(513+522)/9: Know the Need for Change

 

॥ ॐ श्री सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

 

सुरुवातीचे नमन

 

प्रवचनाच्या आधी आपण दोन मिनिटे शांत बसून आपापल्या इष्ट देवतेचे ध्यान करु व अशी प्रार्थना करु की आज जे काही ऐकायला मिळणार आहे त्याने माझ्या जीवनात अगदी थोडा का होईना पण फरक पडावा. ही प्रार्थना करायचे कारण असे की आपण ऐकतो म्हणजे काय करतो? तर कानावर पडलेल्या वाक्याचा अर्थ बुध्दीने जाणून घ्यायचा प्रयत्‍न करतो. त्यामुळे आजपर्यंत जे काही आयुष्य आपण जगलो आहोत त्याचा परिणाम ह्या ऐकण्यावर होत असतोच. म्हणून वक्‍त्याच्या एकाच वाक्याचे वेगवेगळ्या लोकांच्या जीवनात निरनिराळे अर्थ निर्माण होतात आणि गंमत म्हणजे त्यातील प्रत्येक अर्थ (ऐकणाऱ्याच्या जीवनात) खरा आहे! आता, प्रत्येकाच्या जीवनात इतक्या वेगवेगळ्या घटना घडलेल्या असतात की त्यातील कुठल्या घटनेचा आपला ऐकण्यावर परीणाम होणार आहे हे सांगणे अशक्यच असते. म्हणून प्रवचनाच्या आधी दोन मिनिटे स्तब्ध राहून आपण देवाकडे अशी प्रार्थना करु की पुढील एक तासामध्ये जे काही मला ऐकायला मिळणार आहे त्याचा योग्य अर्थ समजण्याची बुध्दी मला दे.

दोन मिनिटे शांत बसून प्रवचन सुरु करण्याचा दुसरा उपयोग असा की अशा शांत बसण्याने आपले मन नेहमीच्या विचारातून मोकळे होते आणि नवीन काही शिकायचा संभव निर्माण होतो. या दोन कारणांनी नेहमी आपण सर्वांनी दोन मिनिटे शांत राहून, आपापल्या देवाची प्रार्थना करुन, मगच प्रवचनाला प्रारंभ करतो.

 

आता नेहमीच्या तीन ओव्या म्हणून आपण सुरुवात करु.

 

ॐ नमोजी आद्या । वेदप्रतिपाद्या ।

जय जय स्वसंवेद्या । आत्मरुपा ॥ १:१ ॥

 

जय जय देव श्रीगुरो । अकल्पनाप्य कल्पतरो ।

स्वसंविद द्रुमबीजप्ररो । हणावनि ॥ १०:१८ ॥

 

किंबहुना सर्वसुखी । पूर्ण होऊनि तिहींलोकी ।

भजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥ १७९९:१८ ॥

 

प्रवचन सुरु करण्याआधी वरील तीन ओव्यांवर विचार करुया. अध्यात्मामध्ये आपण जे काही प्रयत्‍न करतो त्याचा हेतु काय आहे हे बघणे जरुरी आहे. व्यवहारातसुध्दा आपल्याला कोणी मदत केली तर आपण त्याने का असे केले हा विचार करतोच. कर्माचे-चांगले त्यामागच्या हेतूप्रमाणे ठरत असते. असे बघा, बकरी ईदच्या आधी बोकडाला अत्यंत पौष्टीक आहार खाटीक देत असतो, पण त्या चांगल्या कर्माचा हेतू बोकडाचे भले व्हावे असा नसून नंतर आपल्याला चांगले मांस खायला मिळावे असा असल्याने त्याचे हे कर्म चांगले की वाईट हे ठरविणे अवघड होते. याउलट आईने मुलाला वळण लावण्याकरीता शिक्षा केली (आणि त्यामुळे त्या मुलाला शारीरीक दुःख झाले) तरी आईचे ते कर्म चांगले आहे असेच आपण मानतो. म्हणून आपण प्रवचनाला जाणे, ज्ञानेश्वरी वाचणे इत्यादी क्रियांना चांगले म्हणण्याआधी कुठल्या हेतूने ते करीत आहोत हे जाणणे जरुरी आहे. असे बघा, धृतराष्ट्राने अर्जुन व संजयबरोबरच पूर्ण गीता ऐकली पण त्या गोष्टीचा त्याला काही फायदा झाला नाही. सगळ्यात शेवटी, गीता पूर्ण झाल्यावर, त्याने काय विचारले, तर `संजया, जय कुणाचा होईल ते सांग’. त्याचे हे विचारणे म्हणजे सबंध रामायण ऐकून नंतर `रामाची सीता कोण’ असे विचारण्यासारखे आहे! धृतराष्ट्राच्या या स्थितीचे कारण ज्ञानेश्वरांनी पहिल्या अध्यायातच सांगितले आहे: `तरी पुत्रस्नेहे मोहितु, धृतराष्ट्र असे पुसतु, म्हणे संजया सांगे मातु, कुरुक्षेत्रीची ॥८५:१॥’. त्याचा हेतू फक्‍त आपल्या पुत्रांचे क्षेम जाणून घेण्याचाच असल्याने गीता प्रत्यक्ष श्रीकृष्णाच्या तोंडातून ऐकूनसुध्दा त्याच्यात काही बदल झाला नाही. नमनाच्या पहिल्या ओव्यांमध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत की आदिपुरुषाला जाणून घेणे हा हेतू अध्यात्माच्या मार्गावर चालताना ठेवणे सर्वोत्तम आहे.

