211/12: How many homes do you have?

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

आणि वायूसि एके ठायीं । बिढार जैसे नाहीं ।

तैसा न धरीच कहीं । आश्रय जो ॥ २११:१२ ॥

 

बाराव्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला भक्‍तियोग म्हणजे काय हे स्पष्ट करतात. त्यामध्ये भक्‍तिमार्गावर चालून भगवंताची प्राप्ती केलेल्या भक्‍ताचे वर्णन करताना भगवद्गीतेमध्ये जे श्लोक आहेत त्यापैकी एका श्लोकात `अनिकेतः’ हे विशेषण वापरण्यात आलेले आहे (भगवद्गीता: श्लोक १९, अध्याय १२). या शब्दाचा अर्थ आहे `बेघर’. रविंद्रनाथ टागोरांनी आपल्या आश्रमाचे नाव शांतिनिकेतन ठेवले कारण त्यामुळे तो आश्रम शांतीचे घर आहे हे स्पष्ट होते. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी वापरलेला `अनिकेत’ हा शब्द परिपूर्ण भक्‍ताच्या मनातील आश्रयाच्या आसक्‍तीचा संपूर्ण अभाव दर्शवित आहे. वरील ओवीत ज्ञानेश्वर महाराजांनी अशा अवस्थेचे फार सुंदर वर्णन केले आहे. ते म्हणत आहेत: `ज्याप्रमाणे हवेची झुळुक एका ठिकाणी थांबली आहे असे होऊ शकत नाही, त्याचप्रमाणे भगवंतांना प्रिय झालेला भक्‍त एका ठिकाणी आश्रय धरु शकतच नाही.’ तेव्हा महाराज म्हणत आहेत की परमभक्‍त नुसता बेघर होतो असे नाही तर तसे होणे हा त्याचा स्वभावच होतो.

शाब्दीक अर्थात आपण फारसे गुंतू नये! याचे कारण असे की एकाच शब्दाचे प्रत्येकाच्या मनात भिन्न अर्थ असतात. शब्द ऐकल्यावर आपल्या मनात उत्पन्न झालेला बोध वक्‍त्याच्या मनात असेलच ह्याची खात्री आपण कधीच देऊ शकत नाही. म्हणून संदर्भाशिवाय गीतेतील श्लोकांचा आधार घेऊन काही महाभाग आपल्याला हवे ते सिध्द करण्यात काहीही चुकीचे मानत नाहीत. आता वरील शब्दच बघा. जो भक्‍त भगवंताच्या चरणी विलीन झालेला आहे तो बेघर होतो असे खुद्द भगवंतांनी सांगितलेले आहे. पण प्रत्यक्षात पहायला गेलो तर तसे घडलेले दिसत नाही. श्रेष्ठ भक्‍त नामदेव, एकनाथ, तुकाराम, जनाबाई इत्यादी आपल्या घरातच रहात होते की! आणि समजा आपण इतिहासाकडे लक्ष न देता भविष्याकडे बघितले तर ज्यांना भगवंताच्या भक्‍तीची आवड आहे त्यांना कळले की भक्‍ती स्थिर झाली की आपण बेघर होणार तर त्यांना ते आवडेल काय?!! बेघर होण्याची भिती त्यांना संपूर्णपणे भक्‍ती करुनच देणार नाही. खरे ना? म्हणून आपण या शब्दाच्या उच्चार करण्यामागे भगवंतांचा हेतू काय होता हे बघितले पाहिजे. आज आपण अनिकेत या शब्दाचा कुठला अर्थ श्रीकृष्णांना अभिप्रेत होता हे जाणून घ्यायचा प्रयत्‍न करु.

 

जे रुप दिसते लोचनी । आश्रय त्याचा होतो मनी ।

अवस्था होते जेव्हा उन्मनी । अनिकेत होतो आपण जनी ॥

 

