गुरुचरणप्रतिष्ठापना नित्य करायला हवी!

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

आतां हृदय हें आपुलें । चौफाळूनियां भलें ।

वरी बैसऊं पाउलें । श्रीगुरूंची ॥ १:१५ ॥

पारमार्थिक ज्ञानप्राप्तीच्या साधनेत सद्‍गुरूंच्या पाठबळाची कायम आवश्यकता सर्व शास्त्रांत वारंवार सांगितलेली आहे. ही गोष्ट इतर व्यावहारीक गोष्टी जाणून घेताना दिसून येत नाही. अर्थात, चांगले शिक्षक मिळाले तर व्यावहारीक ज्ञानप्राप्तीस विद्यार्थी फार लवकर प्रगती करतो हे खरे आहे. पण त्याचबरोबर जन्मजात असलेल्या बुद्धीच्या जोरावर वा एखाद्या कलेच्या विलक्षण देवदत्त देणगीवर गुरूशिवाय एखाद्या विषयात वा कलेत पराकोटीची प्रगती केलेले आपणांस खूप दिसून येतात जे परमार्थात दिसून येत नाहीत. याशिवाय सर्वसामान्य विद्यार्थीदेखील गुरुकडून नवी गोष्ट ऐकल्यावर नंतर पूर्णपणे स्वप्रयत्‍नांनी त्यावर प्रभुत्व मिळवितो असे दिसून येते. या वस्तुस्थितीने त्याला गुरूंबद्दल आदर असला तरी त्यांच्या ‘मानसिक’ पाठबळाशिवाय आपणांस काहीच कळले नसते असे त्याला वाटत नाही. याचे कारण असे की कुठल्याही प्रापंचिक विद्येचे वा कलेचे रूप सुनिश्चित असते, मर्यादीत असते. उदाहरणार्थ, पंचम लावायला हवा हे गुरूंकडून कळले की आपला सूर योग्य आहे का नाही याची खात्री शिष्य एखाद्या यंत्राकडूनही करून घेऊ शकतो, भौतिक शास्त्र वा बीजगणित कळलेले आहे की नाही हे तो स्वतःच एखादा प्रश्न सोडवून बघू शकतो. परंतु पारमार्थिक तत्वज्ञान अतिशय वैयक्तिक असते. गुरूंनी ‘तू आणि भगवंत यांत फरक नाही’ असे सांगितले तरी त्याची सत्यता प्रत्येकाला वेगवेगळ्या पध्दतीने येते! असे कुठलेच यंत्र अस्तित्वात नाही की जे आपणांस पारमार्थिक ज्ञान झालेले आहे असे खात्रीपूर्वक सांगू शकेल. आणि अशी कुठलीच परीक्षा नाही की ज्यात उत्तीर्ण झालो की नंतर आयुष्यभर आपण संत म्हणून स्वतःकडे बघू शकू! पारमार्थिक ज्ञान नित्यनूतन आणि सजीव असल्याने कालचे ज्ञान आज आपोआप शिळे होते. दररोज नवीन विषय शिकायचा असेल तर रोज नवीन शिक्षक हवा, हो की नाही?! म्हणूनच परमार्थात निव्वळ सद्‍गुरूंच्या एकवेळ केलेल्या उपदेशाने काम होत नाही तर त्यांच्या सततच्या कृपादृष्टीचीसुद्धा साधकाला निरंतर गरज असते. आयुष्यात कधीतरी एकदा सद्‍गुरुंशी तादात्म्य जोडून मग नंतर आपले आयुष्य स्वैरपणे कसेही जगलो तर तेव्हा झालेल्या पारमार्थिक ज्ञानाचे रुपांतर अहंकारजनित अज्ञानात कधी होते हे कळतसुद्धा नाही. पूजेत असलेल्या चांदीच्या उपकरणांना वेळोवेळी उजाळा दिला नाही तर दररोजच्या वापरात असूनही त्यांवर काजळी जमते तशी ही गोष्ट आहे. अगदी त्याप्रमाणे आपण गुरूंबरोबर जोडलेले नाते क्षणोक्षणी उजळावयाची गरज असते. पंधराव्या अध्यायातील नमनाच्या पहिल्याच ओवीतून माउली आपणांस हा धडा देत आहे असे वाटते! हे म्हणण्याचे कारण असे की माऊलींनी पहिल्याच अध्यायात ‘मज हृदयी सद्‌गुरु । जेणे तारीलो संसारपूरु…’ (पहा ज्ञा. अ.१,ओ.२२) असे उद्‍गार काढलेले आहेत. असे असूनही ते वरील ओवीत म्हणत आहेत की “आता हृदय पूर्णपणे स्वच्छ करून त्यावर गुरूचरणांची प्रतिष्ठापना करू (१:१५)