वरीलपैकी दुसऱ्या ओवीत ज्ञानेश्वर महाराजांनी गुरुंची स्तुती केली आहे. व्यवहारातसुध्दा एखादी नवीन गोष्ट शिकायला आपण ती गोष्ट ज्यांना नीट माहीती आहे त्यांच्याकडे जाऊन शिकतो. तेव्हा आदिपुरुष म्हणजे कोण हे जाणून घ्यायचे असेल तर त्याकरीता योग्य गुरु हवे असे आपण मानायला काहीच हरकत नाही. पण आपल्याला, विशेषत: जी माणसे शहरात वाढली आहेत त्यांना, गुरु म्हटले की `बुवाबाजी’ आठविते! गुरु ह्या कल्पनेबद्दलच एक प्रकारची भिती त्यांना वाटत असते. खरे म्हणजे मनुष्य स्वभावच असा आहे की आपल्याला एखाद्या गोष्टीचे वाईट गुण लगेच दिसतात (आणि पटतात). याउलट, चांगले गुण जरी दिसले तरी त्यावर पटकन विश्वास बसत नाही, हा मनुष्य वा वस्तू इतकी चांगली कशी असेल असे वाटते. याचे एक सुंदर उदाहरण म्हणजे तुम्ही स्वतःच्या मनात महाभारतातील युधिष्ठिर हे नाव आठविले की काय विचार येतात ते पहा.

आपल्यापैकी काही जणांना त्याने द्युतामध्ये द्रौपदीला पणाला लावले हे आठवेल, तर काही जणांना त्यावे `नरो वा कुंजरो वा’ हे वाक्य आठवेल आणि त्यामुळे त्याचा रथ जमिनीच्या दोन इंच वर चालायचा तो खाली आला हे आठवेल. खरे पाहता सबंध आयुष्यात त्याने ह्या दोनच गोष्टी विवादास्पद केल्या आहेत! परंतु आपल्यापैकी बहुतेकांना तेवढेच आठविते! एकदा यक्षांनी बाकी सर्व पांडवांना बांधून ठेवले असताना केवळ आपल्या बुध्दीच्या बळावर युधिष्ठिराने त्यांना पराभूत करुन सोडविलेले कितीजणांना आठवेल? शिवाय त्याचा रथ इतकी वर्षे जमिनीला लागत नव्हता ह्याचे महत्व न वाटता `शेवटी त्याचापण रथ खाली आलाच ना’ असेच आपण म्हणतो!

तेव्हा, दुसऱ्यांच्या वागण्यातील दोष आपल्याला विनासायास दिसतात आणि अनेक वर्षांच्या ह्या सवयीने दोष बघण्याचा आपला स्वभावच झाला आहे. म्हणूनच `गुरु’ हा शब्द जेव्हा आपल्या समोर येतो तेव्हा गुरुंनी इतक्या जणांच्या जीवनाचे कल्याण केले आहे, त्यांचे खूप शिष्य जीवनात आनंदी आहेत हे आपल्या लक्षात येत नाही तर गुरुंमुळे शिष्याला दररोज संध्याकाळी ध्यान करावे लागते, वर्षातून एक वेळतरी गुरुंच्या उत्सवाला जावेच लागते इत्यादी बंधनेच डोळ्यात भरतात. असे दिसल्याने गुरु ह्या शब्दाबद्दल भिती वाटू लागते व आपण परमार्थाच्या मार्गावर, गुरु करावे लागतील ह्या विचाराने, जातच नाही.

पण व्यवहारातील शिक्षकांना आपण एवढे घाबरत नाही, याउलट त्यांचे महत्व कबूल करायला तयार असतो. दहावीच्या परीक्षेचे गेल्या दहा वर्षांचे प्रश्नसंच आपल्याकडे असले, बुध्दी चांगली असली तरी आपण पैसे देऊन कोचिंग क्लास लावतोच ना. `अहो अशा वर्गांना गेल्याशिवाय चांगले गुण मिळत नाहीत’ असे सांगण्यात आपल्याला काही कमीपणा वाटत नाही. त्या गुरुंबद्दल भिती वाटत नाही याची दोन कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे आपल्याला असे वाटते की आपले त्या गुरुंवर नियंत्रण आहे. उदाहरणार्थ, आपण केव्हाही क्लास बंद करु शकतो व त्याने आपले फार नुकसान होणार नाही असे वाटते. याउलट परमार्थातील गुरुंकडे अतिंद्रीय शक्‍ती असतात, म्हणून आपण त्यांच्याकडे जाणे बंद केले तर त्याचे परिणाम काय होतील ह्याबद्दल भिती उत्पन्न होते. आणि आयुष्यभर त्यांच्याकडे जाऊच अशी खात्री नसते. त्यामुळे, आपण एकतर अध्यात्माच्या मार्गावर पायच ठेवत नाही वा एखादे पुस्तक वाचून त्यावर विचार करण्यात परमार्थ साधायचा प्रयत्‍न करतो. व्यवहारातील गुरुंकडे सहजपणे जायचे दुसरे कारण म्हणजे असे करण्यातील सर्वमान्यता. माझा मुलगा क्लासला जातो ह्या गोष्टीचे स्पष्टीकरण कुणाला द्यावे लागत नाही. पण तुम्ही (अध्यात्मिक) गुरु केलेत असे कळले की तुमच्या जवळच्या लोकांना ते करण्यामागचे कारण हवे असते. `माझ्या जीवनात काहीही कमी नाही, केवळ देवाजवळ जायची ओढ लागली आहे व त्यात मदत म्हणून गुरु केले आहेत’ असे कितीही सांगितले तरी लोकांचा त्यावर विश्वास बसत नाही. `कारण सांगायचे नसेल तर सांगू नकोस, पण थापा कशाला मारतोस?’ असे ते म्हणतात!! हे माहीती असल्याने आपण ह्या मार्गावर जायचे उद्यावर (म्हणजे आपल्या म्हातारपणी) ढकलतो.