भगवंताजवळ पोहोचलेल्या भक्‍ताच्या जीवनातील `अनिकेत’ या गुणाचा नक्की अर्थ काय आहे हे जाणून घ्यायच्या आधी आपण अर्थ जाणून घेणे का जरुरी आहे याचा विचार करु. कारण `मी माझ्या साधनेत मग्न आहे, मला इतर गोष्टी जाणून घ्यायची काय गरज आहे?’ असा विचार काही साधकांच्या मनात उद्भवण्याची शक्यता आहे. खरोखरच, जेव्हा आपली साधना व्यवस्थित चालू असते, तेव्हा ती सोडून आपल्याला काहीही माहिती करुन घ्यायची गरज नसते. परमभक्‍त हनुमंताला रामनवमी केव्हा आहे असे कुणीतरी विचारल्यावर तो म्हणाला की `अरे, मला आत्ता दिवस आहे की रात्र आहे हेसुध्दा नीट माहिती नाही. केवळ रामनाम घेण्यात मी इतका मग्न आहे की बाकी कशाचेही भान मला नाही. तेव्हा रामनवमी केव्हा आहे हे मला विचारु नकोस!’ परंतु आपल्या साधनेत एकाग्र असणे योग्य असले तरी आपल्या जीवनात सर्वच काळ आपली साधना सुरळीत चालू नसते. साधनेत वारंवार अडथळे येत असतात आणि दरवेळी आपणांस त्यांच्यावर मात करुन परत आपली साधना सुरु करायची असते. अशावेळी मिळेल त्या आधाराचा आपण उपयोग करुन घेतला पाहिजे. अनिकेत या शब्दाचा अर्थ तुम्हाला स्वतःच्या स्थगित झालेल्या साधनेचा जीर्णोध्दार करण्यास उपयोगी पडेल. याचे कारण असे की गीतेमधील भक्‍तांच्या, वा स्थितप्रज्ञ माणसांच्या वा ज्ञानी लोकांच्या गुणांचे जे वर्णन केलेले आहे ते त्यांना ओळखण्याकरीता केलेले नाही. उदाहरणार्थ, एखाद्या आपत्तीत डोके थंड ठेवणारा भगवंताच्या जवळ असतोच असे नाही. त्याच्या शांत राहण्याचे कारण काय आहे यावर तो ज्ञानी आहे की नाही हे अवलंबून असते. बाह्य वर्तनावरुन ज्ञानी माणसांना ओळखणे अशक्य असूनही त्यांच्या गुणांचे वर्णन बाह्य गोष्टींनीच केलेले आहे याचे कारण असे की भगवंताचा सहवास प्राप्त झालेल्या माणसांना असे वर्तन सहजपणे शक्य असते व आपल्या सारख्या साधकांकरीता तो एक साधनेचा मार्ग असतो. ज्या दारातून घरातील दिव्याचा प्रकाश बाहेर येत असतो त्याच गवाक्षातून घरात प्रवेश करायला कीटकांना संधी असते! त्याचप्रमाणे ज्या वर्तनातून ज्ञानी माणसांचे ज्ञान प्रगट होत असते त्याचे अनुकरण करुन आपण हळूहळू आपले अंतरंग बदलू शकतो. म्हणूनच गीतेमध्ये वेळोवेळी उच्चतम साधकांच्या बाह्य वर्तनाचे वर्णन केलेले आहे. तेव्हा अनिकेतपणा हा परिपूर्ण भक्‍तांचा गुण काय आहे हे कळले तर आपल्या जीवनात तो शक्य तितका आणायचा प्रयत्‍न आपण करु शकतो आणि ही आपली साधनाच होईल. जेव्हा नित्यनैमित्तिक साधनेत खंड पडेल, वा त्यातील गंमत निघून जाईल तेव्हा ही नवी साधना आपण करु शकतो आणि परत आपल्या साधनेत नवी चेतना आणू शकतो. म्हणून या शब्दाचा अर्थ आपण जाणून घेऊया.