वर सांगितल्याप्रमाणे माऊलींनी सद्‍गुरुंना आपल्या हृदयात बसवूनच भावार्थ दीपिकेची सुरुवात केलेली होती. तरीही ते आपल्या हृदयाला परत एकदा साफ करत आहेत. हृदय स्वच्छ करणे म्हणजे काय तर आपणांस आवडणाऱ्या गोष्टींबद्दलची आस्था मनातून दूर करून आपले चित्त कोऱ्या पाटीसारखे करणे. असे का करावे लागते? तर आपल्यातील आवडी-निवडी श्रीगुरूंच्या शब्दांचे पूर्णपणे श्रवण करण्यास आपोआप अडथळा करतात. तो त्यांचा नैसर्गिक स्वभावच आहे असे म्हंटले तर ते चुकीचे होणार नाही. आपल्याच गुरूंनी भूतकाळात केलेल्या उपदेशाबद्दलचे ममत्व मनात असले तरीही ते वर्तमानकाळातील त्यांचे शब्द पूर्णपणे ऐकण्यास प्रतिबंध करू शकते हे लक्षात घेणे जरुरी आहे. म्हणजे काय, तर काल प्रतिष्ठापित केलेले पाऊले आजच्या नूतन उपदेशाला मुक्तपणे वावरायला परवानगी देतेच असे नाही! कित्येकवेळा शिष्याच्या मनात असा विचार येतो की ‘काल आपले गुरू अमुक एका पद्धतीने वागत होते मग आज असे का?’ शिष्याच्या मनातील हा संदेह त्याचे हृदय ‘भलेपणाने चौफाळलेले’ नसल्याचे दर्शवितो! वरील ओवीतील ‘भले’ या विशेषणाने ‘संपूर्णपणे स्वच्छ करणे’ असे माउलींना म्हणायचे असेल असे वाटते. म्हणजे काय तर केवळ श्रीगुरूंबद्दलचे प्रेम या गोष्टीशिवाय आपण प्रिय मानलेल्या इतर सर्व गोष्टींबद्दल तटस्थ होणे. इथे “आपल्या सर्व इच्छांपासून अलिप्त झाले तरच सम्यक ज्ञानाचे दर्शन होते” असे ऐकलेल्या साधकाच्या मनात श्रीगुरूंबद्दल प्रेम तरी का ठेवावे असा प्रश्न येऊ शकतो. याचे उत्तर असे की जोपर्यंत आपल्या शरीराची जाणीव आहे तोपर्यंत कुठलीतरी इच्छा-आकांक्षा शिल्लक असतेच. म्हणून इतर सर्व इच्छांना गुरुचरणाच्या प्रेमात विलीन केले की त्यांच्याच कृपेने ही शेवटची इच्छासुद्धा विनाप्रयत्‍न परब्रह्मात विलीन होते. घरातील केर काढताना आपण खोलीभर पसरलेला कचरा झाडूने आधी एका ठिकाणी गोळा करतो आणि मग तो एकत्र केलेला कचरा टाकून देतो त्याचप्रमाणे साधनेच्या झाडूने आपणांस स्वतःच्या छोट्या-मोठ्या, चांगल्या-वाईट अशा सर्व इच्छा गुरूचरणप्रेमात एकत्र करायच्या असतात. जितके आपले हृदय इतर मह्त्वाकांक्षेंतून मोकळे होईल तितके श्रीगुरूंच्या कृपेला आपल्या आयुष्यात वावरायला मोकळी जागा मिळेल असे समजले तर ते चुकीचे ठरणार नाही. मग त्या झालेल्या कृपेच्या प्रकाशात जे काही दिसत आहे त्यावर गुरूपोनिर्दिष्ट आचरण करणे म्हणजे श्रीगुरूंची पाऊलें प्रतिष्ठापित करणे होय. लक्षात घ्या की आपल्या शरीरातील पाय हे कर्मेंद्रियांचे प्रतिक आहे. त्यामुळे गुरूचरण आपण हृदयात ठेवणे याचा स्पष्ट अर्थ असा होतो की दैनंदिन जीवनात आपण गुरूंच्या आदेशानुसार वागणे. हा आदेश अंतर्स्फूर्तीच्या रूपात आपल्या हृदयात प्रकाशमान होतो म्हणून गुरूंची पाऊले हृदयात आहेत असे माऊली म्हणत आहे. जेव्हा साधकाचे जीवन स्वहृदयी प्रतिष्ठापित केलेल्या गुरूचरणांच्या सहवासात व्यतीत व्हायला लागते तेव्हा त्याला इतर कुठली वेगळी साधना करायची जरुरी रहात नाही. त्याचे जीवन नैसर्गिकपणे वाहणाऱ्या सरीतेसारखे होऊन त्याच्या चित्तावर बसलेला प्रापंचिक वासनांचा मळ निघून जातो. या प्रक्रियेचे अतिशय विस्तृत असे वर्णन माऊलींनी याच नमनातील पुढील सोळा ओव्यांतून केले आहे. त्यावर आपण नंतर विचार करू. आज इतकेच.

॥ हरि ॐ ॥

लेखक: Shreedhar

I finished Ph.D. in mathematics in 1991. Since 1996, I am making sincere efforts to see the relevance of the ancient Indian teachings in the modern world.

यावर आपले मत नोंदवा