परंतु हे आजचे काम उद्यावर ढकलण्यात आपले स्वतःचेच नुकसान आहे हे जाणून आपण धैर्य दाखवून गुरुंकडे जायला हवे. जेव्हा आपल्याला असे वाटते की आयुष्याचे ध्येय स्वतःचे घर, गाडी आणि समाजात मानसन्मान मिळविणे हे नाही तेव्हा आपले या जन्मातील ध्येय नक्की काय आहे हे व्यवस्थित कळायला गुरुंकडे आपण जायला हवे. आता आयुष्याचे ध्येय संसारातील गोष्टी मिळविणे हे नाही हे ओळखावे कसे? तर तुम्ही बघा की वरील सर्व गोष्टी थोड्याबहुत प्रमाणात तुमच्याकडे आहेतच. आपण सर्वजण तरुण आहोत, शारीरीक दुःख भोगायचे दिवस अजून आपल्यापासून खूप दूर आहेत. आपल्या सर्वांचे लौकीकदृष्ट्या उत्तम आयुष्य आहे, पैशाची काळजी नाही. पण आठवड्यातील किती दिवस आपण सुखात गेले असे म्हणतो? जर या गोष्टींच्या प्राप्तीमध्येच जीवनाची सार्थकता असेल तर आत्ता आपण दिवसाचे चोवीस तास सुखी असायला हवे. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की मनाला शांतता देणारे क्षण आपल्या आयुष्यात विरळाच आहेत. तेव्हा स्वतःच्या जीवनाकडे बघून असे शिकायला हवे की व्यवहारात पुढे जाण्यामध्ये आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय नाही. आता विचार करायची वेळ आली आहे. किती दिवस आपण डोळ्यावर झापड बांधलेल्या घोड्यासारखे जीवन जगायचे? ह्या क्षणी अशी वेळ आलेली आहे की तुम्ही स्वतःच्या आयुष्याबद्दल गंभीरपणे विचार करायला पाहीजे. प्रत्येकाचे मार्ग भिन्न असू शकतील, पण आपले जगण्याचे ध्येय बदलण्याची वेळ आलेली आहे हे ध्यानात घ्या. तुम्ही असे प्रयत्‍न करा, असे नवीन शिका की ज्याने तुमचे आयुष्य अजून सुखी, परीपूर्ण होईल. आज जर मी आठवड्यातून सरासरी दहा तास सुखी आहे तर पुढच्या आठवड्यापासून ही सरासरी १२ तास झाली पाहीजे असा निर्धार करुन त्याकरीता काय केले पाहीजे याचा विचार आपण करायला हवा. ज्यामुळे आपली सुखी जगण्याची सरासरी वाढेल असे ज्ञान देण्याकरीता गुरुंकडे जायला हवे. त्या गुरुंचे वर्णन करणारी आपली दुसरी ओवी आहे. ती सांगत आहे की जीवनात देवाचे दर्शन आपल्याला ज्या स्वसंवेदनरुपी मार्गाने घ्यायचे आहे त्या मार्गाची सुरुवात, त्या वृक्षाचे बीज पेरणारे आपले गुरु आहेत. जरी आपल्याला स्वतःच परमार्थाच्या मार्गावर चालायचे असले तरी योग्य वाट दाखविणारे गुरु असणे जरुरी आहे.

गुरुंकडे जायचे दुसरे कारण म्हणजे आपली एकटेपणाची भिती. एकटे राहणे हे इतके कठीण मानले जाते की तुरुंगातसुध्दा सर्वात कठोर शिक्षा म्हणजे एकांतवास मानला जातो. भरदुपारच्या उन्हात उभे राहून दगड फोडण्यापेक्षा एका खोलीत दिवसेंदिवस कोंडून ठेवणे भयंकर मानले जाते. स्वातंत्र्यवीर सावरकरांना ह्याच शिक्षेला सामोरे जावे लागले होते. ह्या शिक्षेत तसे पहायला गेले तर शारीरीक त्रास काहीच नसतो. फक्‍त एका खोलीत कुणाशी संबंध न ठेवता रहायचे असते एवढेच. पण त्या शिक्षेने लोकांना वेड लागते. अगदी पाषाणह्रुदयी गुन्हेगारालासुध्दा ही शिक्षा सहन होत नाही मग आपल्यासारख्यांचे काय होईल ही कल्पनासुध्दा करणे अशक्य आहे. परंतु गुरुस्तुतीच्या वरील ओवीत ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत की आपण कधीही ह्या जगात एकटे नाही, सतत आपल्या जवळ गुरु आहेत (स्वसंवेदनाच्या वृक्षाचे बीज पेरायला ते जवळ हवेतच!). म्हणून गुरु करण्याचे दुसरे कारण म्हणजे परमार्थातील मार्गावरील जाणविणारे एकटेपणा जायला आपल्याबरोबर ते हवेत हे आहे. जोपर्यंत आपल्यात एवढा आत्मविश्वास येत नाही की माझ्यामुळे हे सर्व जग आहे, मी ब्रह्मदेवासारखे माझे जग निर्माण केले आहे तोपर्यंत आपल्याबरोबर कुणीतरी लागतेच. मग आपण आपल्या नातेवाईकांमध्ये अशी व्यक्‍ती शोधायचा प्रयत्‍न करतो. पण जगातील प्रत्येक व्यक्‍तीला स्वतःची काहीतरी अपेक्षा असतेच. त्यामुळे ती व्यक्‍ती तुमच्या सतत जवळ असायला हवी असेल तर तुम्हाला आपल्या जीवनात (त्या व्यक्‍तीचे मन राखायला) तडजोड करावीच लागते. मग एखादी गोष्ट करणे बरोबर नाही हे माहीती असूनसुध्दा करावी लागते. उदाहरणार्थ, संसार सांभाळायला नवरा आणि बायको या दोघांना तडजोड करावी लागतेच. ज्याक्षणी आपण तडजोड करतो, मनातील सत्य भावनेप्रमाणे वागत नाही, त्याक्षणी आपण सत्यापासून दूर होतो, आत्मरुपी देवापासून दूर होतो. पण समजा तुमच्या जीवनातील व्यक्‍तीला तुम्ही सतत स्वसंवेदनांप्रमाणे वागणेच अपेक्षित आहे, त्याशिवाय त्या व्यक्‍तीची स्वतःची काही अपेक्षा नाही. तर तुम्हाला सोबतपण मिळेल आणि तडजोडपण करावी लागणार नाही. पण दुर्भाग्यवशात संसारात अशी व्यक्‍ती मिळत नाही. तुमची आई, वडील, नवरा/बायको, मुलगा या सर्वांची तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा आहेच. आणि वाईट गोष्ट म्हणजे आपल्याला त्या प्रत्येकांच्या अपेक्षेंचे ज्ञान आहे! जर त्यांची आपल्याकडून काय अपेक्षा आहे हे माहीती नसले तर खूप बरे झाले असते. आपण कसेही वागायला मोकळे झालो असतो. पण ह्या सर्वांनी कधी उघडपणे तर कधी सूचितपणे तुमच्याकडून काय अपेक्षित आहे हे तुम्हांला सांगितले आहे. `आमच्या ह्या अपेक्षा सांभाळून मग तू कशीही वागलीस/कसाही वागलास तरी चालेल’ असे त्यांनी आपल्याला सांगितले आहे. अपेक्षेंच्या त्या ओझ्यामुळे ह्या व्यक्‍ती तुमच्याजवळ ठेवण्याकरीता तुम्हाला तडजोड करणे भागच आहे. पण आपले गुरु ही एकच अशी व्यक्‍ती आहे की जीची आपल्याकडून फक्‍त बरोबर वागण्याची अपेक्षा आहे, स्वतःकरीता गुरुंचे काहीही मागणे नसते. ह्या दृष्टीकोनातून विचार केला तर आपणांस गुरुंकडे जायला अजून एक कारण दिसते.