अनिकेत. बेघर. कुणाला हे शब्द लागू आहेत? ज्याचे जसे रुप आहे तसे त्याचे घर होते. मुंगी मानवाच्या घरात राहिली तरी ते घर तीचे घर होत नाही. ती त्यामध्ये आपले वारुळ करुन राहते! तेव्हा घर या शब्दामध्येस त्यात रहाणारा मनुष्य आहे हे अध्यारुत आहे. मग जसा मनुष्य तसे त्याचे घर. उदाहरणार्थ, शिक्षक म्हटला की शाळा वा कॉलेज डोळ्यासमोर येते. शिक्षक या रुपाचे ते घर आहे. नोकर म्हटला की ऑफिस, मित्र म्हटले की अड्डा आणि स्वयंपाकी म्हटले की स्वयंपाकघर डोळ्यासमोर येते. तेव्हा कोण बेघर होतो यावर कुठले घर नष्ट होते हे ठरते. आता एखादा मित्र शाळेत नोकरी करुन स्वयंपाक करीत असेल तर वर वर्णन केलेली सर्व घरे त्याची आहेत. त्याचे जेव्हा जे रुप असेल तेव्हा तो त्या रुपाला योग्य अशा घरात असणार. मित्र असेल तेव्हा शाळा नष्ट होते, स्वयंपाकी असेल तेव्हा अड्डा आणि शाळा नष्ट होते इत्यादी. मग जेव्हा तो गाढ झोपेत असतो तेव्हा त्याचे घर कुठले आहे? त्याला कुठलेही रुप नसेल तेव्हा त्याचे घर काय? सांगता येईल का?! आणि घर कुठले हे सांगता येत नाही म्हणजे तो बेघर झाला की! तेव्हा अनिकेत या शब्दातून भक्‍ताचे बाह्यजगातील घर नाहीसे होत नाही तर त्याची स्वतःची सर्व रुपे नष्ट होतात. जेव्हा जेव्हा आपण आपल्या एका रुपात अडकतो तेव्हा आपण स्वतःला एक घर निर्माण करीत असतो आणि त्या घरात राहणे पसंत करीत असतो. परंतु जो साधक जो काळाबरोबर अखंड प्रवास करीत आहे त्याला कुठले घर आहे? वाहत्या नदीला घर असते काय? तेव्हा अनिकेत या शब्दातून साधकाच्या मनातील व्यवहारातील सर्व गोष्टींबद्दलची संपूर्ण उदासीनता दृष्टीस पडते. थोडक्यात म्हणजे आपली जी रुपे जगासमोर येतात त्यातील प्रत्येक रुप हे आपल्या मनाचे घर आहे. मनुष्य जेव्हढा जास्त गोष्टींची उलाढाल करतो तेव्हढी त्याची घरे जास्ती व तो जेव्हढा निरिच्छ, कर्तृत्वहीन तेव्हढी घरे कमी! संतलोक कुठलेही काम मी केले असे म्हणतच नाहीत तर भगवंताच्या मर्जीने ते झाले असे म्हणतात व हात झटकतात. म्हणजे ते संपूर्णरीत्या कर्तृत्वहीन होतात, बेघर होतात!! त्यांच्या व्यावहारिक जगातील कुठल्याच रुपाला `ते मी आहे’ असा मान्यतेचा शिक्का ते लावत नाहीत म्हणून ते अनिकेत आहेत.

