श्लोक १५: नित्य नूतन साधना

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते ॥

एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतोमुखम्‌ ॥ श्लोक १५ ॥

गेल्या श्लोकातून आपण पूर्वसुकृतांची जोडी असलेल्या साधकाची मानसिक स्थिती कशी असते हे बघितले. सर्वसाधारणपणे असे दिसून येते की स्वानुभवाने व्यावहारीक सुखांचे अनित्यत्व कळल्यावर साधकाची भगवंतप्राप्तीची धडपड (शाश्वत सुखासाठी) सुरु होते. परंतु दैवीगुणसंपन्न साधकाला निर्गुण भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव आधी होऊन मग त्याच्या निरंतर प्राप्तीची धडपड सुरु होते. म्हणजे काय तर अशा साधकांच्या मनात सद्यपरीस्थितीबद्दल वैराग्य येण्याचे कारण नकारात्मक (व्यावहारीक अडचणी) नसून सकारात्मक (एका दिव्य अस्तित्वाची जाणीव होऊन त्याबद्दल आलेले प्रेम) असते. त्यामुळे अतिशय आनंदाने साधक उपासना करण्यास उतावीळ होतो. आणि ज्याप्रमाणे अतिशय हुशार असलेल्या मुलांची परीक्षेचा अभ्यास करण्याची पद्धत सर्वसामान्यांहून वेगळीच असते त्याचप्रमाणे या महात्म्यांची साधनासुद्धा जगावेगळी असते. ती कशी हे सांगण्यास वरील श्लोकातून भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत: “काही स्वतःच्या झालेल्या ज्ञानाची आहुती मला अर्पण करुन माझी उपासना करतात तर काही स्वतःमध्ये आणि माझ्यात काहीच फरक नाही या भावनेमध्ये मुरून जातात तर काही हे सर्व विश्व माझीच रुपे आहेत असे समजतात तर अजून काही समोर येईल ते सर्व भगवंताचेच मनोगत आहे असे जाणून आपले आयुष्य व्यतीत करतात.”

वरील श्लोकातील मार्गांवर विचार करण्याआधी इथे साधकांचे संपूर्ण आयुष्य त्यांनी सुनिश्चित केलेल्या मार्गातच व्यतीत होते असे सांगितलेले आहे इकडे लक्ष देणे आवश्यक आहे. याचे कारण असे की साधकाच्या मनात साधनेआधीच (निर्गुण) भगवंताबद्दल प्रेम उत्पन्न झालेले आहे. मनातील प्रेमाला बाह्य जगात रुप देण्याच्या हौसेपोटी साधना चालू आहे. त्याच्या हातून होत असलेली साधना निव्वळ प्रेमापोटी होत असल्याने ती स्वतःच फलरुप आहे. त्यामुळे ती कधी थांबेल अशी शक्यतासुद्धा उद्भवत नाही. आपण अनेकवेळा असे ऐकलेले आहे की “साधना करणे” हेच साधनेने मिळणारे साध्य आहे. या वाक्याचे मूर्तिमंत रुप म्हणजे दैवीगुणसंपन्न साधक आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

आता आपण श्लोकातील मार्गांचे मर्म शोधायचा प्रयत्‍न करु. प्रथम असे सांगितले आहे की ‘ज्ञानयज्ञेन’. ज्याप्रमाणे अश्वमेध यज्ञामध्ये विश्व फिरलेल्या अश्वाचा बळी देण्यात येतो त्याचप्रमाणे ज्ञानयज्ञात आजपर्यंत जमा केलेल्या ज्ञानाची आहुती देण्यात येते. म्हणजे काय? ज्ञानाला स्वतःचे शरीर नसल्याने त्याची आहुती देणे याचा अर्थ असा घ्यायला हवा की भूतकाळात (म्हणजे अगदी याक्षणापर्यंत!) झालेल्या ज्ञानाच्या आधारावर वर्तमानकाळात वागण्याचे बंधन स्वतःवर न घालणे. संत सतत वर्तमानकाळात जगत असतात या वाक्याचा अर्थ असा आहे की ते सतत ज्ञानयज्ञ प्रज्वलित ठेवतात! ही अतिशय सूक्ष्म गोष्ट आहे, पूर्वज्ञानाकडे दुर्लक्ष करणे याचा अर्थ जाणूनबुजून कालच्या उलट आज वागणे नव्हे. याचा अर्थ असा की आज समजा आत्तापर्यंतच्या आपल्या ज्ञानाला मोडीत काढायची वेळ आली तर त्याला तयार राहणे. ज्ञानयज्ञ करणाऱ्या साधकांना “इतके वर्षे मी ठराविक समजुतींना मान्य करत होतो मग आज त्यांना तडा जाईल असे कसे वागू?” हा प्रश्न पडत नाही. कल्पना करा की आपले आयुष्य म्हणजे ज्ञानाच्या अथांग सागरावर मनसोक्त जलतरण करणे होय. प्रत्येक क्षण आपणास जीवनाकडे बघण्यास नवी नजर देत आहे. अशा सागरात क्रिडा करण्याऐवजी एका ठिकाणी नांगर टाकून आपण राहणे म्हणजे भूतकालातील ज्ञानानुसार जीवन जगणे. खरे म्हणजे या स्वानुभवी सागराच्या लाटा इतक्या प्रचंड आहेत की कितीही मजबूत नांगर टाकला तरी असे अनुभव येतात की आपणास नव्या गोष्टी स्विकाराव्या लागतातच. परंतु मोठ्या लाटांची वाट न बघता अगदी छोट्या अनुभवांनीसुद्धा शहाणे होत राहणे म्हणजे ज्ञानयज्ञ करणे होय. पूर्वानुभवांचे ओझे न बाळगता स्वच्छंदपणे जीवन जगणे ही स्थिती या शब्दातून इथे व्यक्त केली आहे. या अत्युच्च स्थितीचे वर्णन निरनिराळ्या शब्दांनी भगवद्गीतेत केले आहे. उदाहरणार्थ, बाराव्या अध्यायातील एकोणीसाव्या श्लोकात आपल्या परम भक्ताचे वर्णन करताना भगवंतांनी वापरलेला “अनिकेतः” हा शब्दसुद्धा हीच स्थिती सूचित करीत आहे असे वाटते. असो. मूळ मुद्दा सांगायचा असा की ‘ज्ञानयज्ञ’ करणारा साधक झालेल्या ज्ञानावर पुढील आयुष्य व्यतीत करीत नाही तर झालेल्या ज्ञानाला मोडीत काढायची तयारी ठेऊन जीवनाला सामोरे जातो, नित्यनूतन जीवन जगतो.