असा विचार करा आणि धाडस करुन गुरुंजवळ जायची जरुरी आहे हे मान्य करा. आपली बुवाबाजीची भिती दूर सोडून त्यांच्याजवळ जायची आवश्यकता आहे. दुसऱ्या ओवीचे हे सांगणे आहे असे वाटते.

आता तिसरी ओवी काय म्हणत आहे हे पाहू. पसायदानातील ह्या ओवीचे मुख्य सांगणे `संयम ठेवा’ हे आहे. जरी तुम्हांला देवाकडे जायची उत्सुकता लागली असेल, कितीही पटले असेल की या जगातील इतर लोकांपेक्षा थोडे वेगळे वागून आयुष्य अजून परिपूर्ण करायला हवे तरी लगेच सर्व सोडून परमेश्वराकडे जायची घाई करणे बरोबर नाही असे ह्या ओवीचे सांगणे आहे. सध्याच्या आपल्या इच्छांचे पूर्ण निरसन करुन आपल्याला पुढे जायचे आहे हे लक्षात घ्या. इच्छांचे निरसन कसे होईल? इच्छा पूर्ण करायला दोन मार्ग आहेत. एक म्हणजे हवी असलेली वस्तू हातात येणे व दुसरी म्हणजे आपला हवेपणा जाणे. उदाहरणार्थ, लहानपणी पैसे असले तर चॉकलेट विकत घेईन अशी जी तीव्र इच्छा होती ती मोठेपणी आपण कशी पूर्ण केली? सतत चॉकलेट जवळ ठेवून ती इच्छा आपण पूर्ण केली नाही तर चॉकलेट खाण्यामधील आपले स्वारस्यच कमी करुन पूर्ण केली आहे. आता चॉकलेटचे दुकान समोर आले तरी ते विकत घेतोच असे नाही. तेव्हा आपले मन उडून जाणे हे इच्छा पूर्ण करायला एक साधन आहे. खरे म्हणजे या एका घटनेनेच आपल्या इच्छा पूर्ण होतात. जोपर्यंत आपले मन एका गोष्टीत गुंतले आहे तोपर्यंत त्या गोष्टीतून आपण मुक्‍त होत नाही, मग ती गोष्ट सतत आपल्याजवळ असली तरी आपले समाधान होत नाही. तेव्हा परमेश्वराकडे जाण्याकरीता आपले पहिले पाऊल म्हणजे सध्याच्या स्वतःच्या तीव्र इच्छांमधले आपले स्वारस्य कमी करणे होय. नीट विचार करुन बघा की आत्ता कुठल्या गोष्टी तुम्हाला महत्वाच्या वाटत आहेत. मग आत्ता महत्वाच्या वाटणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे त्रयस्थासारखे बघून विचार करा की ही जरी मला मिळाली तरी माझ्या आयुष्यात मूलभूत फरक पडणार आहे का? नाही मिळाली तर काय दुःख होणार आहे? असा विचार करुन जेव्हा तुमच्या मनाची अवस्था अशी होईल की आत्ता हव्या असलेल्या गोष्टी मिळाल्या तर बरे पण नाही मिळाल्या तरी चालेल तेव्हा तुम्ही भगवंताचा विचार करायला सुरुवात करा. साधनेच्या मार्गावर झोकून देण्याआधी हा विचार करायचा संयम शिकविण्याकरीता आपण तिसरी ओवी नेहमी म्हणतो.