हे विश्लेषण पटले नसेल तर दुसऱ्या बाजूने बघा. घर म्हणजे सुरक्षितता. जिथे गेल्यावर आपण शांतपणे डोळे बंद करुन बिछान्यावर पडू शकतो अशी जागा. जिथे आपल्याला कुठल्याही मुखवट्याचा सांभाळ करावा लागत नाही अशी जागा म्हणजे घर. आपल्या व्यावहारिक जगातील रुपांना आपल्या मनाचे घर म्हणण्याचे कारण म्हणजे त्या प्रत्येक रुपांतून आपले मन एक सुरक्षितता शोधायचा प्रयत्‍न करीत असते. आई या रुपात गेले की आपल्या मुलांच्या कल्याणाची काळजी करण्यात स्त्री आपल्या जीवनाची साफल्यता शोधू लागते. (स्त्रीयांना आपले आई हे घर मोडणे सर्वात कठीण गोष्ट आहे. बाकी सर्व गोष्टींचा त्याग त्या क्षणात करु शकतात पण आपल्या मुलांवरचे प्रेम?! ते जर मोडता आले नाही तर ते प्रेम एव्हढे मोठे करावे की त्याच्या भिंती तुमच्या साधनेला बंधन घालू शकत नाहीत. म्हणजे आईपणा विसरता येत नसेल सर्व जगाची माता व्हा!) अशा सहज पडताळा येऊ शकणाऱ्या गोष्टींमध्ये जीवनाचा अर्थ शोधायला खूप सोपे आहे. मी स्वतः सुखी आहे की नाही याचा मानदंड म्हणून जगातील काही गोष्टींचे स्वामीत्व हे प्रमाण धरले की आपण सहजपणे लोकांना पटवून देऊ शकतो की मी खराच किती सुखी आहे ते. परंतु स्वतः सुखी आहेत की नाही याचे प्रमाण स्वतःच ठरवायचे आणि कितीही लोकांनी तुमची कीव केली तरी स्वतःच्या भाग्यावरचा विश्वास डळमळू द्यायचा नाही हे कितीजणांना जमेल? जरा बघा, जगात आपण अनेक रुपे घेऊन जगत आहोत. कधी मी पिता आहे, कधी शिक्षक आहे तर कधी ज्ञानेश्वरीवर भाष्य करणारा वक्‍ता आहे. कधी मित्र, कधी शत्रू कधी खेळाडू तर कधी आळशी. या सर्व रुपांतून मला त्या त्या क्षणी एक सुरक्षितता मिळत असते. एका ठराविक रुपात गेल्यावर `मी’ म्हणून जे काही अस्तित्व या देहात वावरत आहे त्याच्या अस्तित्वाला काही धोका नाही हे मला जाणवित असते ही ती सुरक्षितता. एखाद्या कापलेल्या पतंगाप्रमाणे मी आयुष्यात भरकटत फिरत नाही ह्याची जाणीव होत असते ही ती सुरक्षितता. जिथे ही सुरक्षितता नाही (जे आपले घर नाही) तिथे जाण्यास आपण कचरतो. म्हणूनच आपण शांतपणे आपल्यातच रमायला घाबरतो. छान जेवण झालेले आहे, दुपारची वेळ आहे, काहीही करायला नाही आणि नुसते शांतपणे सोफ्यावर बसलो आहोत असे कधी घडते का? सोफ्यावर बसल्याक्षणी `आज टी.व्ही. वर काय आहे हे बघू’ असा विचार येतोच की नाही? किंवा `चला आता शांतपणे बसून पेपर वाचूया’ असे आपण म्हणतो की नाही? अगदीच नाही तर `चला झोपूया’ आहेच! शुन्यात नजर लावून काहीही न करीता आपण जिवंत आहोत या भावनेमध्ये मग्न होऊन संपूर्ण दुपार काढूया असे कधी डोक्यात आले आहे का? असे नुसते विचारशून्य बसून अंतरंगातील भगवंताचे अस्तित्व पहाणे म्हणजेच मनाची उन्मनी अवस्था होय आणि हाच तो अनिकेतपणा! शरीराच्या अशा निष्क्रियतेला कमी मानू नका. भगवंताच्या आत्मरुपी अवताराचे दर्शन होण्याकरीता दोन विचारांच्या मधील जागेत सतत मनाला ठेवणे ही साधनेतील अत्यंत उच्चतम अवस्था आहे. वाचकाच्या रुपात, वा दर्शकाच्या रुपात वा आराम करणाऱ्याच्या रुपात न जाता नुसते जगणे कुणाला जमते? फक्‍त खऱ्या भक्‍ताला जमते. तो अनिकेत आहे. त्याला कुठल्याही घराची आवश्यकता नाही. मजेत स्वतःमध्ये स्थित असलेल्या परमेश्वराचा आस्वाद घेण्यात संपूर्ण जीवन व्यतीत करायची तयारी असणारा म्हणजे अनिकेत. हा अर्थ गीतेतील बाकी सर्व श्लोकांशी सुसंगत आहे. बाकी कुठेही अर्जुनाला तू घर सोड असे सांगितलेले दिसत नाही. तू कर्तृत्वाची भावना सोड असा उपदेश केला आहे. म्हणजे काय तर स्वतःच्या धनुर्धराच्या रुपाचा आश्रय घेऊ नकोस. मोड ते घर, हो अनिकेत!

तेव्हा फावल्या वेळात ही साधना करुन पहा. बसा नुसते मठ्ठपणे काहीही न करीता. स्वतःमध्ये देव आहे या कल्पनेत रमून बाह्यदृष्टीने ठोल्यासारखी संपूर्ण दुपार घालविण्यात छान साधना होत आहे असे मानण्यात काय हरकत आहे? आपल्याभोवती आपणच बांधलेली घरे मोडायची एकदा सवय लागली की आपोआप विवेक आणि वैराग्य प्रज्वलित होतात. मग तुम्हाला नको असली तरी आपली साधना सुरुच रहाते. सहजपणे घडणाऱ्या अशा साधनेचा आस्वाद चाखायला आपल्या घरांतून जरा बाहेर या!!

 

॥ हरि ॐ ॥

 

(बंगलोर, दिनांक २८ सप्टेंबर २००८)

लेखक: Shreedhar

I finished Ph.D. in mathematics in 1991. Since 1996, I am making sincere efforts to see the relevance of the ancient Indian teachings in the modern world.

यावर आपले मत नोंदवा