याशिवाय कुणी दैवी साधक एकच भगवान अस्तित्वात आहे या जाणीवेत राहतात (एकत्वेन), तर कुणी एकाच भगवंताचे अनेक भिन्न अवतार आहेत या वस्तुस्थितीला निरंतर ध्यानात ठेवतात (पृथक्त्वेन) तर अजून कुणी या जगातील सर्व जीवजंतू भगवंताचीच रुपे आहेत (विश्वतोमुखम्‌) याचा अनुभव घेत आपले जीवन व्यतीत करतात. अशा रीतीने भगवंतांबद्दल अनन्य प्रेम उत्पन्न झालेला साधक स्वतःच्या स्वभावानुसार मनातील प्रेमाला व्यक्त करतो. इतर लोकांना त्याचे फक्‍त बाह्य वर्तन दिसल्याने असा संभ्रम पडू शकतो की हे साधक भिन्न साध्याची अपेक्षा करीत आहेत. परंतु हा समज वस्तुस्थितीशी सुसंगत नाही हे आपण सर्वांनी, विशेषतः संतांच्या सान्निध्यात राहण्याचे भाग्य लाभलेल्या सुदैवी लोकांनी, ध्यानात ठेवले पाहीजे. नाही तर बाह्य सोपस्कारांच्या बंधनांत आपण कधी अडकू हे लक्षातसुद्धा येणार नाही. भगवंतप्राप्तीचे अनेक मार्ग दाखविताना कधीही ठराविक कर्मे करायलाच हवी अशी आग्रहाची सूचना आपणास दिलेली नाही हे भगवद्गीतेचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे. बाह्यकर्मांपेक्षा, कर्मे करण्यांमागील भूमिका कशी हवी याचे वर्णन या ग्रंथात केलेले आहे. म्हणूनच अडीच हजार वर्षांपूर्वी लिहीली गेली असूनही ती आजसुद्धा तितकीच उपयुक्त आहे. आपण अशा वैश्विक शिकवणुकीला ठराविक संप्रदायांच्या मर्यादेत ठेवायचा प्रयत्‍न करणे म्हणजे किनाऱ्यावरील एका मनपसंद ठिकाणी बसून अथांग समुद्राची ओळख झाली असे मानणे होय. दैवीगुणसंपन्न साधक असे करत नाहीत ही वरील श्लोकाची शिकवण आहे. मनातील ईश्वरप्रेमाच्या ईंधनाचा वापर करुन निर्भयपणे असे साधक आपल्या आयुष्याची नौका अनिश्चित भविष्याच्या सागरात घालतात आणि जे मिळेल त्यात सुखी राहतात.

जगातील सर्वच भविष्याबाबत निर्धास्त व्हायचा प्रयत्‍न करत असतात. परंतु आपले हे प्रयत्‍न जीवनातील काही व्यक्ती, वा वस्तू, किंवा तत्वे सतत जवळ ठेवण्याच्या पायावर उभे असतात. जेव्हा निव्वळ भगवंतभक्तीवर आधारीत निर्भयता आपणामध्ये येईल, तेव्हा स्वतःच्या जीवनाचे सार्थक झाले असे समजण्यास काहीच हरकत नाही.

॥ हरि ॐ ॥

लेखक: Shreedhar

I finished Ph.D. in mathematics in 1991. Since 1996, I am making sincere efforts to see the relevance of the ancient Indian teachings in the modern world.

यावर आपले मत नोंदवा