खरे म्हणजे साधनेच्या मार्गावर चालण्यास प्रतिबंध करणारी सगळ्यात मोठी गोष्ट कुठली असेल तर आपली भिती (म्हणून निर्भयत्व हा संतांचा एक मोठा गुण मानला जातो). ही भिती म्हणजे संसारात आत्ता असलेल्या स्वतःच्या स्थानाबद्दलच्या अनिश्चिततेची भिती. आपले लक्ष देवाकडे नसून संसाराकडेच पूर्ण आहे याचे मुख्य कारण म्हणजे व्यवहारातील ज्या गोष्टी आपणांस प्राप्त झाल्या आहेत (आणि हव्याहव्याशा वाटत आहेत) त्या कधीही जीवनातून निघून जातील ही भिती सतत आपल्याला त्या वस्तूंकडेच लक्ष द्यायला भाग पाडते आहे. उदाहरणार्थ, बायकोला नवरा केव्हाही विचित्र वागायला लागेल ही भिती आहे, आईला आपल्या मुलाला कधीही वाईट संगत लागेल ही शंका आहे, नवऱ्याला गुंतविलेले पैसे कुठल्याही क्षणी बुडू शकतात ही जाणीव आहे. आपल्याला ह्या अनिश्चिततेनी पछाडलेले आहे व त्यामुळे मोकळा विचार करणे आपल्याला जमत नाही. ज्ञानेश्वर महाराजांसारखे आपण परमेश्वराकडे जात नाही याचे मुख्य कारण असे की आपली अजून खात्री होत नाही की हा संसार मला पाहीजे तसा आहे व तसाच राहील. जे काही प्राप्त झाले आहे त्यात स्वतःच्या कर्तुत्वापेक्षा नशिबाचा भागच जास्त दिसून येतो. उदाहरणार्थ, तुम्ही व तुमची जिवलग मैत्रीण यांनी सारखाच अभ्यास केला, तुमची बुध्दी सारखीच असली तरी तुम्हाला नव्वद टक्के मिळाले आणि तीला फक्‍त पंच्याहत्तर टक्केच मिळाले आहेत असे दिसल्याने उद्याच्या परीक्षेत आपली अवस्था त्या मैत्रीणीसारखी होईल ही भिती आपल्या मनात सुप्तरुपात असते. ही भिती सोडून थोडे `बिनधास्त’ रहायला हवे. जे काही मला मिळणार आहे ते मिळेल अशी खात्री ठेवून आपण बिनधास्त जगावे. आपले गुरु आपल्या पाठीशी आहेत ही जाणीव झाल्यावर बिनधास्त होणे तुम्हांला जमेल व साधना करायचे धाडस येईल. दरवेळी नमनाच्या ओव्यांचे वेगळे रुप आपल्यासमोर येते (आणि ते निरुपणाला घेतलेल्या ओव्यांना सुसंगत असते!). आज त्यांचे सांगणे वरीलप्रमाणे वाटते.

 

निरुपणाच्या ओव्या

 

आजच्या निरुपणाच्या ओव्यांमध्ये धृतराष्ट्राचा उल्लेख आहे. कुरुक्षेत्रात युध्द सुरु व्हायच्या आधी श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश म्हणजे गीता होय. परंतु आपल्याला श्रीकृष्ण व अर्जुन यांच्यातील हा संवाद प्रत्यक्ष दिसत नाही तर संजय धृतराष्ट्राला हा संवाद वर्णन करीत आहे असे दिसते. कृष्णार्जुनाच्या ह्या संवादात धृतराष्ट्राला फार स्वारस्य नव्हते, त्याला नंतर होणाऱ्या युध्दात कोणाला जय मिळणार आहे याचीच चिंता खात होती. पूर्वी मूळ सिनेमाआधीच्या दाखविण्यात येणाऱ्या `फिल्म डिव्हीजन’च्या बातमीपत्रात आपल्याला अजिबात स्वारस्य नसायचे. ज्याकरीता आलो आहोत तो अमिताभचा सिनेमा केव्हा सुरु होईल याची अस्वस्थपणे वाट बघत आपण इंदिरा गांधींच्या मॉरिशसच्या दौऱ्याची बातमी बघायचो त्याप्रमाणे धृतराष्ट्राची अवस्था होती. त्याला युध्दाचा सिनेमा बघायचा होता! खालीलपैकी दुसऱ्या ओवीत हीच अवस्था वर्णन केली आहे.

 

अगा मर हा बोलु न साहती । आणि मेलिया तरी रडती ।

परि असते जात न गणिती । गहिंसपणे ॥ ५१३:९ ॥

 

अहो ऐकिजत असे की अवधारा । तंव इया बोला निवांत म्हातारा ।

जैसा म्हैसा नुठी का पुरा । तैसा उगाचि असे ॥ ५२२:९ ॥

 

पहील्या ओवीत ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या संसारातील माणसे कशी वागतात याचे वर्णन केले आहे. ते म्हणतात: `मरणे हा शब्दसुध्दा त्यांना सहन होत नाही आणि कोणी मरण पावले तर त्यांस अत्यंत दुःख होते. पण ह्याचवेळी दररोज आपण मरणाच्या जवळ जात आहोत हे केवळ मूर्खपणाने ते जाणत नाही’. उदाहरणार्थ, दरवर्षी स्वतःचा वाढदिवस साजरा करताना आपल्या मनात आपण मोठे झालो अशीच भावना असते, पाठच्या वर्षी जे काही शिकलो त्याचा अभिमान असतो. पण आज आपण आपल्या मृत्यूला एक वर्षाने जवळ आलो आहोत असे कधीतरी वाटते का? दुसऱ्या ओवीत धृतराष्ट्राची अवस्था काय होती याचे वर्णन केले आहे: `आत्तापर्यंत जी गीता ऐकायला मिळाली होती त्याबद्दल कुठलाही विकार मनात न येता हा `म्हातारा’ निवांत बसला होता. ज्याप्रमाणे एखादी म्हैस खाल्लेल्या चाऱ्याचे रवंथ करीत चिखलात बसून असते तशी त्याची अवस्था होती’. रवंथ करणाऱ्या म्हशीच्या तोंडात घास असतो, अंगाला माखलेल्या चिखलाने उन्हाचा तडाखा फार जाणवित नसतो आणि या सर्वांमुळे ती अत्यंत सुखात असते. आपली अवस्था अशीच आहे. `मी किती विद्वान आहे’ किंवा `माझी मुले सगळ्यात पुढे आहेत’ अशा आपल्या आयुष्यातल्या आधी घडलेल्या गोष्टींबद्दल आपण एवढे खुश असतो की आता त्यापुढे काही करायला हवे असा विचारसुध्दा डोक्यात येत नाही, मग नवीन काही करणे दूरच राहीले. वरील उदाहरणातल्या म्हशीसारखेच आपण जीवनाच्या सध्याच्या स्थितीपर्यंत यायला इतके अधाशासारखे खाल्ले आहे की ते पचायला उरलेले सबंध आयुष्य आपणांस रवंथ करीत बसावे लागते! त्यामुळे जो काही रिकामा वेळ आपल्याला मिळतो तो सर्व मिळालेल्या गोष्टींबद्दल विचार करण्यातच आपण वाया घालवितो. धृतराष्ट्राची अवस्था अशीच होती. आपल्या मुलांच्या कर्तुत्वाच्या आठवणीत तो शांत बसला होता व वाट बघत होता की केव्हा हे युध्द सुरु होईल. श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेल्या उपदेशाचे त्याला अजिबात महत्व वाटत नव्हते.

