष्टीकरण द्यायची गरज नसल्याने ते आता दुसऱ्या कारणाला अजून स्पष्ट करीत आहेत. भगवान म्हणत आहेत की ‘ज्याप्रमाणे (समाजातील) मान्यवर व्यक्ती आचरण करतात त्याचे अनुकरण बाकी लोक करतात. सर्व जग श्रेष्ठ लोकांनी अनुसरलेल्या मानदंडांना रास्त समजून वागतात (२१). 

जगातील सर्वांना जीवनावर स्वतःचा ताबा हवा आहे. अगदी लहान मुलालासुद्धा त्याच्या जीवनशैलीवर पालकांचे नियंत्रण असावे असे वाटत नाही! परंतु या स्वातंत्र्याच्या नैसर्गिक ओढीत दुसऱ्याप्रमाणे वागावे ही भावनासुद्धा प्रभावशाली असते. जगाच्या रहाटगाडग्यापासून संपूर्णपणे नवीन विचार करणारे किती माणसे असतात? त्यामुळे आपल्या मनात ‘स्वातंत्र्याचे आकर्षण’ आणि ‘इतरांचे अनुकरण’ या दोन परस्पर विरोधी शक्तींचे निरंतर द्वंद्व चालू असते. शेवटी तडजोड म्हणून बहुतांशी लोक स्वतः एखाद्या व्यक्तीला वा समुदायाला वा तत्वाला निवडतात (स्वातंत्र्याचा विजय) आणि मग त्या निवडीला साजेसे आपले जीवन व्यतीत करायचा प्रयत्न करतात (अनुकरणाचा विजय). याचे अगदी सामान्य उदाहरण पहायचे तर असे: एकदा सचिन तेंडुलकर फार ग्रेट आहे हे मानले की आपण त्याने निवडलेली टूथपेस्ट वा शूज वा गाडी वापरायला लागतो! किंवा कॅटरीना कैफ वापरत असलेला शँपू स्वतःचे केस धुण्यास वापरतो! यापेक्षा गंभीर उदाहरण म्हणजे मी श्रीज्ञानेश्वरीला श्रेष्ठ ग्रंथ मानलेला आहे आणि मग त्या ग्रंथाप्रमाणे सर्व विचार करणे मी माझे कर्तव्य मानायला लागलेलो आहे. आता दासबोधामध्ये किंवा बायबलमध्ये वा कुराणात काही वेगळे लिहीलेले असेल तर ते मी मान्य करणे शक्य नाही!! स्वतः प्रयोग करुन काय खरे आणि काय खोटे हे ठरवायला आता मी स्वतंत्र रहात नाही. अर्थात, प्रत्येक गोष्ट स्वतः पडताळून पाहणे शक्य नसते, कशावर तरी विश्वास ठेवूनच आपले जीवन जगायला लागते हे जरी खरे असले तरी स्वतःची मानसिक स्वतंत्रता गमावुन अनुकरण करण्यात धन्यता मानणे हे तत्वतः चुकीचे आहे. याचे कारण असे की आपली स्वतंत्रतेची ओढ जन्मजात आहे, स्वयंभू आहे, खरी आहे आणि अनुकरणाची ओढ समाजात कुणी आपल्या वर्तनाबद्दल जाब विचारला तर उत्तर देण्यास सोयीस्कर म्हणून आपण बाणवलेली आहे. मला कुणी ‘का रे तू असा वागतोस?’ म्हणून विचारले तर ‘अरे प्रत्यक्ष श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या श्रीज्ञानेश्वरीत असेच वागायला सांगितलेले आहे’ असे म्हटले की मी मोकळा! कारण सर्वांनाच माऊली किती थोर आहेत याची कल्पना आहे. याउलट, मी असे म्हणालो की ‘माझ्या मनात असे विचार आले म्हणून तसा वागलो’ तर दुसरा माझी चुक कशी झाली हे सांगण्यास लगेच पुढे येतो (आणि असे होणार हे मला आधीच माहिती असते!).

थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या मनात स्वातंत्र्याबद्दल आकर्षण असले तरी आपण तात्पुरत्या सोयीकरीता अनुकरणाचा मार्गच निवडतो. काय गंमत आहे बघा: परमार्थाचे अंतिम ध्येय म्हणजे मोक्ष असे समजले तर मोक्षात संपूर्ण स्वातंत्र्याशिवाय दुसरे काहीच नाही. आणि या स्वातंत्र्याकरीता आपण अनुकरणाच्या (म्हणजे बंधनांच्या) रस्त्यावर चालतो. ही या संसारातील दारुण वस्तुस्थिती आहे आणि हीच गोष्ट भगवान श्रीकृष्ण वरील श्लोकातून अर्जुनाला स्पष्ट करुन सांगत आहेत.

आता इथे एक मुद्दा उपस्थित होतो की असे जर असेल तर कर्मयोगाचे खरे अवलंबन फक्त श्रेष्ठ लोकांनीच करावे आणि बाकीच्यांनी त्यांच्या वागण्याप्रमाणे वागले तरी चालेल. मी स्वतःला श्रेष्ठ समजत नसल्याने या विचारसरणीने मी कर्मयोगाच्या मार्गावर चालण्याच्या बंधनातून मुक्त होतो! परंतु हा विचार रास्त नाही. मी जरी समाजात श्रेष्ठ नसलो तरी माझ्या लहान मुलाकरीता मीच श्रेष्ठ आहे. दुसरे उदाहरण म्हणजे मला कित्येक लोक असे विचारतात ‘अहो श्री रमण महर्षी वा रामकृष्ण परमहंस वा कान्हनगडचे स्वामी रामदास खरोखर संत होते का हो?’ आता मी त्यांना ग्रेट म्हणणार म्हणून कुणी त्यांच्यावर विश्वास ठेवला तर मी त्यांच्यापेक्षा थोर झालो की! परंतु हे असेच घडत असते. सांगायची गोष्ट अशी की या जगातील प्रत्येक व्यक्ती कुणा ना कुणाकरीता श्रेष्ठ आहे. समाजातील मान्यवर व्यक्ती जास्त जणांकरीता थोर आहेत आणि मी फक्त चार जणांकरीता थोर आहे एवढाच काय तो फरक आहे. परंतु तात्विक नजरेने पाहील्यास या नंबरांमधील फरकाने माझ्यावरील कर्मयोगाचे पालन करण्याची जबाबदारी कमी होत नाही! आता अर्जुनाकडेच बघा, तो स्वतः निश्चित कृष्णालाच श्रेष्ठ मानत असणार परंतु त्याचे अनुकरण करणारे कित्येक धनुर्धर असणारच की. तो सिंहासनावर बसला की ‘यथा राजा तथा प्रजा’ या न्यायानुसार अजून कित्येक जण त्याच्या अनुकरणातच जीवनाची धन्यता मानायला लागतील. तेव्हा अर्जुनाला स्वतः कर्मयोगाचे पालन करणे जरुरी आहे. आणि त्याच न्यायाने आपणा सर्वांना कर्मयोगाच्या मार्गावर जाण्यापासून सुटका नाही. आणि का म्हणून सुटका हवी? या मार्गावर चालल्यावर भगवान आपणाजवळ येतात आणि त्याने जो आनंद मिळतो तो अनुभवायला लागल्यावर हे बंधन आपण स्वतःहून आनंदाने अंगीकारु!

॥ हरिः ॐ ॥

लेखक: Shreedhar

I finished Ph.D. in mathematics in 1991. Since 1996, I am making sincere efforts to see the relevance of the ancient Indian teachings in the modern world.

One thought on “श्लोक २१/३: आपली अनुकरणाची आवड”

Leave a reply to raghunath s. Pawar उत्तर रद्द करा.