वरील ओवींत असे जाणविते की ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द कधी कधी अतिशय कठोर होऊ शकतात. या जगातल्या माणसांच्या व धृतराष्ट्राच्या वरील वर्णनात त्यांनी अजिबात मृदु शब्द वापरले नाहीत. सबंध ज्ञानेश्वरीत अनेक वेळा घणाघाती प्रहारासारखे त्यांनी शब्द वापरले आहेत. आपण झोपलेलो आहोत, तोंडावर गार पाण्याचा हबका मारल्याशिवाय आपण उठणार नाही ही जाणून त्यांनी ह्या शब्दांचा वापर केला आहे. किंवा लहान मुलाला कधी कधी थप्पड मारावीच लागते त्याप्रमाणे त्यांनी हे कठोर शब्द वापरले आहेत. कधी कधी संतांच्या वागण्यात कठोरपणा दिसतो. समोरच्या माणसाबद्दलच्या खऱ्याखुऱ्या आपुलकीच्या भावनेतूनच त्यांच्या अशा वागण्याचा उगम होत हे जाणणे जरुरी आहे. नाहीतर त्यांच्या संतपणाबद्दलच मनात शंका उत्पन्न होऊ शकते. असो.

ह्या ओवींचा शब्दार्थ आपण आता बघितला आहे. आजच्या आपल्या नमनाच्या ओवीच्या सांगण्याशी तो सुसंगतच आहे. कारण आज नमनाच्या ओवींतून आपण असे बघितले की आपल्याला आयुष्यात नवीन विचार करायची गरज आहे. आत्तापर्यंत डोळ्यांवर झापड बांधल्यासारखे आपण आपले आयुष्य जगत आलो आहोत. त्याने आपल्याला काय सुख दिले आहे याचा हिशोब करायची वेळ आली आहे. जर तुम्हांला आत्तापर्यंतच्या आयुष्यात तोट्याचा व्यवहार दिसला तर नवीन धंदा, म्हणजे परमार्थाबद्दल विचार, सुरु केला पाहीजे असे आपण बघितले. वरील ओवीत ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत की आपला व्यवहार कसा तोट्याचा आहे. ज्या गोष्टींच्या प्राप्तीमध्ये आपण सुखाची कल्पना केली आहे त्या सर्व गोष्टी आजचा म्हशीच्या पोटातील चारा जसा उद्या पूर्ण निरुपयोगी होऊन बाहेर निघतो तशा नाशिवंत आहेत. आपण आज निवांत रवंथ करीत बसलो आहोत पण उद्या परत भूक लागणार आहेच. कारण आलेली प्रत्येक गोष्ट हळूहळू नाश पावत आहे आणि केवळ मूर्खपणाने आपण जात असलेल्या गोष्टींबद्दल विचार न करीता स्वस्थ बसलो आहोत असे त्यांना सांगायचे आहे. थोडक्यात म्हणजे आपली अवस्था धृतराष्ट्रासारखी आहे असे त्यांना म्हणायचे आहे.

अशा रीतीने ओवींचा भावार्थ लक्षात घेतल्यावर आता एवढेच शिल्लक राहते की आपल्या स्वतःच्या साधनेत वरील ओवींचा उपयोग कसा करुन घ्यायचा. ह्या ओवींतून आपण आयुष्यात काय करायला शिकायचे? आपण असा सतत विचार करायला शिकले पाहीजे की या जगामध्ये माझ्याकडे आहेत त्यांपैकी कुठली गोष्ट अशी आहे की जीच्या सतत आपल्याबरोबर असण्याबद्दल आपण निःशंक आहोत. आपण असा विचार जर केला नाही तर स्वतःला `असते जात न गणिती, गहिंसपणे’ या वर्णनातच मोडले पाहीजे हे जाणून आपण हा विचार करायला सुरुवात केली पाहीजे. आपल्याला शहाणे व्हायचे असेल तर आधी मूर्खपणा (गहिंसपणा) सोडला पाहीजे, म्हणून सतत असे बघायची सवय लावून घ्यायला पाहीजे की `कुठली गोष्ट माझ्याजवळ आहे की कसलीही काळजी घेतली नाही तरी ती माझ्याजवळ राहीलच’. तुम्ही `मित्रांचा स्नेह’, `बैंकेतील पैसे’, `बायकोचे/नवऱ्याचे प्रेम’, `मुलांचा आदर’ यापैकी कुठली गोष्ट सतत आपल्याजवळ राहील अशी खात्री आपल्याला आहे का याचा विचार करा. माझ्याबाबतीत बोलायचे झाले, तर आत्तापर्यंत एकच वस्तू मला अशी दिसली आहे की तीच्याबद्दल मी खात्रीने सांगू शकीन की ती सतत माझ्याजवळ आहेच. ती म्हणजे माझ्या ह्रुदयातील सद्‌गुरुंचा मला असलेला आधार. आत्तापर्यंत हजारो वेळा त्यांच्या सांगण्याविरुध्द काम करुनसुध्दा त्यांचा निरपेक्ष सहवास अजून आहेच! एकदा स्वसंवेदनांनी ही गोष्ट तुम्हांला जाणविली की `जय जय देव श्रीगुरो, अकल्पनाप्य कल्पतरो, स्वसंविद द्रुमबीजप्ररो, हणावनि’ ह्या ओवीचा खरा अर्थ तुम्हाला समजायला लागेल. ज्यांच्या आयुष्यात परमेश्वराचे स्थान नाही, त्यांना या सद्‌गुरुचे अस्तित्वच माहीती नाही. मग त्यांच्या आयुष्यात कुठली गोष्ट स्थिर असू शकेल याची कल्पना मला येतच नाही. अशी गोष्ट त्यांच्या जीवनात आहे की नाही याचा विचार त्यांनी केला पाहीजे. परमेश्वराशिवाय दुसरी वस्तू त्यांना सापडली तर जरुर त्यांनी मला येऊन सांगावे. संसारातील अशी एखादी गोष्ट पहायला मी अत्यंत उत्सुक आहे.

तेव्हा, वरील ओवींचे आपल्या दररोजच्या जीवनात अंमलात आणण्यासारखे हेच सांगणे आहे कि तुमच्या आयुष्यात जी कुठली स्थिर वस्तू आहे तीच्याकडे तुम्ही नीट लक्ष द्या, तीच्या प्राप्तीमध्ये सुख माना. अस्थिर गोष्टींच्या मागे लागणे म्हणजे मृगजळाच्या पाण्याच्या मागे धावण्यासारखे आहे. तुमच्या जीवनात परमेश्वराऐवजी एखाद्या दुसऱ्या व्यक्‍तीचे वा वस्तूचे स्थान अढळ असेल तर खुशाल त्या वस्तूच्या प्राप्तीमध्ये सुख आहे असे माना. पण या जगात अशी कुठलीही वस्तू तुम्हांला सापडणार नाही की जीचा नाश होत नाही, जी असताना सतत नाहीशी होत नाही. मी खात्रीपूर्वक असे सांगू शकतो कारण माझ्या जीवनातील ही सत्य घटना आहे आणि शास्त्राने ह्या गोष्टीला आधार दिलेला आहे. हीच गोष्ट जर तुम्हांला स्वसंवेदनांनी कळली आणि खरे वाटली तर लगेच परमेश्वराचे ध्यान करायला सुरुवात करा, त्यात परत चालढकल करु नका. थोडक्यात म्हणजे डोळे उघडे ठेवून जगा. आत्ता ज्या गोष्टी बदलणार नाही असे वाटत आहे त्या गोष्टींनी दगा दिला तर आपले त्यांच्याबद्दलचे मत बदलायचे स्वातंत्र्य गमावू नका. एखाद्या व्यक्‍तीला तुम्ही आपले मानले आहे, तीच्या भल्याकरीता स्वतःचे आयुष्य वेचायची तयारी तुम्ही ठेवलेली आहे, पण अशा व्यक्‍तीने आपले खरे रुप दाखविले तर तीचा आत्यंतिक मोह सोडा. अनेकवेळा त्या व्यक्‍तीच्या वागण्याबद्दल वाईट अनुभव येऊनसुध्दा त्या व्यक्‍तीवरचे वा गोष्टीवरचे तुमचे प्रेम वा मोह कमी होत नाही ही अंधश्रध्दा नव्हे काय? स्वसंवेदनांनी, स्वतःच्या अनुभवांनी, जाणविलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करुन विरुध्द भावना जवळ करणे म्हणजेच अंधश्रध्दा होय.

फक्‍त देवावरच्या श्रध्देला अंधश्रध्देचे नांव देणे चुकीचे आहे हे समजून घ्या. खरे म्हणजे ज्यांना देवावर प्रेम नाही त्यांचेच जीवन अंधश्रध्देवर आधारित आहे. कारण ज्या ज्या गोष्टींचा मोह त्यांना आहे त्यापैकील कुठलीही गोष्ट शाश्वत नाही, कधीही नाश पावू शकते (नव्हे, दरक्षणाला नाश पावतच आहे) असे जाणूनसुध्दा त्यांचा त्या गोष्टींवर आपले जीवन (जे नाश पावू नये हेच आपल्या जीवनाचे ध्येय असते!) उभारायचा प्रयत्‍न थांबत नाही ही अंधश्रध्दा नव्हे तर दुसरे काय आहे?

आता काही लोक म्हणतील की माझे जीवन खरेच सुखी आहे. मी त्यात का बदल करु? स्वतःच्या जीवनाबद्दल बोलताना सारासार विचार सुटायची शक्यता खूप असते. म्हणून त्यांची ही भावना खरी आहे की एक अंधश्रध्दा आहे हे पाहणे त्यांना जरुरी आहे. कारण सत्य गोष्ट जाणली नाही म्हणून ती खोटी होत नाही! तुम्हांला चोरी करणे चुकीचे आहे हे माहीती नसले तरी त्यामुळे केलेल्या चोरीची शिक्षा कमी होत नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला आपण सुखी आहोत असे आत्ता वाटत असले तरी त्यामुळे उद्याच्या दुःखाचा झटका कमी होणार नाही हे जाणून घ्या व वस्तुस्थिती जाणण्याचा प्रयत्‍न करा. नाहीतर वाळवंटात वाळूचे वादळ आले की शहामृग वाळूत आपले डोके खुपसून वादळ आले नाही असे म्हणतो तशी तुमची अवस्था होईल. सध्याच्या जीवनात आपण सुखी आहोत असे ज्यांना वाटत आहे त्यांनी आपली खात्री अंधश्रध्दा आहे की योग्य आहे हे पाहण्याकरीता खालील एक अत्यंत साधा प्रयोग करुन पहावा. तो प्रयोग असा आहे:

आधी कागदावर एक तक्‍ता तयार करा. तो तयार करण्याकरीता दिवसाच्या बारा तासांना दोन दोन तासांमध्ये विभागून उभ्या रेषा मारा. उदाहरणार्थ, सकाळी ६ ते ८, नंतर ८ ते दहा, वगैरे. त्याखाली प्रत्येक दिवसाकरीता एक अशा आडव्या रेषा मारा. मग एक महीना त्या तक्‍त्यामध्ये वरील दोन तासांच्या खाली त्यावेळात आपण किती सुखी होतो याची नोंद करा. उदाहरणार्थ, सकाळी ७ला उठताना ऑफिसमध्ये जायचा कंटाळा येऊन तुम्ही उठला असाल तर ६ ते ८ च्या खाली १०पैकी ४ गुण भरा, याउलट सकाळी उत्साहाने उठलात तर ८ गुण द्या. दोन तासातील आपल्या जीवनाला विसरण्याआधीच तक्‍ता भरायचा असल्याने दररोज दिवसातून दोनवेळा हा तक्‍ता भरा. उदाहरणार्थ, दुपारच्या जेवणाच्या वेळी व रात्री झोपताना. इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे हे दहापैकी गुण तुमच्या स्व्तःच्या कल्पनेने तुम्हांला द्यायचे आहेत. कधी कधी सर्व जग तुम्हांला सुखी समजत असताना तुमच्या मनात कुठलेतरी दुःख सलत असते. अशावेळी तक्‍त्यात २ गुण भरा. याउलट सर्वांच्या दृष्टीकोनातून दुःखदायक घटना घडली तरीसुध्दा तुमचे मन शांत असेल तर ९ गुण द्या. आपले आपण स्वतःला किती सुखी मानत आहोत हे बघायचा हा खेळ आहे. यात जगाचा काही संबंध नाही, म्हणून आपल्या मनाच्या अवस्थेवरच गुण भरा. सुरुवातीला दोन तासाच्या मनाच्या सरासरी अवस्थेवर गुण द्या. मग हा दोन तासांचा वेळ कमी करुन एक तासाचा तक्‍ता करा. ज्याप्रमाणे वजन कमी करायला व्यायामशाळेत गेल्यावर आपल्या अंगाच्या विविध भागांच्या आकाराची नोंद एका तक्‍त्यात करण्यात येते आणि आपली प्रगती त्या तक्‍त्यातील नोंदींवरुनच आपल्याला पूर्णपणे कळते तशीच ही गोष्ट आहे. दररोज आपल्या मनाच्या विविध अवस्थांच्या नोंदी ह्या तक्‍त्यात करायच्या आहेत व शेवटी कुठली अवस्था प्रामुख्याने येते हे बघायचे आहे!! म्हणून जेवढ्या कमी वेळाच्या नोंदी कराल तेवढे तुम्हांला स्वतःच्या आयुष्याचे अधिक ज्ञान होईल. महिनाभरातच तुम्हांला लक्षात येईल की तुमची स्वतःच्या सुखीपणाची समजूत कितपत खरी आहे आणि कितपत मानलेली आहे. जर तुम्ही सुखी नाहीत असे कळले तर ते मान्य करुन सुखी होण्याकरीता प्रयत्‍न करायला तुम्ही आपणहूनच सुरुवात कराल! मी स्वतः हा प्रयोग आपल्या मनात करुनच ज्ञानेश्वरीकडे वळलो आहे!!

जर तुम्हांला आपण सुखी नाही असे कळले तर मग स्वतःला कुठल्या गोष्टीने सतत सुख मिळू शकेल याचा विचार करा. स्वतःला अगदी साधे सरळ प्रश्न विचारा. मी अमुक अमुक गोष्टींच्या प्राप्तीकरता का जीवापाड धडपड करीत आहे? असे विचारा. स्वतःच्या बाबतीत बोलायचे झाले तर मी स्वतःला धृतराष्ट्रच समजतो. ह्या संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये मला लागू होणारे व्यक्‍तिमत्व केवळ धृतराष्ट्राचे आहे हे मला पूर्णपणे कळलेले आहे. असे बघा, इतक्यावेळा ज्ञानेश्वरी वाचून माझ्या आयुष्यात काय फरक पडला आहे? जगातील कितीजणांना मी उपदेश करतो यात मला महत्व वाटत नाही. प्रगतीची एकमेव खूण म्हणजे माझे नेहमीचे आयुष्य जगताना मी कसा वागतो ही आहे. आणि हे बघितले तर माझ्यात आणि धृतराष्ट्रात काही फरक आहे असे मला वाटत नाही. अत्यंत प्रामाणिकपणे मी ही गोष्ट कबूल करत आहे. दरवेळी संसारातील गोष्टींना महत्व देण्यात अर्थ नाही हे कळूनसुध्दा शेवटी वागण्यात काही फरक होतो का? अध्यात्मिक प्रगती बघायला मनात किती शांती आहे हे बघणे हा एकच मानदंड आहे. जोपर्यंत मन अस्वस्थ आहे, नवीन गोष्टींची मागणी करीत आहे तोपर्यंत आपली अवस्था धृतराष्ट्रासारखीच आहे. हे जाणून घेऊन सतत प्रयत्‍न करीत रहा असेच या ओवींचे सांगणे आहे असे वाटते.

खरे म्हणजे या ओवींचे सांगणे आपल्या अज्ञानालासुध्दा लागू आहे! म्हणजे आपले अज्ञानसुध्दा कधीतरी जाणारच आहे (व नित्य नाश पावत आहे!) ही खात्री मनात ठेवून, सध्याच्या अज्ञानाबद्दल निराश न होता प्रयत्‍न करीत राहणे एवढेच आपल्या हातात आहे. तसा प्रामाणिक प्रयत्‍न करायला आपण आजच सुरुवात करुया.

 

॥ हरि ॐ ॥

(बंगलोरमध्ये दिनांक ३१ मार्च २००७ रोजी दिलेल्या प्रवचनावर आधारित.)

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: